मक्क्यावरील अमेरिकन लष्करी अळी | FAW | Maize pest |



मक्क्यावरील अमेरिकन लष्करी अळी


 शास्त्रीय नाव:- Spodoptera frugiperda(Fall army worm)


 महत्वाचे:-  या किडीच्या पतंगाची उडण्याची क्षमता खूप जास्त असते. पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे या किडीचा मोठ्या प्रमाणात फैलाव होतो.


 *जीवनचक्र:-* 

ही बहुभक्षीय कीड पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थामधून आपले जीवनचक्र पूर्ण करते. किडीचे पतंग राखाडी तपकिरी रंगाचे असतात. मादी पतंग एकावेळी 200-300 च्या समूहात अंडी देतात व संपूर्ण मादी अवस्थेत 1500 ते 2000 अंडी देऊ शकतात. 3 ते 4 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी  6 वेळा कात टाकून पूर्ण वाढते. अळी राखाडी रंगाची आणि त्यावर काळे ठिपके असतात. अळीच्या डोक्यावर उलट्या आकाराचे 'Y'  असते व पाठीच्या शेवटी चार काळे गडद ठिपके असतात त्यामुळे या अळीचे वेगळेपण लक्ष्यात येते. 15 ते 20 दिवसात अळी अवस्था पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेली अळी मातीमध्ये,पाल्यापाचोळ्यात कोषावस्थेत जाते.लालसर तपकिरी रंगाच्या कोषातून 5 ते 6 दिवसात पतंग बाहेर पडतो. 


 *नुकसान:-* 

ही कीड मक्का पिकाच्या सर्व अवस्थामध्ये उपद्रव करते.पतंग पानावर अंडी देतो.त्यामधुन बाहेर आलेली अळी आजूबाजूच्या झाडांवर जाते. अळी खात-खात पानाच्या आतमध्ये शिरते.सुरवातीस पिकाचा कोवळा भाग खाते.त्यानंतर कणीस पोखरते.त्यामुळे कणसे खराब होऊन सडायला चालू होतात. अळी खात असताना मागे विष्ठा सोडत असते.पाने कुरतडून टाकलेला भुसा व अळीची विष्ठा  पानावर पडल्यामुळे अळीचा उपद्रव सहज ओळखून येतो. जर वेळीच प्रतिबंध किंवा नियंत्रण उपाय न केल्यास 50 ते 60% नुकसान होऊ शकते.


 *एकात्मिक कीड व्यवस्थापन:-* 

* या किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः मक्क्यावर दिसून येतो. त्यामुळे मक्का हे पीक एकसारखे घेऊ नये. पीक फेरबदल करावे.

* पीक पेरणी उशिरा करणे टाळावे.शक्यतो वेळे आधी पेरणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

* शेत व बांध तणमुक्त ठेवावे.

* रासायनिक खतांचा वापर संतुलित ठेवावा.नत्र युक्त खतांचा अतिवापर टाळावा.कारण नत्रयुक्त खतांचा अतिप्रमाणात वापर केल्याने किडीचे पतंग अंडी घालण्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतो.

* सुरवातीस दिसणारे अंडीपुंज,लहान अळ्या शेताबाहेर नष्ट कराव्यात.

* एकरी 10 ते 12 पक्षीथांबे लावावेत जेणे करून अळ्या पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष्य बनतील.

* शक्य असल्यास पोंग्यामध्ये वाळू टाकावी,त्यामुळे आतील अळी तिथेस मरून जाईल.

* ट्रायकोग्रामा या मित्र किडीची अंडी एकरी 1 लाख या प्रमाणात सोडावीत.ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक लष्करी अळीच्या अंड्यामध्ये आपली अंडी देतो. त्यामुळे किडीची अंडी अवस्था नष्ट केली जाते.

* तसेच विषाणू(NPV),जीवणूजन्य(BT) किंवा बुरशीजन्य(Metarhizium anisopliae) कीटकनाशकांचा उपयोग करून अळीस रोगग्रस्त करता येते. त्यामुळे पर्यावरण पूरक व्यवस्थापन होते.

* प्रभावी नियंत्रणासाठी पिकामध्ये पेरणीनंतर 15 दिवसामध्ये कामगंध सापळे एकरी 10 ते 12 FAW ल्युर व फनेल ट्रॅप  लावावेत.त्यामध्ये किडीचे नर पतंग पकडून जीवनसाखळी तोडली जाते.

* जेव्हा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात आहे असे जाणवेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा आधार घ्यावा. 



*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..*👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean