*रासायनिक औषधे/कीटकनाशके वापरण्याच्या पद्धती | Methods of using pesticides | Pesticides use | protecting farm |

 शेतकरी चांगले उत्पन्न मिळण्यासाठी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची औषधे,रसायने वापरतो. पिकावरील कीड नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो.वेगवेगळ्या पिकामध्ये पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार रासायनिक औषधांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. 

   पिकावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांचा कीटकनाशकांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. 



*रासायनिक औषधे/कीटकनाशके वापरण्याच्या पद्धती:-*

१)धुरळणी:-

भुकटी स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर धुरळणी करण्यासाठी केला जातो. यामध्ये कीटकनाशकांचे १ ते १० टक्के प्रमाण असून ती पावडर स्वरूपात असतात. धुरळणी प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी हवा शांत असताना करणे गरजेचे आहे. 


२)फवारणी:-

या पद्धतीचा वापर शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर करताना पाहायला मिळतात.यामध्ये द्रव स्वरूपात किंवा पावडर स्वरूपात कीटकनाशके मिळत असून पाण्यामध्ये मिसळून फवारणी पंपाद्वारे किंवा यंत्राद्वारे पिकावर फवारली जातात.फवारणी केल्यामुळे पिकावर आलेल्या किडीवर औषधाचा सम प्रमाणात फवारा केल्यामुळे किडीचे नियंत्रण करणे सोपे होते. 


३)दाणेदार स्वरूपातील कीटकनाशकांचा वापर:-

या पद्धतीमध्ये कीटकनाशके आपल्याला दाणेदार स्वरूपात मिळतात. ती सर्वसाधारणपणे जमिनीवर किंवा मशागत करताना मातीमध्ये टाकली जातात. काही वेळेस खोडकिडीचा नियंत्रणासाठी पिकाच्या पोंग्यामध्ये सुद्धा दाणेदार कीटकनाशकांचा वापर केला जातो. जमिनीमधील किडींच्या नियंत्रणासाठी यासारख्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. 


४)बीजप्रक्रिया:-

कोणत्याही पिकाची पेरणी करताना बीजप्रक्रिया केली जाते त्यामुळे बियांवर किडीचा,बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पिकाची वाढही जोमदार होते. या पद्धतीने वापर केल्यास सुरुवातीपासून किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. नुकसान झाल्यानंतर होणार खर्चही वाचेल आणि पीकही चांगले येईल. 


५)रोपांची मुळे कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवणे:-

भाजीपाला,भात किंवा मिरची यासारखी पिकाची लागवड करताना त्यांची रोपे किंवा रोपांची मुळे कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवल्यामुळे रोपांच्या मुलावर किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि रोपे लवकर सेट होतात. 


६)खोडामध्ये इंजेक्शन देणे:-

किडींनी खोडामध्ये केलेल्या छिद्रामध्ये तसेच मऊ खोडामध्ये इंजेक्शन द्वारे कीटकनाशक देऊन ते छिद्र मातीने बंद केले जाते. त्यामुळे खोडामध्ये असलेली कीड आताच मारून जाते आणि किडीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण केले जाते. 


७)मुळांद्वारे कीटकनाशकांचा पुरवठा करणे:-

या पद्धतीचा वापर प्रामुख्याने नारळ झाडामध्ये कीड नियंत्रणासाठी केला जातो.प्लास्टिक पिशवीमध्ये कीटकनाशक आणि पाण्याचे मिश्रण घेऊन नारळाच्या झाडाच्या कोवळ्या मुळांना तिरका काप देऊन पिशवीतील द्रावणात बुडवून देऊन ती पिशवी मुळांना बांधून टाकावी.त्यामुळे हे द्रावण मुळांद्वारे शोषले जाऊन किडींचे नियंत्रण होते. 


८)आमिष:-

किडींच्या आवडत्या खाद्य पदार्थाचा किंवा आकर्षित करणाऱ्या पदार्थांचा आणि कीटकनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रण करता येते. यामध्ये आपल्याला उंदीर किंवा फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या सापळ्यांचे उदाहरण देता येईल. 


९)सिंचनाद्वारे कीटकनाशकांचा वापर:-

यामध्ये आपल्याला ठिबक सिंचनाद्वारे किंवा अळवणीद्वारे कीटकनाशक,बुरशीनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रण करता येऊ शकते. 


१०)धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर:-

या पद्धतीमध्ये वापरली जाणारी कीटकनाशके वायुरूप किंवा प्रचंड दाबाखाली द्रवरूप अवस्थेमध्ये वापरली जातात. साधारणपणे या पद्धतींचा अवलंब करून साठवणुकीच्या धान्यामध्ये येणाऱ्या किडीचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते.  

   कोणत्याही पिकामध्ये येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी या पद्धतींचा प्रभावी वापर करता येईल.म्हणजेच काय तर पीक प्रकार आणि त्यांच्या वाढ अवस्थेप्रमाणे या पद्धतींचा अवलंब किड नियंत्रणासाठी करू शकतो. 

संदर्भ-भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने. 


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean