निंबोळी खत | Neem Fertilizers | फायदे |
🏫IPM SCHOOL🌱
सध्या हळू हळू सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत चालले आहे. शेतातील वाढता रासायनिक खतांचा वापर,रसायनांचा वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सर सारख्या आजारांची आणि वेगवेगळ्या रोगांची लागण होत आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये खत म्हणून नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. यामध्ये पालापाचोळा, शेण, गांडूळखत आणि लिंबोळ्या पासून बनवलेले आणि कुजवलेले खत यांचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात खत निर्मिती केली जाते. त्यास आपण ऑरगॅनिक खत असे सुद्धा म्हणतो. लिंबाचा पाला आणि त्याच्या लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते.ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे.
आपण शेतीमध्ये हे निंबोळी खत पेंड स्वरूपात किंवा पावडर(भुकटी) स्वरूपात वापरू शकतो. तर आज आपण निंबोळी खताचे फायदे जाणून घेऊ.
निंबोळी खताचे फायदे:-
* शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे रानातील जमिनीतील वाळवी, हुमणी या सारख्या किड्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होते.
* वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. पिके रोगाला बळी पडत नाहीत.
* शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो.
* त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते.
* उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असे घटक यामध्ये आढळतात त्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीबरोबर पिकाची वाढ सुद्धा चांगली होते, त्यामुळे शेतात निंबोळी पेंड वापरावी.
* शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
* शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते.
* निंबोळी भुकटीमध्ये ॲझाडीरेक्टीन' घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.
* निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते. -निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
* निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
* निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
* निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.
* निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.
निंबोळी खत वापरल्यामुळे शेतजमीन चांगली राहण्याबरोबरच कीड आणि रोगाचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो त्याचबरोबर पीक चांगले येऊन उत्पन्नही वाढते. त्यामुळे या गोष्टींचा वापर करून शेतकऱ्यांनी नक्कीच निंबोळी खताचा वापर शेतामध्ये करायला हवा.
संदर्भ-शेतीमित्र आणि हॅलोकृषी ब्लॉग.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा