ज्वारी | मिजमाशी प्रादुर्भाव | Midge Fly control |
*मिज माशी *
*शास्त्रीय नाव:-* स्टेनोडिप्लोसिस सोर्घीकोला
*जीवनचक्र:-*
मिज माशीची लांबी १·५–२ मिमी. असते. शरीराचा रंग लाल ते केशरी यांच्या दरम्यान असतो. डोके पिवळ्या रंगाचे व पाय तपकिरी रंगाचे असतात.नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो. मादीचा मागचा भाग निमुळता होत गेलेला असून त्याद्वारे मादी फुलांमध्ये अंडी घालते. मादी एका वेळी ३०–१०० अंडी घालते. अंडी सुरुवातीला पिवळसर असून नंतर गर्द तपकिरी होतात. त्यांतून २–५ दिवसांत अळ्या बाहेर पडतात. अळ्या ज्वारीचे तयार होत असलेले दाणे खाऊन जगतात. त्यामुळे कणसात दाणे तयार होत नाहीत. अळी दोन-तीन वेळा कात टाकते आणि त्याची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढलेल्या अळीचा रंग गर्द केशरी असतो. दोन-तीन दिवसांत अळी कोशावस्थेत जाते. कोशावस्था ६–१० दिवसांची असते. मिज माशी या कोशातून सकाळी बाहेर पडते. मिज माशी २-३ दिवसांपेक्षा जास्त जगत नाही. तिची एक पिढी २–४ आठवड्यांत पूर्ण होते आणि एका ऋतूत त्यांच्या अनेक पिढ्या तयार होतात. मिज माशीचे आयुष्य २-३ दिवसांचे असले, तरी तिच्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होते. जेव्हा पिकाचा हंगाम नसतो, तेव्हा ही माशी सुप्तावस्थेत असते. दाणे काढलेले कणसाचे भाग, खळ्यातला भुसा, जॉनसन गवत यांमध्ये त्यांची सुप्तावस्था दिसून येते.
दोन-तीन आठवड्यांच्या कालखंडामध्ये अधूनमधून पेरणी झाल्यास पीक तयार होण्याच्या वेळा टप्प्याटप्प्याने आल्याने माशीचा उपद्रव वाढतो. मिज माशीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका मोठ्या प्रदेशात ज्वारीची पेरणी एकाच वेळी करावी लागते. त्यामुळे पीक एकाच वेळी तयार होते. मादी एकाच दिवसात अंडी घालत असल्यामुळे पिकाच्या फुलोऱ्यावर नवीन माश्यांना अंडी घालायला पुरेसा वेळ नसतो. ज्वारीचे दाणे एकदा तयार झाले की मिज माशीची मादी अंडी घालू शकत नाही. त्यामुळे तिचा उपद्रव आटोक्यात येतो. या ज्वारीला फुलोरा लवकर येतो. त्यामुळे मिज माशीच्या अंडी घालण्याच्या वेळेत व फुलोऱ्याच्या वेळेत अंतर पडते.
*नुकसान:-*
* किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यावर असताना आढळून येतो.
* नव्वद दिवसांत येणाऱ्या एसपीएच-८३७ किंवा वसंत-१ या संकरित ज्वारीच्या पिकांवर मिज माशीचा उपद्रव होत नाही.
* मिजमाशीची मादी माशी फुलोऱ्यात अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी बिजांडकोषावर उपजीविका करते. प्रादुर्भावामुळे कणसात दाणे भरत नाहीत.परिणामी उत्पादनात जवळपास ६० टक्के घट येते.
*उपाययोजना:-*
* मिजमाशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मिजमाशी उपद्रवग्रस्त शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची निवड करून साधारणपणे एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी साधल्यास मिजमाशीपासून संरक्षण होते.
* पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल
* किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.
* मेलेथीऑन ५% भुकटी किंवा क्विनोलफॉस १५% भुकटी ८ किलो/एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर ५-१० दिवसांनी करावी.
* मेलेथीऑन ५०% प्रवाही २५-३० मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.
संदर्भ-मराठी विश्वकोश आणि अग्रोवोन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा