भेंडी | फळ पोखरणाऱ्या अळी | एकात्मिक नियंत्रण |
🏫IPM SCHOOL🌱
भेंडी पिकावरही बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा, पाने खाणारी अळी, फळे पोखरणारी अळी यासारख्या किडींचा त्यामध्ये समावेश होतो. सर्व किडींमध्ये फळे पोकरणाऱ्या अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. भेंडी पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.
भेंडीमध्ये २ प्रकारच्या फळ पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
शेंडे व फळे पोखरणारी अळी(इयरीस व्हिटेला):-
* ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे. ती वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्ण तापमान या किडीला पोषक असते.
* अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. * सुरवातीच्या काळात या किडीची अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंड्याना पोखरून आत भुयार तयार करते.
* प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो. अळीने पोखरलेल्या कळ्या व फुले वाळून खाली पडतात.
* फळावर अळीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते, तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात. फळांची वाढ होत नाही. अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत.
फळे पोखरणारी अळी(हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा):-
* हि कीड बहुभक्षी असून, भेंडीशिवाय कापूस, तूर, टोमॅटो इ. अनेक पिकावर उपजीविका करते.
* प्रौढ मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फळावर ३०० ते ५०० अंडी देते.
* ५ ते ७ दिवसात या अंड्यातून बाहेर पडणारी अळी फळे पोखरून अनियमित आकाराची छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेऊन आतील भाग खाते.
* अळीची पूर्ण वाढ होण्यास १४ ते १५ दिवसाचा कालावधी लागतो.
* सामान्यतः अळीचा रंग हिरवट असतो. पिकानुसार अळीच्या विविध रंगछटा दिसून येतात. तिच्या शरीरावर तुरळक केस व तुटक अशा गर्द करड्या रेषा असतात.
* अळी जमिनीत झाडाच्या वेष्टणात कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवड्यापासून महिनाभर असू शकते.
एकात्मिक नियंत्रण:-
* कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावित.
* किडीच्या सर्वेक्षणासाठी १० कामगंध सापळे प्रति एक री लावावेत.
* शेतात एकरी १० पक्षी थांबे लावावेत.
* सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होऊन हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होईल.
* ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी प्रति ८-१० दिवसाच्या अंतराने करावी.
* वातावरणात आर्द्रता असल्यास बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी व्यवस्थापन होईल.
* फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, एचएएनपीव्ही (२५० एलई) या विषाणूजन्य कीटकनाशकाची ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
* रासायनिक कीटकनाशकाची फवारणी फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर पावसाची उघडीप असताना करावी.
आर्थिक नुकसान पातळी:-
शेंडा व फळ पोखरणारी अळी:- ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फळे.
फळ पोखरणारी अळी:- १ अळी प्रति झाड.
कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास रासायनिक औषधांची मदत घेऊ शकतो. त्यामध्ये शेंडा व फळ पोखरणारी अळीसाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.२७ ग्रॅम किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिलि. प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकता. तर फळ पोखरणारी अळीसाठी क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मिलि किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.६ मिलि.प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकतो.
कोणत्याही पिकामध्ये किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.म्हणजे पिकाचे नुकसान होणार नाही आणि कीड नियंत्रणासाठी होणारा खर्चही कमी होईल.
स्रोत-ऍग्रोवन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा