सेंद्रिय कर्ब । जमिनीमधील कार्य । उपलब्धतेची गरज । फायदे |

 *🏫IPM SCHOOL🌱*



*सेंद्रिय कर्ब*


जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. मातीचे आरोग्य मूल्यमापन करण्यासाठी कार्बन संबंधित विशिष्ट बेंचमार्क वापरले जातात. त्यात कार्बन डायऑक्साईडचे मुक्त होणे, ह्युमसची पातळी, सूक्ष्मजीव चयापचय या क्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात. 

 अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध होतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो. किंवा वातावरणातील कार्बनडाय आॉक्साईडसोबत मातीतील खनिजांची जी अभिक्रिया होते, त्या प्रक्रियेत आढळतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आहे. मातीच्या १२ टक्के ते १८ टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती असे संबोधतात. ५ ते २० टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (Rhizosphere) सूक्ष्म जिवांच्या कृतीद्वारे पुरवला जातो. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजिवांचे खूप मोलाचे योगदान असते.


*सेंद्रिय कर्ब किती असावा?:-*

 सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. हे गुणोत्तर जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय पदार्थ कुजण्यास वेळ लागतो. हे गुणोत्तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतात १२ः१ ते २०ः१ यादरम्यान अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६० टक्क्यांपेक्षा जास्त असावे.


*जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?

सेंद्रिय खतांकडे वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरविणारे स्राेत एवढ्यापुरतेच पाहू नये. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांचे मोठे महत्त्व आहे. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास रासायनिक जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील स्थिर झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्थितीत येतात. पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडीस शेणखत चांगल्या प्रतीचे कसे होईल याकडे लक्ष द्यावे.

ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्टखत तयार करावे. सेंद्रिय खत चांगले कुजवावे, अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल. बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला, तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून तणे, किडी, अपायकारक बुरशींचा प्रसार होतो, हे लक्षात घ्यावे.

सेंद्रिय खत आपल्या शेतावरच तयार करावे किंवा अर्धवट कुजलेल्या शेणखतापासून गांडूळखत तयार करावे.


*सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे:-*

* जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.

* जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

* हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.

* मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.

* रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.

* नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.

* रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.

* स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.

* जमिनीचा सामू उदासीन (६.५ ते ७.५) ठेवण्यास मदत होते.

* आयन विनिमय क्षमता वाढते.

* चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

* जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.

* सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व जिवाणूंचा जननक्रियेस गती प्राप्त होते. जैविक संख्येत वाढ होते.

* जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. * जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

* सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. उदा. युरिएज सेल्युलोज.


*जमिनीची सुपीकता कशी वाढवाल?*

* पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.

* शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी जमिनी मिसळावे.

* क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग जमिनीत पेरून दीड महिन्यात गाडावा किंवा उसात आंतरपीक म्हणून ताग पेरून गाडावा.

* उभ्या पिकांत निंबोळी पेंडीचा वापर करावा.

* पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. उदा. खोडवा उसात पाचटाचे नियोजन करावे.

* चोपण जमिनीत सेंद्रीय व रासायनिक भूसुधारकांचा (उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा वापर करावा.

* कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून जमिनीची धूप कमी करावी.

* जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात मिसळून योग्य प्रमाणात वापर करावा.

* ठिबक सिंचनाद्वारे किंवा तुषार सूक्ष्मसिंचनाद्वारे खतांचे नियोजन करावे.


* सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय पदार्थाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता वाढवली जाते. कारण कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय आम्लाची निर्मिती होते. त्यातून सूक्ष्म अन्नद्रव्यांना पकडून ठेवण्याची क्षमता सेंद्रिय आम्लाद्वारे वाढवली जातेय. पिकांच्या गरजेनुसार पुरवठा करण्यात येतो. या प्रक्रियेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होत नाही. त्यांची पिकांसाठी उपलब्धता व कार्यक्षमताही वाढवली जाते. 

स्रोत-ऍग्रोवोन (लेखक-महेश आजबे आणि विजय राऊत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..*👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean