पपईमध्ये येणारे विषाणूजन्य रोग | रोगांचे व्यवस्थापन

 IPM




महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पपईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पपईमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न आणि चांगला नफा मिळते. पपईची लागवड केल्यावर शेतकऱ्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिकावर येणाऱ्या रोगाचे आणि किडीचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल.      

  पपईमध्ये रोगांमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पपईमध्ये वेगवेगळ्या विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांमुळे मोठे नुकसान होते त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.आज आपण पपई पिकामध्ये कोणकोणते विषाणूजन्य रोग येतात आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करता येईल हे जाणून घेणार आहोत. 

 

पपईमध्ये येणारे विषाणूजन्य रोग 

पपईवरील मोझॅक रोग (Papaya mosaic disease):- 

  झाडांच्या कोवळ्या पानांवर लक्षणे दिसतात. पानांचा आकार कमी होतो आणि गडद-हिरव्या टिश्यूच्या ठिपक्यांसारखे फोड दिसतात, पिवळसर-हिरव्या पातळ पत्र्यासारखा पातळ थर पानावर दिसून येतो. पानांची लांबी कमी होते आणि वरची पाने सरळ स्थितीत असतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडतात त्यामुळे फळाच्या वाढीवर परिणाम होतो. हा रोग साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये विकसित होऊन पसरतो. या रोगाच्या विषाणूचा प्रसार यांत्रिकरित्या म्हणजेच बागेमध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांच्या, अवजारांच्या माध्यमातून होतो.


 रिंग स्पॉट व्हायरस

पपईवरील रिंग स्पॉट व्हायरस हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.महाराष्ट्रात हा रोग मोठ्या प्रमाणावर पपई वर आढळून येतो. 

या रोगात पानावर पिवळसर चट्टे पडतात शिरा मात्र हिरव्या राहतात पाने आकसतात व पानाची तसेच झाडाची वाढ खुंटते. पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर तेलकट ठिपके दिसतात. फळधारणा कमी होते किंवा होत नाही. फळे न वाढता वाळून पडतात साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फळधारणा होते आणि फळांची वाढ होत असते त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. फळावर बांगडीच्या आकाराचे किंचित उठावदार ठिपके दिसतात सुरुवातीला ठिपक्याचा आकार एक मिलीमीटर असतो नंतर तो चार ते आठ मिलिमीटर होतो. फळाची वाढ होत नाही व ती वाकडीतिकडी होतात. या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असलेला विषाणू काकडी वर्गीय पिकात आढळतो आणि मावा या कीटकांमुळे या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.


 पपईवरील पाने आखडणे रोग (Papaya Leaf Curl Disease):-

  या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाची पाने आखडल्यासारखी आणि विकृत दिसतात. पानांचा हिरवटपणा कमी होतो आणि पानांचे शेंडे खालच्या दिशेने वळू लागतात तसेच शिरा जाड होतात. पाने चामड्यासारखे, ठिसूळ आणि विकृत होतात. झाडांची वाढ खुंटली जाते. रोगी झाडाला फुले व फळे येत नाहीत. कधीकधी झाडाच्या वरच्या भागावरील असलेली सर्व पाने या लक्षणांमुळे प्रभावित होतात. झाडाच्या वाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ रोखली जाते. या रोगाचा प्रसार पांढरी माशी द्वारे सहज पसरतो. 


एकात्मिक व्यवस्थापन:-

* पपई पिकाची लागवड करताना रोगांसाठी प्रतिकारक वाणाची लागवड करावी.

* पपईची लागवड करताना निरोगी रोपाची लागवड करावी.  

* पपईच्या रिंग रिंग स्पॉट व्हायरस या रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईची लागवड शेतात फेब्रुवारी महिन्यात करावी कारण फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या पपईवर माव्याचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. 

*  पपईची लागवड करताना रोगाच्या प्रतिबंधासाठी पपईच्या चारही बाजूने चार लाईन मक्याच्या लावा. 

* विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेलवर्गीय पिकामध्येही दिसून येतो त्यामुळे पपई बागेच्या जवळ कोणत्याही प्रकारच्या काकडी वर्गीय पिकाची लागवड टाळावी. 

* पिकामध्ये विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसून येताच रोगग्रस्त झाड उपटून ताबडतोब नष्ट करावे.

* पपई पिकावर रिंग स्पॉट व्हायरस या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्यामुळे या किडीच्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.  

* पपई पिकावर सर्वसाधारणपणे विषाणूजन्य रोग पसरवण्याचे प्रमुख कारण रसशोषक कीडचा प्रादुर्भावमुळे होतो.

* शेतात सुरुवातीपासून पांढरी माशी, मावा यासारख्या रसशोषक किडींच्या प्रतिबंधासाठी पिवळे - निळे चिकट सापळे एकरी साधारण 70-80 या प्रमाणात लावावेत. 

* निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी. 

* सुरुवातीपासून एकात्मिक दृष्टिकोन ठेऊन किड आणि रोगाचे नियंत्रण करा आणि कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 

* कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास शिफारसीत आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करू शकता. 

स्रोत - विकासपीडिया

*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*

🌱प्रदिप जाधव, पन्हाळा

*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*




एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean