गुलाब पिकामध्ये येणाऱ्या किडी | Pest | Rose Farming |
काही शेतकरी सध्या गुलाब शेती करू लागले आहेत.कारण गुलाब फुलाला बाजारामध्ये चांगला भाव देखील मिळतो. सर्व पिकामध्ये ज्याप्रमाणे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे गुलाब पिकामध्ये सुद्धा होतो. शेतकऱ्याला जर पिकामध्ये येणाऱ्या किडी आणि रोगांची माहिती असेल तर सुरुवातीपासूनच त्या गोष्टींची काळजी घेऊन पिकाचे नुकसान वाचवू शकतो आणि सोबत कीड रोग प्रतिबंधासाठी होणारा खर्चही नियंत्रणात ठेऊ शकतो.
तर आज आपण गुलाब पिकामध्ये येणाऱ्या किडींची माहिती करून घेणार आहोत.
गुलाब पिकामध्ये येणाऱ्या महत्वाच्या किडी
खवलेकिड:-
ही अतिशय सुक्ष्म कीड असून ती स्वत भोवती मेणासारख्या चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यावर किंवा पानांवर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषण करते. या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास फांदया आणि पाने सुकून जातात.
मावा:-
या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ कोवळे शेंडे, कळ्या आणि पानांच्या मागील बाजूस पुंजक्याने राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने, शेंडे आणि कळ्या निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून वाळतात.
तुडतुडे
हे भुरकट हिरव्या रंगाचे कीटक पाने आणि फांद्याच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांची कडा प्रथम फिकट हिरवी होऊन नंतर पिवळट हिरवी आणि शेवटी लाल होते आणि पाने चुरघळतात.
फुलकिडे
हे भुरकट काळसर रंगाचे किडे पानांच्या मागील बाजूस तसेच झाडाच्या कोवळ्या भागावर राहून पाने आणि फुलांच्या पाकळ्या खरडतात आणि त्यातून पाझरणारा अन्नरस शोषून घेतात. फुलकिडींमुळे गुलाबाच्या झाडाची पाने आणि फुले आकसतात व वेळीवाकडी होतात.
पिढ्या ढेकूण:-
या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड फांद्याच्या खोबणीत, पानांच्या देठांच्या खोबणीत तसेच खोडावर पांढर्या पुंजक्याच्या स्वरुपात राहून झाडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे गुलाबाच्या कळ्या उमलत नाहीत. तर उमललेल्या फुलांच्या पाकळ्या सुकून गळून पडतात.
कळ्या खाणारी अळी
या अळ्या हिरवट राखाडी रंगाच्या असून त्यांच्या अंगावर उभे पट्टे असतात. या अळ्या कळ्या किंवा उमलणार्या फुलांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. अळ्यांचा अर्धा भाग कळीच्या बाहेर असतो.
लाल कोळी
हे लालसर रंगाचे लहान अंडाकृती किडे पानांच्या मागील बाजूस जाळी तयार करून त्यामध्ये राहतात आणि पानांतील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पिवळसर किंवा तांबूस डाग पडून पाने निस्तेज होऊन गळू लागतात. कीडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास पानावर मोठ्या प्रमाणात जाळी दिसून येते आणि पानगळही होते.
सूत्रकृमी
सूत्रकृमी हे अतिशय सुक्ष्म प्राणी असून ते उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाहीत. सूत्रकृमी ओलसर दमट जमिनीत राहतात. ही कीड गुलाबाच्या झाडाच्या मुळातून आत शिरते आणि अन्नरस शोषते. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडे खालून वर वाळत जातात. काही सूत्रकृमींमुळे पिकांच्या मुळांवर गाठी येतात, परिणामी झाडे पिवळी पडतात. त्यांची वाढ खुंटते आणि नंतर झाडे मरतात.
सर्वसाधारणपणे या किडी गुलाबामध्ये आढळून येतात.या किडींची ओळख गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला असायला हवी. पिकावर किडीचा प्रादुर्भाव किंवा पिकामध्ये कीड दिसू लागल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा सुरुवातीपासून एकात्मिक दृष्टिकोन ठेऊन कीड व्यवस्थापन केले तर नक्कीच किडीचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊन उत्पादन खर्चामध्ये सुद्धा बचत होईल.
स्रोत-कृषी जागरण
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा