ऊस | Disease of Sugarcane | रोगांचा प्रादुर्भाव |

 🏫IPM SCHOOL🌱




ऊस हे महाराष्ट्रात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस हे बहूवर्षीय पीक आहे. 

महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या ३० रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये तांबेरा, पोक्का बोईंग, लालकूज, मोझेक, गवताळ वाढ, मर आणि पानावरील ठिपके या रोगांचा समावेश आहे. पिकामध्ये रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखता यायला पाहिजे तरच रोगाचे नियंत्रण होऊ शकेल. 

ऊसावरील प्रमुख रोग 

पोक्का बोइंग:-

 हा रोग हवेद्वारे पसरतो. मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. या रोगाची लागण सुरुवातील शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट, हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. या रोगाची तीव्रता आढळल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.


लाल कूज:-

हा रोग मातीमध्ये असलेल्या कॉलिटॉट्रिकम फॅलकॅटम ह्या बुरशीमुळे होतो. ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऊसावर आणि पानांवर दिसून येतो. लागण झालेल्या पानांचा रंग बदलतो. हिरवा ते नारिंगी नंतर नारिंगी ते पिवळा असा होतो. लाल रंगाचे ठिपके पानाच्या मध्य शिरेवर दिसतात. पाने खालून वर सुकत जातात. नंतर रोगग्रस्त ऊस फिकट रंगाचा आणि पोकळ होतो. लागण झालेल्या उसाचे मध्येच विभाजन केल्यास त्यातून आबंट वास येतो व अंतर्गत भाग लाल झालेला असतो. कधी-कधी आतल्या भागात काळ्या तपकिरी रंगाचा द्रव दिसून येतो.


तांबेरा:-

हा रोग पकसिनिया एरिअॅनथी या बुरशीमुळे होतो. रोगाचे बिजाणू हवेद्वारे पसरतात. पानाच्या दोन्ही बाजूस लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके आकाराने मोठे होऊन त्यांचा रंग तपकिरी ते नारिंगी-तपकिरी किंवा लाल- तपकिरी होतो. पूर्ण पान तांबेरायुक्त होते.


उसाची चाबूक काणी:-

हा रोग उस्टीललॅगो स्किटॅमिनिया या बुरशीमुळे होतो. हा रोग ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो. उसाच्या शेंड्यापासून २५-२५० सेंमी. लांबीची चंदेरी आवरण असणारा काळ्या पावडरने भरलेला चाबुकासारखा लांब पट्टा बाहेर पडतो. म्हणून या रोगाला चाबूक काणी म्हणतात. रोगाची लागण झालेला ऊस निरोगी उसापेक्षा लहान दिसतो. बाजूच्या बेटामधून भरपूर अंकुर फुटतो त्यातून निघालेली पाने सरळ आखूड असतात. हा रोग बेण्याद्वारे आणि रोगट खोडव्यापासून पसरतो. लागणीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते.


मर रोग:-

हा रोग मातीतील सेफॅलोस्पोरीम या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे उसाची निम्मी वाढ होईपर्यंत दिसत नाहीत. प्रथम पाने पिवळी पडतात व शेंड्यापासून वाळण्यास सुरुवात होते. उसाच्या आत पोकळी बनते, असा ऊस वजनाला हलका भरतो. लागण झालेल्या ऊसाची मुळे कुजतात आणि ऊस अलगदपणे उपटून येतो. शेवटी संपूर्ण ऊस वाळतो आणि मरतो. रोगग्रस्त ऊसातील आतला भाग हलके ते गडद जांभळ्या किंवा तपकिरी रंगाचा बनलेला असतो.


तपकिरी ठिपके:-

मान्सून हंगामात जास्त पावसाच्या भागामध्ये सरकोस्पोरा लाँजिपस बुरशीमुळे ऊसावर हमखास हा रोग आढळतो. सामान्यत: ७-८ महिने वयाच्या उसावर पानांच्या दोन्ही बाजूवर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.ठिपक्यांभोवती पिवळसर वलय दिसते. नंतर हे ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. अशा ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्लेषण होत नाही. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास ऊसाच्या कांड्याची लांबी व जाडी कमी होते.


अननस रोग:-

 हा रोग मातीत असलेल्या सेराटोसिस्टिस पॅराडोक्सा या बुरशीमुळे होतो. रोगाची लागण झालेल्या पानांच्या उती लाल रंगाच्या होतात. त्यानंतर त्या तपकिरी काळ्या रंगाची बनतात. दोन बेटांमध्ये पोकळी तयार होते. कांड्यामध्ये बुरशी असेल तर मुळे तयार होत नाही. रोगाची लागण झालेल्या कांड्या कुजतात आणि त्यातून पिकलेल्या अननसासारखा वास येतो.


गवताळ वाढ:-

हा रोग बेण्याद्वारे पसरतो. फायटोप्लास्मा या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होणारा रोग आहे. सुरुवातीची लक्षणे ३-४ महिन्याच्या रोपांमध्ये दिसतात. प्रथम उसाच्या पोंग्यातून बाहेर पडणारी पाने फिकट पिवळसर ते पांढरट रंगाची दिसतात. उसाच्या बुंध्याजवळ जमिनीलगत पांढरी व पिवळ्या रंगाचे असंख्य फुटवे येतात. रोगाट बेटात फुटव्यांची संख्या वाजवीपेक्षा जास्त असते. अशी बेटे खुरटी होतात. पाने आखूड, आकाराने लहान, टोकाकडे निमुळती होऊन ते गवताच्या ठोंबासारखे दिसते.या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा कीड तसेच रोगट बेण्यापासून होतो.


मोझ्यक:-

हा रोग विषाणूमुळे होतो. प्रथम उसाच्या पानावर रंगहीन टिपके दिसून येतात. काही वेळेस पिवळसर पांढऱ्या रंगाच्या रेषाही पानावर दिसून येतात. पानाचे हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळसर दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे चट्टे दिसून येतात. अशी पाने नंतर गाळून पडतात. उसाची वाढ खुंटते. हा रोग रस शोषणाऱ्या मावा किडीद्वारे पसरतो.

   सर्वसाधारण पणे या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला ऊस पिकामध्ये आढळून येतो. काही प्रमाणात आपल्याला लक्षणे दिसून आल्यास वेळेत नियंत्रक उपाय अवलंबणे गरजेचे आहे. 

संदर्भ-कृषी जागरण


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy