टोमॅटो | विषाणूजन्य रोग | Viral Disease of Tomato |

 🏫IPM SCHOOL🌱



टोमॅटोवरील विषाणूजन्य रोग

सातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे टोमॅटोमध्ये विषाणूचा प्रसार करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. विषाणूजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते. याशिवाय विषाणूजन्य रोगाच्या प्रसारासाठी हि महत्त्वाची कारणे आहेत- रोग नियंत्रणासाठी रोपवाटिकेत काळजी न घेणे,  शिफारशीनुसार हंगामासाठी योग्य जातींची निवड व लागवड न करणे, इ.


टोमॅटो पिकावर सुमारे १५-२० प्रकारचे वेगवेगळे विषाणूजन्य रोग कमी जास्त प्रमाणात स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे आढळतात आणि त्यांचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इ रसशोषक किडीमुळे होतो.


काही विषाणू रोगांचा प्रसार स्पर्श, रोगग्रस्त बियाणे तसेच पिकांच्या अवशेषांमार्फतही होतो. म्हणून विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासून अवशेषांच्या व्यवस्थापनापर्यंत योग्य त्या उपाययोजनाचा अवलंब केला पाहिजे.


कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV (काकडी मोझॅक विषाणू):- 

 

या रोगाचा प्रसार मावा किडीच्या माध्यमातून होतो. पानांवर हिरवट व पिवळे असंख्य ठिपके दिसून येतात.याची लक्षणे थोड्या फार फरकाने टोमॅटो मोझॅक (टोबॅको) व्हायरससारखीच असू शकतात. अधिक प्रादुर्भावात फांद्यांचा आकार बुटाच्या लेसप्रमाणे किंवा दोरीसारखा होतो.


टोमॅटो मोझॅक व्हायरस (ToMV):- 


 या रोगाचा प्राथमिक प्रसार यांत्रिकरीत्या (यंत्रे, अवजारे, काम करणाऱ्या मजुरांचे हात इ.) या माध्यमातून होतो. 

निरोगी टोमॅटो झाडांना संसर्ग झाल्यास प्रथम पानांवर हिरवट पिवळसर रंगांचे ठिपके दिसतात. झाडांची पाने वेडी वाकडी (विकृत), खडबडीत आणि साधारण पानांपेक्षा लहान राहतात. पानांचा मूळ आकार बदलून ‘फर्न लीफ’ नेच्याप्रमाणे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडे खुंटलेली, फिक्कट हिरवी आणि बारीक राहतात.


टोबॅको व्हेन डिस्टॉरशन व्हायरस (तंबाखू शिरा विकृती विषाणू):- 


 या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा किडींच्या मार्फत होतो. विषाणूसंक्रमित टोमॅटोच्या पानावर पिवळ्या रंगाचे पट्टे दिसतात.प्रादुर्भावग्रस्त पानांचे देठ लांबट होऊन शिरा जाड होतात. पानांचा आकार बदलतो. विकृत झाडावरील फळांवर पिवळसर, गोलाकार किंवा असमान आकाराचे चट्टे आढळतात.


ग्राउन्डनट बड नेक्रॉसिस व्हायरस (भुईमूग कळीवरील नेक्रोसिस विषाणू):-

 

या रोगाचा प्रसार फुलकिडे (थ्रिप्स) या किडीमुळे होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या फांदीचे शेंडे कोमेजतात. त्यावर काळपट तपकिरी रंगाचे बारीक ठिपके दिसतात.

अधिक प्रादुर्भावात झाडाच्या फांद्या व पाने कोमेजून झाड मरते.


टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस:-

 

या रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे होतो. पानावर अनियमित निरनिराळ्या रंगांचे, आकाराचे ठिपके (क्लोरोटिक) लक्षणे दिसतात. पानांच्या शिरा हिरव्या राहून, दोन शिरांमधील भाग पिवळसर होतो. पिवळसरपणा हळूहळू तीव्र होतो.

विषाणूची लक्षणे झाडाच्या शेंड्यांकडील पानावर दिसतात.

जुनी पाने नेक्रोसिससह तांबूस तपकिरी रंगाची आणि लाल रंगाची होऊ लागतात. झाडाच्या वाढीचा जोम कमी होतो. फळांच्या आकारात वेगळेपणा येतो.

ही लक्षणे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या पिवळेपणाप्रमाणेच असल्याने रोग ओळखण्यात अडचणी येतात.


टोमॅटो लिफ कर्ल व्हायरस (पर्णगुच्छ विषाणू):-


या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. पाने वेडी वाकडी होतात. (स्थानिक भाषेत -चुरडा मुरडा). आकाराने लहान राहून झाडाची वाढ खुंटते.

नवीन येणारी पानेही अशीच लक्षणे दाखवतात. पानांच्या शिरा आणि कडा पिवळ्या होऊन वरील बाजूने आत वळतात. पानांचा आकार चहाच्या कपासारखा दिसतो.

प्रादुर्भाव झालेली पाने जाड आणि खडबडीत होऊन जांभळी रंगाची होतात.

फळे धारण होण्यापूर्वीच फुले गळून पडू शकतात.


  सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोमॅटो पिकावर एकावेळी एकच विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ओळखणे सोपे होते. मात्र एकाच वेळी मावा, तुडतुडे, पांढरी माशी अशा एकापेक्षा अधिक रसशोषक किडींचा प्रादुर्भाव एकत्रित झाल्यास विषाणूजन्य रोगांची लक्षणेही एकत्रितपणे दिसतात. परिणामी, पाने व फळे यांच्या बाह्य लक्षणावरून विषाणूंची ओळख पटवणे अवघड जाते.विषाणूचा प्रसार इकडून तिकडे जाणाऱ्या किडी व अवजारांमार्फत होतो. मुख्य पीक उपलब्ध नसल्यास हे विषाणू अन्य यजमान वनस्पती/ पिकांवर आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रसारक किडी व यजमान वनस्पतींची यांचे एकत्रित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

संदर्भ- अग्रोवन (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-* 

🌱सयाजीराव गोपाळराव पोखरकर, अकोले

🌱सागर बाळकृष्ण पुणे

🌱सचिन तुकाराम सावंत, सांगली, 🌱सागर सोनवणे नाशिक 🌱अमोल पाटील, हेब्बाळ, कोल्हापूर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*


.*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy