हळद पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो | Diseases occur in the turmeric crop

 🏫IPM SCHOOL🌱


  हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? 

उत्तर:-

सध्या ऊन आणि पाऊस असे वातावरण सारखे बदलत असल्यामुळे हळद पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. 


कंदकूज (गड्डे कुजव्या)

हा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात.

भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगांस पोषक असते.ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.

लक्षणे:- कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लक्षणे त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीत कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. 


नियंत्रण

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.रोगाची तीव्रता जास्त असल्यास, हळदीच्या बुंध्याभोवती कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आळवणी करावी.आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा.आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.

गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी.

कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ (स्टिकर) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारावे.

पावसाळ्यात शेतामध्ये पाणी साचू नये, यासाठी चर घ्यावा. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.


पानांवरील ठिपके (करपा/ लिफ स्पॉट)

करपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो.   वातावरणात सकाळी धुके व दव पडत असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.

लक्षणे:- अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्‍यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. वाळून गळून पडते.

नियंत्रण

मॅंकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. जास्त दिवस धुके राहिल्यास, पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून १५ दिवसांच्या अंतराने करावी.


पानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच)

हा रोग टॅफ्रिना मॅक्‍युलन्स या बुरशीमुळे होतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यास प्रादुर्भाव होतो.

लक्षणे:- पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरवात जमिनी लगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.

रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.

कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम.

प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.


रोग नियंत्रणासाठी  महत्त्वाच्या गोष्टी

  • * हळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
  • * लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • * हळदपिकास लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहीत काढावीत. फुले काढल्यामुळे पूर्ण अन्नपुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.
  • * शिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी, त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.
  • * हळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.
  • * कंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्‍यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी २ ते ३ वर्षे सामुदायिकपणे कंदमाशीचे नियंत्रण करावे.

संदर्भ-ऍग्रोवन


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇*

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean