ऊस | Pest of Sugarcane | किडींचा प्रादुर्भाव
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे नगदी पीक म्हणजे ऊस. पश्चिम महाराष्ट्रात तर मोठे क्षेत्र या पिकाखाली येते. कारण इतर पिकामध्ये वातावरणातील बदलामुळे तसेच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण ऊस पिकामध्ये याच्यामुळे मोठे नुकसान होत नाही.
जसे सर्व पिकांमध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे ऊसामध्येही वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.आज आपण जाणून घेणार आहोत ऊस पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
ऊसामध्ये सुरुवातीला येणारा खोड कीड:-
या किडीचा प्रादुर्भाव ऊस लागणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत दिसून येतो.
हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वाळलेल्या पोंग्यावरून, तसेच बुडख्याजवळ असलेल्या लहान लहान छिद्रांवरून ही कीड ताबडतोब ओळखता येते.
कांडी कीड:-
या किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर या कालावधीत जास्त आढळतो. जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कमी पाऊस यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
उसाची वाढ कमी होते, कांड्या लहान राहतात, पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भुसा आढळून येतो.
शेंडे कीड:-
या किडीचा प्रादुर्भाव उसाच्या उगवणीपासून तोडणीपर्यंत दिसून येतो.
पण ऑक्टोबर महिन्यात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. हवेतील भरपूर आर्द्रता, मध्यम तापमान आणि उशिरा व जास्त येणारा पाऊस यांमुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उसाचा शेंडा वाळतो, पानावर लहान लहान छिद्रे दिसतात. असा शेंडा सहजासहजी उपसून येत नाही. शेंडा वाळल्यामुळे बाजूचे डोळे फुटतात. उसाचा खराट्यासारखा आकार तयार होतो.
पिठ्या ठेकूण (मिली बग):-
कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची लालसर रंगाची व अंगावर मेणचट आवरण असलेली पिठ्या ढेकणाची पिल्ले दिसतात.किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाची वाढ मंदावते. ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात घट येते.
पाकोळी (पायरिला):-
या किडीच्या पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले, तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात. किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानावर काळी बुरशी वाढते. उसाचे वजन, साखर उताऱ्यात घट येते.
पांढरी माशी:-
हि कीड बऱ्याचदा दलदलीच्या ठिकाणी, दुर्लक्षित ऊस पिकात/ खोडवा पिकात, उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पानाच्या खालच्या बाजूस गोल, नाजूक, पांढरट पिले व कोष दिसतात. ती पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते.
हुमणी:-
ऊस पिकामध्ये सगळ्यात नुकसानकारक हि कीड आहे. या किडीमुळे पानाची शीर व पाने पिवळी होतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. मुळे खाल्लेली दिसून येतात.
ऊस उपटला असता हुमणीच्या सी आकाराच्या पिवळसर पांढऱ्या रंगाच्या अळ्या दिसून येतात. दुर्लक्षित ऊस पिकामध्ये ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते.
लोकरी मावा:-
लोकरी माव्याचा प्रादुर्भाव लागणीपासून तोडणीपर्यंत आढळून येतो. माद्यांची संख्या जास्त असते. त्या समागमाशिवाय प्रजनन करतात.
पंखी माव्यास पारदर्शी पंख असून, पंखाच्या कडेस दोन आयताकृती काळे ठिपके दिसून येतात. पंखाच्या मादीपासून जन्मलेल्या पिलांचा रंग फिक्कट हिरवट पांढरा दिसतो. तर बिनपंखी माव्याची पिले फिक्कट पिवळसर पांढरी असतात.
बाल्यावस्थेत चार वेळा कात टाकतात. तिसऱ्या बाल्यावस्थेपासून त्यांच्या पाठीवर लोकरीसारखे मेणतंतू दिसतात.
वाळवी:-
हलक्या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. ही कीड उसाचे डोळे कुरतडून खात असल्याने, उगवणीवर परिणाम होतो. उसाच्या कांड्यांचा आतील गर खाल्ल्यामुळे उसाचे नुकसान होते.त्याचबरोबर काही वेळेस संपूर्ण उसाच्या बेटावरही प्रादुर्भाव दिसून येतो.
सर्वसाधारणपणे ऊस पिकामध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि काही वेळेस अमेरिकन लष्करी अळीचा देखील प्रादुर्भाव पिकामध्ये दिसून येतो पण प्रामुख्याने ऊसामध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोच.त्यामुळे ऊसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला या किडींची ओळख तसेच प्रादुर्भाव लक्षणे माहिती असायला हवीत तरच शेतकरी किडींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो.
संदर्भ-अग्रोवोन
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा