आंबा | फळगळ समस्या | Fruit Dropping | Problem & Management |
*आंब्याची फळगळ होण्याची कारणे*
राज्यातील बऱ्याच भागामध्ये बदलत्या हवामानामुळे आणि विविध कीड व रोगांमुळे आंबा फळांची गळ हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फळगळीच्या विविध कारणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. आंबा बागेत एकाच जातीची झाडे लावल्यास ४० - ५० टक्के संयुक्त फुलांचे परागीकरण होत नाही. परिणामी त्यांचे फक्त अंडाशय वाढून गळ होते. त्यामुळे आंबा बाग लावताना १० टक्के इतर जातीची झाडे लावणे महत्त्वाचे ठरते.
* पुनर्मोहरामुळे देखील आंबा फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होताना दिसून येत आहे. ज्या बागांमध्ये नुकतीच फळधारणा सुरू झाली आहे तेथे ताबडतोब ५० पीपीएम (५० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) जिब्रेलिक ऍसिडची फवारणी केल्यास फळगळ रोखण्यास मदत मिळणार आहे.
* बहुतांश आंबा झाडांची फळगळ ही अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होते. अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते. ही फळगळ रोखण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तसेच फळांच्या विविध अवस्थेत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक एन ए ए २० पीपीएम (२० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
* बऱ्याच आंबा झाडांना सुरवातीच्या अवस्थेत आवश्यकतेपेक्षा जास्त फळधारणा होत असते. सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडामध्ये नसते. त्यामुळेही फळगळ होताना दिसते. फळे पोसण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
* आंबा फळांची वाढ होण्यासाठी व फळगळती थांबविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. वाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. त्यामुळे आंबा फळे वाटाणा आकाराची झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने तापमानवाढीचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा. जेणेकरून फळगळ थांबणे सोईचे होईल.
* काही वेळा तापमानात अचानक वाढ झाल्यास फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत असते. अशावेळी मोठी फळेदेखील गळून पडतात. अशावेळी त्वरित संरक्षित सिंचन करावे. त्यामुळे बागेतील तापमान कमी होऊन फळगळ थांबविणे शक्य होते.
* काही बागांतील आंबा झाडांवर बोर, लिंब एवढ्या आकाराची फळे व मोहर तसेच नवीन पालवी तिन्ही एकाचवेळी दिसत आहे. नवीन पालवी अन्नद्रव्य ओढून घेत असल्यामुळेही फळांच्या पोषणासाठी अन्नद्रव्य कमी पडून फळगळ होत आहे. अशावेळी होणारी फळगळ रोखण्यासाठी १२:६१:० या विद्राव्य खताची २ टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. गळून पडलेली फळे वेचून बागेबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळणे सोईचे होईल.
* रोग नियंत्रण:- भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डिनोकॅप १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी घेऊन फवारणी करावी तर करपा रोग नियंत्रणासाठी कॅप्टन २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
संदर्भ-अग्रोवोन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा