कामगंध सापळे | Types of Pheromone Trap | कीड व्यवस्थापन

 



कामगंध सापळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सापळे हे यांत्रिक प्रकारामध्ये येतात. ज्यांचा वापर आपल्याला किडिंची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाण्यापासून रोखली जाते. किडीच्या जीवनचक्रातील पतंग/माशी/भुंगा अवस्था सापळ्यांमध्ये लावलेल्या ल्युरकडे आकर्षित होतात व सापळ्यात अडकतात. त्यांचे जीवनचक्र खंडीत होते. परिणामी किडीची पुढील पिढी तयार होत नाही.


 कामगंध सापळ्यांचे विविध प्रकार:- 

आय.पी.एम ट्रॅप:-

  हा सापळा मुख्यतः फळमाशी नियंत्रणासाठी वापरला जातो. सापळ्याचा आकार ग्लास सारखा असतो. बाजूने असणाऱ्या तीन छिद्रामधून फळमाशी आतमध्ये जाऊन अडकते. हा सापळा सर्वसाधारण वर्षभर टिकतो. शिफारशीत दिवसांनी आतमधील ल्युर बदलावी लागते. हा सापळा वेलवर्गीय फळभाज्या जसे कलिंगड, काकडी,खरबूज,दोडका,कारले, पडवळ, दुधी भोपळा व टोमॅटो पिकात येणाऱ्या फळमाशी नियंत्रणासाठी वापरू शकतो.


मॅक्सप्लस/मॅकफील ट्रॅप:- 

   हा सापळा सुद्धा फळमाशी नियंत्रणासाठी वापरला जातो. हा सापळा मजबूत असल्यामुळे बहुवार्षिक फळपिकामध्ये वापरू शकतो. सर्वसाधारण हंडीच्या आकाराचा सापळा पहायला मिळतो. व्यवस्थित वापरल्यास 2-3 वर्षे पुन्हा पुन्हा वापरू शकतो. आंबा,पेरू,चिकू,संत्रा,सीताफळ या प्रकारच्या फळझाडांमध्ये फळमाशी नियंत्रणासाठी उपयोगी आहे.


फनेल ट्रॅप:- 

   वेगवेगळ्या प्रकारच्या निशाचर पतंगवर्गीय किडी नियंत्रित करण्यासाठी फनेल ट्रॅप उपयोगी आहे. जसे सोयाबीन मधील पाने खाणारी अळी, हरभऱ्यातील घाटेअळी, मक्क्यातील अमेरिकन लष्करी अळी, वांग्यातील शेंडे व फळ अळी, बोंडअळी, खोडकिडे यांचे नियंत्रण करण्यासाठी फनेल ट्रॅप उपयोगी आहे. प्रत्येक किडी नुसार  योग्य ल्युर लावावी.


डेल्टा ट्रॅप:- 

   हा त्रिकोणी आकाराचा हा सापळा टोमॅटो मधील नागअळी, तसेच कोबी,फुलकोबी मध्ये येणारा चौकोनी ठिपक्यांचा पतंग या दोन किडींना नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. या सापळ्यांचा आतमध्ये विशिष्ट किडीसाठी ल्युर स्टीकी पॅडवर चिकटवून ठेवावी. या स्टीकी ट्रॅप वर ल्युरच्या वासाने आकर्षित झालेल्या माश्या-पतंग चिकटतात. 


वॉटर ट्रॅप:- 

    वॉटर ट्रॅप हा सापळा टोमॅटो मधील नागअळी, तसेच कोबी,फुलकोबी मध्ये येणारा चौकोनी ठिपक्यांचा पतंग तसेच वांग्यामध्ये येणाऱ्या शेंडे व फळ अळीचे पतंग नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. हा सापळा बहुवार्षिक वापरासाठी बनला असल्याने 2-3 वर्षे आपण वापरू शकतो. पिकामध्ये लावताना योग्य ल्युर लावणे महत्वाचे आहे. यामध्ये पाणी ओतावे लागते. आकर्षित झालेले पतंग पाण्यामध्ये पडल्यानंतर मरतात.


बकेट ट्रॅप:- 

 बकेट ट्रॅप खास करून भुंग्यांना पकडण्यासाठी उपयोगी पडतो. नारळामध्ये येणारा गेंडा व सोंड्या भुंगा,हुमणी किडीचा भुंगा या भुंग्यांना पकडण्यासाठी केला जातो. हा सापळा दिसायला बकेट(बादली) च्या आकाराचा असतो. ट्रॅपला बाजूने 3 होल असतात.त्यामधून भुंगे आत येऊन अडकतात. या सापळ्यामध्ये पाणी ओतून ठेवावे जेणेकरून आकर्षित झालेले भुंगे पाण्यामध्ये पडून मरतील.


अश्या प्रकारचे विविध कामगंध सापळे आपल्याला किडीचे नियंत्रण करण्यासाठी मिळतात. सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर ल्युर विशिष्ट किडीस आकर्षित करते व सापळा त्या किडीस पकडून ठेवायचे काम करतो. किडीनुसार योग्य ल्युर लावणे तसेच योग्य वेळी सापळ्यात अडकुन मेलेले पतंग बाहेर टाकणे गरजेचे असते. 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean