Thrips | Attack in Onion | फुलकिड्यांचे कांदा पिकामध्ये नुकसान | Management
उत्तर:-
महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कांदा पिकामध्ये प्रामुख्याने फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो.पण थ्रिप्स कांदा पिकामध्ये कशाप्रकारे नुकसान करतात हे आज आपण पाहूया.
फुलकिडे (शा. नाव:- थ्रिप्स टॅबसी)
* सर्व अवस्थेत येणारी व सर्वाधिक नुकसान करणारी प्रमुख कीड. या किडींची जास्त संख्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत असते.
ओळख व नुकसान:-
* फुलकिडे पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात.
* पिले व प्रौढ पानातील रस शोषतात. त्यासाठी असंख्य चावे घेतल्याने पानांवर पांढुरके ठिपके पडतात. (त्याला शेतकरी ‘टाक्या’ म्हणतात.)
* असंख्य ठिपके जोडले जाऊन पाने वाकडी होतात व वळतात.
* रोपावस्थेतील प्रादुर्भावामुळे पाने वाळून कांदे पोसत नाहीत.
* कांदा तयार होत असताना प्रादुर्भाव झाल्यास माना जाड होतात. कांदा साठवणीत टिकत नाही.
* फुलकिड्यांनी केलेल्या जखमांतून काळा करपा या रोगांच्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. फुलकिड्यांमुळे कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के घटू शकते.
एकात्मिक पीक संरक्षण:-
* पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये.
* रोपे नेहमी गादीवाफ्यांवर लावावीत.
* प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी.
* कांदा पुनर्लागवडीआधी १५ दिवस शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावाव्यात. या सजीव कुंपणामुळे फुलकिड्यांचा उपद्रव कमी होतो.
* रोपांची मुळे लागवडीपूर्वी दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम व कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.
* हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी.
* दोन हंगामांमध्ये अधिक काळ अंतर राखून रोग, किडींचा जीवनक्रम तोडता येईल.
* रोपवाटिकेत व शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी हेक्टरी १.२५ किलो ५०० किलो शेणखतात १५ दिवस आधी मिसळून जमिनीत टाकावे.
* एकात्मिक पद्धतीने पीक संरक्षण करताना पिवळे-निळे चिकट सापळे वापरावे. या पिकामध्ये वापरताना पिवळ्या पेक्षा निळे चिकट सापळे जास्त प्रमाणात लावावेत.
* कीडनाशके शिफारशीनुसार आलटून पालटून वापरावीत. एकच कीडनाशकसारखे वापरल्यास किडींची प्रतिकारशक्ती वाढते.
* सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
* लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ ते ७० टक्के आर्द्रता असताना, व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.
* जास्त प्रादुर्भाव दिसू लागल्यास रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनिल (५ एस. सी.) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिली.फवारणी करावी सोबत प्रतिलिटर १ मिली उत्तम दर्जाचे चिकटद्रव्य कीटकनाशकासोबत मिसळावे.
संदर्भ-ऍग्रोवन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा