*अमावस्येच्या आधी किंवा नंतर कीटकनाशक फवारणी-विज्ञान की अंधश्रद्धा...??*| Right Time Of Pesticide Spraying| Pest management


नमस्कार शेतकरी मित्रहो

सोयाबीन-कपाशी(कापूस) पिके सध्या जोमात आहेत. लागवडीपासून कापणीपर्यंत विविध किडींचा पिकावर प्रादुर्भाव होत असतो. पिकामध्ये कीडीच्या उपद्रवाचे प्रमाण पाहून आपण शिफारशीत कीटकनाशके फवारत असतो. पण अनेकवेळा आपण ऐकले असेल की अमावस्याच्या दिवशी किंवा पुढे मागे दोन दिवस पिकावर कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. पण त्यामागचं कारण माहिती नसल्यामुळे अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. असं वाटणं ही स्वाभाविकच आहे. कारण कोणत्याही गोष्टीत अमावस्या-पौर्णिमा हा विषय घुसडला की अंधश्रद्धा डोकं वर काढतेच.

            सोयाबीन,टोमॅटो,वांगी,कापूस,कोबी,मक्का,अशा अनेक पिकावर येणाऱ्या विविध किडी जसे पाने खाणारी अळी(Spodoptera litura),घाटेअळी(Helicovorpa armigera),या लेपीडोप्टेरा (Lepidoptera) वर्गातील असतात. या सर्व किडिंची पतंग व अळी अवस्था निशाचर असते. ते रात्रीच्या वेळी जास्त  सक्रिय असतात. त्यामुळे किडीचे मादी पतंग रात्रीच्या वेळी अंडी घालत असतात. मग अमावस्येच्या वेळी असं काही वेगळं होत का?? तर नाही वेगळं अस काही होत नाही पण अमावस्येच्या रात्री अंधार पडण्याची वेळ थोडीशी वाढते,चंद्र उगवून येत नाही त्यामुळे किडीचे पतंग थोडे जास्त सक्रिय होतात आणि त्यांचे अंडी देण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्यांनी वाढते.परिणामी अमावस्ये नंतर पुढच्या काही दिवसात शेतामध्ये किडीची अंडी व अळी अवस्था काही प्रमाणात वाढलेली दिसते.किडीचे जीवनचक्र हे पतंग-अंडी-अळी- कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थामधून पूर्ण होत असते. 30 ते 40 दिवसांत पूर्ण होणाऱ्या या जीवनसाखळीमध्ये किडींची संख्या अनेक पटीने वाढत असते कारण एका वेळी शेकड्याच्या पटीत अंडी दिली जातात. एका वर्षात 10 ते 12 पिढ्या जन्म घेत असतात. त्यामुळे दर रात्री किडींच्या पतंगाचा वावर हा असतोच फक्त अमावस्येच्या रात्री अंधाराची वेळ वाढते,गडद अंधार असतो म्हणून किडी जास्त सक्रिय होतात व अंडी देण्याचे प्रमाण थोडे वाढते. पण प्रत्येक वेळी अमावस्येनंतर कीड वाढतेच असं नाही कारण किडीचे पतंग हे सतत प्रवासात असतात. उदा.अमेरिकन लष्करी अळीचा पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे जागोजागी अंडी घालत ते पुढे जातात. मग अंडी घातलेल्या क्षेत्रात त्या किडीचे प्रमाण वाढेल असते.तेव्हा अमावस्या असो अगर नसो.  

 ●त्यामुळे शेतातील किडींच्या संख्येचे आठवड्यातून दोन वेळा निरीक्षण करणे गरजेचे आहे. 

 ● पिकाच्या सुरवातीपासून संभाव्य किडी ओळखून त्यासाठी सर्वेक्षनासाठी एकरी किमान 10 सापळे लावून घ्यावेत.मग सापळ्यात सापडणाऱ्या पतंगांच्या संख्येवरून शेतातील किडीचे प्रमाण समजते. पहिल्या 8 दिवसात सरासरी प्रत्येक सापळ्यात 2 ते 3 पतंग सापडत असतील तर कीड शेतामध्ये थोड्या प्रमाणात आहे अस समजावं. जर 8 ते 10 किंवा त्यापेक्षाही अधिक सापडत असतील तर मग सापळ्यांची संख्या वाढवावी किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापनातील इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून  कीड नियंत्रण करावे.

 ● अमावस्येच्या आधी व नंतर दोन दिवस सापळ्यांचे निरीक्षण करावे. म्हणजे खरंच अमावस्येनंतर किडीचे प्रमाण वाढले आहे की नाही हे समजून घेता येईल.


https://www.facebook.com/groups/522198518657687/permalink/801421874068682/


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing