नारळामधील किडी । Pest of Coconut | एकात्मिक व्यवस्थापन |

 🏫IPM SCHOOL🌱



महाराष्ट्रात नारळाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होत असून किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. कारण किडींच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला नारळ पिकामध्ये खूप नुकसान झालेले पाहायला मिळते. या लेखामधून आपण या किडींचे नियंत्रण कसे करावे हे बघूया. 


गेंड्या भुंगा:-

नारळावरील गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीने बागेतील मेलेल्या माडांची खोडे, कुजलेला पालापाचोळा इत्यादी जाळून नष्ट करावा किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. 

भुंग्याचा उपद्रव जास्त असताना म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये झाडाला उपद्रव झाला असताना किंवा त्यातून ताजा भुसा बाहेर येताना दिसत असल्यास त्यामध्ये तारेचा हूक घालावा व भुंगे बाहेर काढावेत.

नारळाच्या बागेत २ × २ × २ फूट आकाराचे एकूण १o खडे प्रती हेक्टरी खोदावेत. त्यामध्ये शेणखत भरून ठेवावे. अशा खड्ड्यांमधून सापडणा-या अळ्या दर दोन महिन्याने एकत्र करून माराव्यात किंवा खड्ड्यांवर कार्बारील ०.१ टक्केची फवारणी करावी. कीड नियंत्रणासाठी त्यामध्ये एन्टोमोपॅथोजेन म्हणजेच बुरशी (मेटारिझियम अॅनिसोप्लिया) खताच्या खड्ड्यांत घाला.

प्रौढ भुंग्याला पकडण्यासाठी कामगंध सापळे ४-५ प्रति एकर लावावे.

कडुनिंबाची पावडर + वाळू (1:2) @१५० ग्रॅम प्रति पाम किंवा कडुनिंबाच्या बियांची पूड + वाळू (1:2) @१५० ग्रॅम प्रति पाम यांचे मिश्रण शेंड्यातील 3 सर्वात आतील पानांच्या बेचक्यात/बुंध्याशी लावा.

दर तीन महिन्यांनी माडाचे निरीक्षण करून कोंबाशेजारच्या पहिल्या दोन पानांच्या बेचक्यात मिथिल पॅरॅथिऑन २ टक्के पावडर ५० ग्रॅम अधिक तेवढीच वाळू यांचे मिश्रण टाकावे. किंवा २५ ग्रॅम फोरेट १o जी हे दाणेदार कीटकनाशक छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन पिशवीचे तोंड बंद करावे. या प्लॅस्टिकच्या पिशवीस २ ते ३ छोटी भोके पाडावीत व सदर पिशवी माडाच्या वरून दुस-या  पानास बांधावी.


सोंड्या भुंगा:- 

प्रादुर्भाव झालेला माड वाचविण्यासाठी वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी माडाच्या खोडातून ज्या ठिकाणापर्यंत डिंक येत असेल. त्याच्या १.५ फूट वर गिरमिष्टाच्या साहाय्याने १० सें.मी. खोल तिरपे भोक पाडावे व त्यामध्ये १o मि.ली. मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही + १o मि.ली. पाणी यांचे मिश्रण नरसाळयाच्या साहाय्याने ओतावे. माडाच्या कोंबामध्ये उपद्रव असेल तर २२ ग्रॅम ५० टक्के कार्बारिल १ लीटर पाण्यामध्ये मिसळून किंवा २ मि.ली. ३० टक्के डायमेथोएट १ लीटर पाण्यात मिसळून द्रावण कोंबात ओतावे.

मुळावाटे औषध देण्यासाठी माडाचे पेन्सिलच्या जाडीचे तांबूस तपकिरी रंगाचे मूळ निवडून त्यास तिरपा काप द्यावा. मोनोक्रोटोफॉस १o मि.ली. + १o मि.ली. पाणी यांचे मिश्रण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन सदर मूळ या पिशवीत ठेवावे व पिशवीचे वरील उपाययोजना करण्यापूर्वी माडावरील सर्व पक्व नारळ काढून घ्यावेत व उपाययोजनेनंतर ४५ दिवसापर्यंत नारळ किंवा शहाळी काढू नयेत.

सोंड्या मुंग्यामुळे मेलेल्या माडांची ताबडतोब विल्हेवाट लावावी.

सोंड्या भुंगे आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळे ४-५ प्रति एकर वापर करावा. हा गंध ६ महिन्यांपर्यंत प्रभावी असतो. माडाच्या खोडला पायऱ्या करू नयेत. कारण अशा पायऱ्यांवर सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते. माडाच्या हिरव्या झावळ्या तोडू नयेत. आवश्यकता असेल तर देठापासून २ ते ३ फूट ठेवून तोडावी.


काळ्या डोक्याची अळी:- 

किडलेली पाने काढून त्यांचा नाश केल्यास किडीच्या प्रसारास अळा बसतो. काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर गरजेनुसार कार्बारील ०.१ टक्के किंवा डायक्लोरोव्हास ०.०५ टक्के यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी झावळ्यांवर करावी. फवारणी पानांच्या खालच्या बाजूस होईल याची दक्षता घ्यावी. जैविक नियंत्रणासाठी एका नारळाच्या झाडावर जर १२ अळया आढळून आल्या तर गोनिओस नेफॅटिडीसहा या अळीचा परोपजीवी कीटक ३,५०० प्रौढ कीटक प्रती हेक्टर या प्रमाणात बागेत झावळयांवर सोडाव्यात. फवारणी केल्यानंतर १५ दिवसांनी परोपजीवी किडी बागेत सोडाव्यात. 


चक्राकार पांढरी माशी:-

 या किडीचा प्रादुर्भाव मान्सूनच्या सुरुवातीला कमी असतो, त्यावेळी मित्रकिटकांची संख्या वाढण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे टाळावे. बुरशीची वाढ होऊन पूर्णपणे काजळीने काळपट पडलेल्या भागावर कपडे धुण्याची पावडरीचे ५ टक्के द्रावण किंवा १ टक्का स्टार्चचे द्रावण यांची फवारणी करून वरील थर घालवावा. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या खोडावर १ मी. उंचीवर पिवळ्या रंगाचे चिकट सापळे टांगावेत. वनस्पतिजन्य कीटकनाशकांपैकी तंबाखूचा ४ टक्के अर्क, निंबोळी तेल २ टक्के, निंबोळीच्या बियांचा अर्क ३ टक्के यापैकी कुठलीही फवारणी घेऊ शकता. जैविक कीटकनाशकांपैकी व्हटींसिलियम लिकॅनी या बुरशीची ५ ग्रॅम. प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

तीव्र प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी तेल ५% किंवा रासायनिक कीटकनाशकांपैकी लॅम्बडा सायहेलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ०.०५ टक्के किंवा सायपरमेथ्रिन १० टक्के प्रवाही ०.०१२५ टक्के यापैकी कोणतेही कीटकनाशक माडाच्या खालच्या देठाकडच्या पानावर फवारावे. सतत एकाच वर्गातील कीटकनाशकाची फवारणी टाळावी.


इरिआफाईड कोळी:-

  या किडीच्या नियंत्रणासाठी ५ कीटकनाशक ७.५ मि.ली. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाव्दारे एप्रिल ते मे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत वर्षातून तीन वेळा द्यावे.

नारळास ५० किलो कंपोस्ट, १० किलो निंबोळी पेंड व झिंक, बोरॉन, मॉलीब्डेनम व कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ग्रॅम प्रति झाड दरवर्षी द्यावीत.

१ टक्का कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१०,००० पी.पी.एम. अझाडिरॅक्टीन) ४ मि.ली. प्रति लीटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी.

 उंदरांच्या नियंत्रणासाठी जमिनीपासून २ मीटर उंचीवर ४० से.मी. रुंदीचा गुळगुळीत पत्रा बुंध्याभोवती बसवावा. १ भाग झिंक फॉस्फाईड व ५० भाग गव्हाचे पीठ यापासून केलेल्या आमिषाच्या गोळया पानांच्या बेचक्यात एक महिन्याच्या अंतराने टाक्याव्यात.झाडांना स्पर्श करणाऱ्या इतर फांद्या छाटाव्यात.

संदर्भ-TNAUआणिDr.BSKKV दापोली ब्लॉग.



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean