नारळामधील किडी । Pest of coconut |

 🏫IPM SCHOOL🌱



 नारळ हे सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात लागवड केले जातात. जास्त प्रमाणात घेतले नसेल तरीही बरेच शेतकरी शेताच्या बांधावर तरी एक दोन झाडे नक्कीच लावतात. त्यामुळे सर्व भागामध्ये नारळाची झाडे लावलीच जातात. ज्या पद्धतीने सर्व झाडावर किडींचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे नारळावरही होतो. 

    नारळाच्या झाडावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. काही किडींच्या जास्त प्रमाणात प्रादुर्भावामुळे संपूर्ण झाड मरु शकते.तर काही वेळेला मोठ्या प्रमाणात फळगळ झालेली सुद्धा दिसून येते.कोणत्या किडींचा पिकामध्ये प्रादुर्भाव होतो हे माहिती असल्यास आपण प्रतिबंधात्मक उपाय करून सुद्धा नियंत्रण करू शकतो. आज आपण नारळामध्ये कोणत्या किडी येतात याची माहिती घेऊया. 


नारळावरील महत्वाच्या किडी


गेंडयाभुंगा:- 

 या किडीचा प्रौढ भुंगा माडाच्या शेंडयामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. नवीन वाढणारी सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या माडाच्या झावळया त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. लहान रोपांमध्ये सुई भुंग्याने खाऊन फस्त केल्यास अशा रोपांना नवीन सुई येत नाही. काही वेळेस न उमललेली पोयदेखील भुंगा कुरतडून खातो. अशी पोय न उमलता वाळते. त्यामुळे याचा परीणाम माडाची वाढ व उत्पन्न यावर होतो. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात या भुंग्याची तीव्रता जास्त आढळते. 


सोंडयाभुंगा:- 

 या किडीच्या अळया माडाच्या खोडातील मऊगाभा खातात व खोड आतून पोखरतात. तथापि अळया खोडाच्या आत असल्याने प्रादुर्भाव झाल्याचे बाहेरुन ओळखता येत नाही. खोडाच्या आतील मऊगाभा जास्त पोखरला गेल्यास कालांतराने माड कोलमडतो. प्रादुर्भाव झालेल्या माडाची पाने निस्तेज दिसतात व त्यांची वाढ खुंटते. सोंडया भुंग्याचा प्रादुर्भाव माडाच्या शेंडयाकडील भागावर झाल्यास वाढणारी सुई किंवा पानाचा कोंब निस्तेज दिसतो. कालांतराने सगळया झावळा सुकून माड दगावतो. प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बुंध्यावर छिद्रे दिसतात व ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव वाहताना दिसून येतो.


चक्राकार पांढरी माशी:-

 या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोघेही पानाच्या खालील बाजूस रस शोषून घेतात. चक्राकार पांढरी माशी शरीरातून गोड चिकट स्त्राव सोडत असल्यामुळे त्याकडे असंख्य मुंग्या आकर्षित होतात व त्यामुळे स्त्राव सर्वत्र पानावर पसरतो. पानाच्या वरच्या बाजूवर गोड चिकट स्त्राव दिसून येतो आणि त्यावर काळया बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला तर नारळ फळांवरसुध्दा 'चक्राकार आवरणात अंडी व प्रौढ दिसून येतात'.


इरिआफाईड कोळी:- 

 ही सूक्ष्म प्रकारची कीड नारळाच्या देठाखालील आवरणाच्या आत राहून त्या भागातील रस शोषून घेते. परिणामी देठाच्या खालच्या भागात पांढरट, पिवळे त्रिकोणी चट्टे दिसतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन त्यांचा आकार त्रिकोणी बनतो. प्रादुर्भावित भागातील फळांची आवरण तडकते. परिणामी नारळ लहान राहतात. काथ्याची प्रत घटते. तसेच लहान फळांची गळ होते.


काळया डोक्याची अळी:-

 अळया पानाच्या खालच्या भागावर जाळी तयार करुन पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात.


  या किडींच्या बरोबरच उंदीर सुद्धा नारळामध्ये नुकसान करतात. ते कोवळी फळे पोखरतात व त्यामुळे फळांची गळ होते. अशा पद्धतीने या किडींचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सर्व भागामध्ये आढळून येतो. जर यांचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करायचे असल्यास सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाय योजने गरजेचे आहे. 

संदर्भ-डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली 



*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱विजय साठे, सातारा 

🌱विकास धुमाळ बेकनाळ,गडहिंग्लज

🌱प्रशांत बागल सोलापूर

🌱सचिन लोणी.नगर

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing