हिरवळीची खते | फायदे | Benefits of Green Manure |

 *🏫IPM SCHOOL🌱*




जमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी जमिनीमध्ये शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत अशी वेगवेगळी सेंद्रिय खते जमिनीमध्ये द्यावी लागतात. त्यापैकी हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांच्या कोवळ्या फांद्या बाहेरून आणून मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढलेली पिके फुलोऱ्यावर आली असता शेतात नांगरून गाढून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांमधून तयार झालेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हटले जाते.

 या हिरवळी खतांसाठी कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो हे पाहूया. 

 

धैंचा:- या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावर ही गाठी निर्माण होतात. यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पती पेक्षा पाच ते दहा टक्के जास्त आहे.या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 इतके असते.  


 ताग:- ताग हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारी  हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर 60 ते 100 किलो प्रति हेक्‍टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. 


द्विदलवर्गीय पिके:- मुग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, गवार इत्यादी पिके फुलोरा आधीसुद्धा गाढून  चांगला फायदा मिळू शकतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.


हिरव्या कोवळ्या पानांची खते:- शेतात बांधावर किंवा पडीक जागेवर गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, मोगली इत्यादी पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा कोवळ्या फांद्या तोडून जमिनीत मिसळावीत.


गिरीपुष्प:- गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये 8.5 टक्के कर्ब,0.40 टक्के नत्र असते. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते.


हिरवळीच्या खताचे फायदे:-

* हिरवळीच्या खतामध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो.

* हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्य रासायनिक क्रियेने  विरघळुन ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.

* लवकर कुजणारे हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणि ऍझोटोबॅक्‍टर सारख्या जिवाणूंचे प्रमाण वाढते.

* जमिनीची जलधारण क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.

* द्विदल वर्गातील हिरवळीची पिके हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

* क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडल्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.

* हिरवळीच्या खताचे पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

* हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

 

 या सारख्या वेगवेगळ्या हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. त्याचबरोबर त्या जमिनीमधून घेतले जाणारे आपले उत्पन्नही वाढण्यास मदत होते. सध्या रासायनिक खतांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.या सर्व गोष्टींचा विचार नक्की करून हिरवळीच्या खतांचा वापर शेतीमध्ये करणे महत्वाचे आणि खूप उपयोगी ठरेल. 

स्रोत-कृषी जागरण 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean