ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management
ऊस पिकामध्ये बऱ्याच किडींमुळे नुकसान होते. शक्यतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रामुख्याने हुमणी कीड उसाची मुळे खाते त्यामुळे मोठे नुकसान ऊस पिकाचे होऊ शकते तसेच पावसाच्या दिवसामध्ये जास्त आर्द्रता आणि एकसारखा रिमझिम पाऊस त्यामुळे लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव सुद्धा अधिक प्रमाणात दिसून येतो.
ऊस पिकामध्ये लोकरी मावा ही एक गंभीर समस्या बनू शकते, विशेषतः जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरणात याचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. या किडीमुळे ऊसाचे रस शोषण होते, ज्यामुळे वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट येते. याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
ऊस पिकातील लोकरी मावा किडीचे व्यवस्थापन
प्रतिबंधात्मक उपाय -
* लागवडीसाठी नेहमी निरोगी आणि किडीमुक्त बेण्याचा वापर करा. लागवड करण्यापूर्वी बेणे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणात (उदा. इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथोक्झाम) बुडवून प्रक्रिया करून लागण करा.
* लोकरी माव्याला काही प्रमाणात सहनशील असलेले वाण (उदा. को-८६०३२, को-८०११, कोएम-०२६५ या वाणांमध्ये माव्याचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो) निवड करा.
* शेतात पाणी साचू देऊ नका. चांगल्या निचऱ्याची व्यवस्था करा, कारण जास्त आर्द्रता लोकरी माव्यासाठी पोषक ठरते.
* शेतातील आणि बांधावरील तणांचा बंदोबस्त करा, कारण काही तणांवर लोकरी मावा आश्रय घेतात.
* नत्रयुक्त खतांचा (युरिया) अतिवापर टाळा. नत्राच्या अतिवापरामुळे ऊसाची वाढ कोवळी होते, ज्यामुळे मावा आकर्षित होऊ शकतो.
* शेतातील ऊसाचे अवशेष लगेच नष्ट करा, जेणेकरून किडींना पुढील हंगामात आश्रय मिळणार नाही.
* सुरुवातीच्या काळात लोकरी माव्याने जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या ऊसाच्या पानांना किंवा पानांच्या खालच्या बाजूस असलेले माव्याचे पुंजके कापून नष्ट करा.
जैविक नियंत्रण:
जैविक नियंत्रण लोकरी माव्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण याचे अनेक नैसर्गिक शत्रू उपलब्ध आहेत.
* लोकरी माव्याला खाणारे अनेक मित्र कीटक निसर्गात उपलब्ध आहेत.
लेडीबग भुंगेरे,सिरफिड माश्यांच्या अळ्या,क्रायसोपर्ला हे माव्याला खातात. या सोबत कोनोबाथ्रा हा मित्रकीटक तर लोकरी माव्याचे नियंत्रण अतिशय प्रभावी करतो. त्यामुळे शक्य असल्यास मिटकीटक पिकामध्ये सोडल्यास चांगल्या पद्धतीने किडीचे नियंत्रण शक्य आहे.
* ब्यूवेरिया बेसियाना ही एक बुरशी आहे जी माव्याच्या शरीरात शिरून त्याला मारते. ३-४ ग्रॅम/मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* व्हर्टिसिलियम लेकानी हा देखील एक प्रभावी जैविक बुरशीनाशक (२-४ ग्रॅम/मिली प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
* ५% निंबोळी अर्क (निम तेल - अझाडीरॅक्टिन १५०० पीपीएम) २५-३० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. हे माव्याला अंडी घालण्यापासून परावृत्त करते आणि त्यांची वाढ थांबवते.
रासायनिक नियंत्रण:
* रासायनिक कीटकनाशकांचा वापर अत्यंत गरजेनुसार आणि शिफारशीनुसारच करावा, कारण यामुळे मित्र किटकांनाही नुकसान पोहोचू शकते.
* शेतात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव नियमितपणे तपासून जर किडीचे प्रमाण जास्त असेल आणि मित्रकीटकांची संख्या कमी असेल तरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकांमध्ये डायमेथोएट ३०% ईसी१०-१२ मिली प्रति १० लिटर पाणी, थायमेथोक्झाम २५% डब्ल्यूजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी, इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल ४-५ मिली प्रति १० लिटर पाणी. प्रमाणे फवारणी करावी.
एकाच कीटकनाशकाचा पुन्हा पुन्हा वापर टाळा, कारण यामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. वेगवेगळ्या रासायनिक गटांतील कीटकनाशके आलटून पालटून वापरा.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
भागीनाथ आसने, अ. नगर
महेश शिरपुरे,
क्रुषिभूषण सयाजीराव गोपाळराव पोखरकर कोतूल ता.अकोले जि.अहिल्यानगर
आनंद भास्करराव अजमिरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
पुंडलिक कैलास तांदळे,
महेंद्र आत्माराम जगताप, विटा खानापूर सांगली
दिव्यकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPM #gogreen #sugarcane #pest #sugarcanefarming #woolyaphids #management #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा