Thrips । फुलकिडे । How to control thrips | Sucking Pests| Thrips in onion



फोटो मधील कीड ही थ्रीप्स(Thrips tabcai) म्हणजेच फुलकिडे आहेत*

 फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.


*यजमान पिके व वातावरण:-*

प्रामुख्याने रब्बी हंगामात फुलकिडे कांदा,मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरडी हवा आणि पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते.


*जीवनचक्र:-*

 आकाराने अत्यंत लहान. पूर्ण वाढ झालेल्या फुलकिडीचा आकार सुमारे १ मिलीमीटरपर्यंत असतो.

 रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात.

 मादी पानावर पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. त्यामधून चार ते सात दिवसांत पिले बाहेर पडतात. पिल्लांचा जगण्याचा कालावधी साधारणपणे सहा ते सात दिवसांचा असतो. डिसेंबर महिन्यात २३ दिवसांपर्यंत असू शकतो.

 पिले आणि प्रौढ रात्रीच्या वेळी पाने खरडून पानातून येणारा रस शोषतात. परिणामी पानांवर पांढुरके ठिपके दिसतात, त्यालाच शेतकरी ‘टाक्या’ म्हणून ओळखतात. नंतर पाने वाकडी होऊन वाळतात.

 पिकाच्या सर्वच अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपावस्थेत फुलकिडी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळून कांदे पोसत नाहीत,मिरचीची पाने वाकडी होतात. पानावर झालेल्या जखमांमधून काळा करपा, जांभळा करपा अशा बुरशीचा पानात सहज शिरकाव होतो.  


 कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात फुलकिडे वेगाने वाढतात.पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.


*नियंत्रण उपाययोजना:-*

•कांदा पिकाची तृणधान्य किंवा गळीत पिकासोबत फेरपालट करावी.

•लावणीपूर्वी पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावाव्यात, त्यामुळे फुलकिडीचा उपद्रव कमी होतो.

• पिकामध्ये एकरी 60 ते 70 निळे चिकट सापळे लावावेत,ज्याकडे थ्रीप्स आकर्षित होऊन चिकटतात.

•लागवड करतेवेळी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिली प्रतिलिटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून लागवड करावी.


किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच,

 सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.

 लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ ते ७० टक्के आर्द्रता असताना, व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.त्यामुळे थ्रीप्स रोग ग्रस्त होऊन नैसर्गिकरित्या नियंत्रित होतात.

तीव्र प्रादुर्भाव असल्यासच, रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)

फिप्रोनिल (५ एस. सी.) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिली.

टीप ः फवारणी करतेवेळी प्रतिलिटर १ मिली उत्तम दर्जाच्या चिकटद्रव्य कीटकनाशकासोबत मिसळावे.  


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy