भाजीपाला | फळधारणा कमी होण्याची कारणे | Cause of Fruit setting in vegetables




फळे तसेच भाजीपाला पिकामध्ये भाजीचे उत्पादन हे प्रामुख्याने फळाच्या संख्येवर अवलंबून असते. फुले व फळांची गळ होणे किंवा फळधारणा न होणे अशा विविध कारणांमुळे फळांची संख्या कमी होऊ शकते.त्याच पद्धतीने हंगाम, जमिनीची निवड, जातीची निवड, हवामान आणि हवामानातील बदल, अन्नद्रव्यांचे प्रमाण, पाण्याचा अयोग्य वापर, रोग व किडींचा उपद्रव किंवा वनस्पतीमध्ये आवश्यक त्या अन्नद्रव्याचा अभाव, परागीभवन न होणे इत्यादी अनेक कारणांमुळे भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा कमी होऊ शकते.


फळधारणा कमी होण्याची कारणे:-


* फळधारणा होण्यासाठी झाडांवर फुले येणे, फुलामधील पुंकेसर आणि स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत असणे, परागीभवन होणे, परागीभवन आणि फळधारणा होण्यासाठी आवश्यक तापमान, अन्नद्रव्य आणि पाणी यांचे आवश्यक ते प्रमाण असणे महत्वाचे असते. 


* पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुले येण्यासाठी ठराविक तापमान, दिवसाची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची आवश्यकता असते. त्यांची पूर्तता न झाल्यास झाडांना फुले येत नाहीत आणि फळधारणा होत नाही.


* वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात. नर फुले आधी येतात आणि मादी फुले नंतर येतात. परपरागीकरण झाल्याशिवाय फळधारणा होत नाही. परपरागीकरणाचे काम मधमाशा, फुलपाखरे, वारा इत्यादी माध्यमातून होते. त्यांचा अभाव असल्यास फळधारणा कमी होते.


* टोमॅटो, वांगी या भाजीपाला पिकामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत येऊन फळधारणा होण्यासाठी ठराविक तापमान आवश्यक असते. तापमान खूप कमी अथवा खूप जास्त असल्यास फळधारणा होऊ शकत नाही आणि फुलांची गळ होते.


* कांद्याच्या पिकामध्ये बीजोत्पादनात पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच वेळी तयार होत नाहीत त्यामुळे परपरागीकरण आवश्यक असते. मधमाशांचा अभाव असल्यास आणि परपरागीकरण न झाल्यास कांद्यामध्ये बीजधारणा कमी होते.


* फुले व फळधारणा होताना मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची आणि पाण्याची आवश्यकता असते. याची कमतरता असल्यास फुलांची, फळांची गळ होते आणि फळधारणा होत नाही.


* परपरागीकरण घडवून आणणार्या मधमाशांना अपायकारक ठरतील अशी किटकनाशके पिकावर फवारल्यास मधमाशांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे परपरागीकरण कमी होते. अधिक तापमानात मधमाशांची कार्यशक्ती घटते आणि त्याचा अनिष्ट परिणाम फळधारणेवर होतो.


* परपरागीकरणामार्फत फळधारणा होणार्या भाजीपाला पिकांवर भुकटी स्वरूपातील किटकनाशकांचा वापर केल्यास पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संपर्क येण्यास अडथळा निर्माण होतो, अशा वेळी फळधारणा होऊ शकत नाही. 


* फळधारणा होण्यास आवश्यक त्या संजीवकांचे पुरेसे प्रमाण झाडात तयार झाले नसल्यास फळधारणा होत नाही आणि फुले आणि फळांची गळ होते.


* काही किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे फळधारणा होऊ शकत नाही.


* फुलांची संख्या जास्त असल्यास सर्वच फुलांना व फळांना पुरेल एवढे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने काही वेळा फुले व फळे गळतात आणि काही फुलांमध्ये फळधारणा होत नाही.


* अयोग्य रसायनांचा पिकावर वापर केल्याने किंवा काही रसायनांचा अतिरेक झाल्याने किंवा त्यांचे अधिक प्रमाण वापरल्यानेही फूलगळ होऊन फळधारणा कमी होऊ शकते.

संदर्भ - भूसंवर्धन. 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean