उन्हाळी हंगाम | फळझाडांचे एकात्मिक व्यवस्थापन |

🏫IPM SCHOOL🌱




 उन्हाळी हंगामामधील फळझाडांचे एकात्मिक व्यवस्थापन 


कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्या जमिनीतदेखील काही फळझाडाची लागवड फायदेशीर होऊ शकते फळपिकाच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडांची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे असते. उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. 


उन्हाळी हंगामात फळपिकाची काळजी:-

* लिंबूवर्गीय फळबागांचे व्यवस्थापन (मोसंबी व कागदी लिंबू):- 

पाणी देणे:- लिंबूवर्गीय फळबागांना दुहेरी ओळ (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे पाणी शक्यतो रात्री द्यावे. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.

आच्छादनाचा वापर करणे:- प्लॅस्टिक कागद किंवा भुसा याचा आच्छादन म्हणून वापर करावा आच्छादनामुळे जमिनीत सतत ओलावा राहण्यास मदत होते, शिवाय गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीची धूप थांबते.


बाष्परोधक रसायन केवोलिनचा वापर

* ६ टक्के तीव्रतेच्या केवोलिनची फवारणी उन्हाळ्यात लिंबूवर्गीय फळबागांवर केली असता बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन फळबागांचे उन्हापासून संरक्षण होण्यास मदत होते.

* उन्हाळ्यात कागदी लिंबाचे उत्पादन वाढवण्यासाठी जून महिन्यात ५० पी.पी.एम. जिब्रेलिक अ‍ॅसिड सप्टेंबर महिन्यात १००० पी.पी.एम. सायकोसिल व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.

* उन्हाळ्यामध्ये मोसंबीच्या आंबे बहाराची फळगळ कमी करण्यासाठी एन. ए. ए. (नॅप्थॅलिन ॲसेटिक ॲसिड) या संजीवकाची १० पीपीएम (१० मि. ग्रॅ. प्रति लीटर पाणी) तीव्रतेची फळधारणेनंतर १५ ते २० दिवसानंतर फवारणी करावी. किंवा १५ ग्रॅम २४ डी किंवा जिब्रेलिक आम्ल आणि १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि १ किलो युरिया यांचे १०० लीटर पाण्यात द्रावण करून फवारणी करावी. १५ दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी. 

* मोसबी व कागदी लिंबू झाडाच्या खोडास जमिनीपासून तीन फूट उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी.  त्यामुळे उन्हाळ्यात खोडावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित होऊन झाडाचे उन्हापासून संरक्षण होईल. उन्हाळ्यात पाण्याची फारच कमतरता असल्यास झाडे जगविण्यासाठी झाडावरील फळाची संख्या कमी करावी तसेच अनावश्यक फाद्याची छाटणी करावी.

* बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे. 


केळी:- 

* मृगबाग व कांदेबागेतील पिल्ले धारदार विळ्याने कापून घ्यावीत. झाडावर लोंबणारी हिरवी अथवा वाळलेली अशी कोणतीही पाने कापू नयेत. कारण या पानांमुळे खोडाचे उष्ण वाऱ्यापासून संरक्षण होते. उन्हाळ्यात पिकाची पाण्याची गरज वाढलेली असते, तेव्हा केळीच्या प्रत्येक झाडाला दररोज १६ ते २५ लीटर पाणी द्यावे. बागेभोवती सजीव कुंपण लावलेले नसल्यास कापसाच्या पन्हाट्या, तुरकाड्या, उसाचे पाचट अथवा ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे, कडबा वापरून झाप तयार करावे व बागेच्या चोहोबाजूंनी लावावे.

* तीव्र सूर्यप्रकाशापासून बागेच्या संरक्षणासाठी प्रति १०० लीटर पाण्यातून आठ किलो केवोलिन बाष्परोधक स्टिकर मिसळून झाडावर फवारणी करावी. बागेत उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, बाजरीचे सरमड किंवा डाळवर्गीय पिकाचे काड याचे दाट आच्छादन करावे.


 मृगबाग केळीतील निसवणाऱ्या घडावर व केळफुलावर फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निसवतेवेळी केळफुलावर १२५ ग्रॅम ॲसिटामिप्रीडची प्रति १० लीटर पाण्यातून स्टिकरसह फवारणी करावी. घडातील शेवटची फणी उमलल्यानंतर केळफूल कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावे तसेच फळाच्या आकारमानात भरीव वाढ होण्यासाठी घडावर १० लीटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरिया अधिक ५ मि.ली. स्टिकर या प्रमाणात पूर्ण घड निघाल्यानंतर एकदाच फवारणी करावी. निर्यातक्षम केळीसाठी घडावर ६ ते ८ फण्या ठेवाव्यात. यानंतर घड दांड्यासह १०० गेज जाडीच्या दोन ते सहा टक्के सच्छिद्रता असलेल्या अर्धपारदर्शक प्लॅस्टिक पिशव्यांनी झाकावा. यामुळे ऊन, पाऊस, धूळ तसेच किडींपासून घडांचे संरक्षण होऊन घडांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

* कांदेबाग केळीला लागवडीनंतर १६५ दिवसांनी द्यावयाच्या रासायनिक खतांच्या मात्रात ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश बागडी पद्धतीने कोरून द्यावे. खते दिल्यानंतर व्यवस्थित ती मातीआड करावी.

* खते देण्यासाठी फर्टिगेशन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांनी मृगबाग केळीला प्रति १००० झाडाना पाच किलो म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा आठवड्यातून एकदाच द्यावी.

* मृगबागेतील कललेली झाडे घडाच्या वजनाने पडू नयेत म्हणून पॉलिप्रॉपलिनच्या पट्ट्या लावाव्या किंवा बांबूच्या साहाय्याने झाडाना आधार द्यावा.

पेरू:- 

पेरूमध्ये स्थानिक बाजारपेठेचा विचार करून बहार धरावयाचा निर्णय घ्यावा ज्या शेतकऱ्यांना मृगबहार धरावयाचा आहे त्यांनी पेरूच्या बागेस फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत पाणी देऊ नये. हा काळ उन्हाळ्याचा असल्याने पाण्याची देखील टंचाई असते तसेच या बहाराची फळे हिवाळ्यात तयार होत असल्याकारणाने या बहरातील फळामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आणि फळांची गुणवत्ताही उत्तम प्रकारची असते.

* या कालावधीमध्ये झाडांना पाण्याचा ताण देताना भारी जमिनीस ४० ते ६० दिवसांचा, तर हलक्या जमिनीस ३० ते ५० दिवसांचा ताण पुरेसा होतो. पाणी तोडल्यामुळे झाडांची वाढ थांबते व पानगळ होते त्यामुळे झाडांना पूर्ण विश्रांती मिळून झाडामध्ये अन्नद्रव्यांची साठवण होते आणि अन्नद्रव्ये पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा निर्माण करण्यास मदत करतात. अर्धवट पानगळीनंतर बागेतील जमिनीची नांगरट करून मशागत करावी. भारी जमिनीत पानगळ लवकर होत नाही, म्हणून खोल नांगरट करावी बागेतील तण पूर्णपणे काढून टाकावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. जास्त पाण्याचा ताण दिल्यास पानगळही जास्त होते व फुले धरणाऱ्या काड्यांची मर होऊन झाडांना हानी होते. म्हणून ताण काळजीपूर्वक द्यावा. उन्हाळ्यात जमीन तशीच तापू द्यावी. मे महिन्यात शेवटी पूर्ण वाढलेल्या झाडास २५ ते ३० किलो शेणखत व ६००:३००:३०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश या खतांची मात्रा प्रति झाड या प्रमाणात द्यावी. नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.


आंबा:-

* उन्हाळी हंगामातील तिसरे महत्त्वाचे फळपीक आंबा असून पहिल्या वर्षी लावलेल्या कलमाचा उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी वाळलेला पालापाचोळा, गवत किंवा उसाच्या पाचटाने झाडाच्या बुंध्याभोवती आच्छादन करावे. आंब्याच्या बागांना पाणी देण्याची प्रथा नसली, तरी पहिल्या वर्षी उन्हाळ्यात २ ते ३ दिवसांच्या अंतराने २ ते ५ वर्षे वयाच्या झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्याचप्रमाणे तुडतुड्यापासून मोहोरावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कार्बारिल ४ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून मोहोरावर फवारावे किंवा ३०० मेश गंधक भुकटी + १० टक्के कार्बारिल भुकटी समप्रमाणात वारा शांत असताना धुरळावी, त्यामुळे मोहोरावरील तुडतुड्यांचे तसेच भुरी रोगाचेही नियंत्रण होईल.

झाडावरील फळांची गळ थांबवण्यासाठी एन.ए.ए. १०, पी.पी.एम. किंवा २,४-डी, १५ पी.पी.एम किंवा अलार १०० पी.पी.एम. या सजीवकाचे कमीत कमी दोन फवारे द्यावेत. यापैकी पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना, तर दुसरी फवारणी फळे बोराएवढी झाल्यावर करावी.


डाळिंब:-

* डाळिंब पिकाचे उन्हाळी हंगामात येणाऱ्या आंबे बहारासाठी पिकाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. उन्हाळी हंगामातील डाळिंबासाठीच पाणी नियोजन खूप महत्वाचे असते. उन्हाळी हंगाम फेब्रुवारी ते मे चार महिने पिकास नियमित व एकसारखे पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी महिन्यात २३ लीटर, मार्च महिन्यात ३४ लीटर, एप्रिल महिन्यात ४६ लीटर, तर मे महिन्यात ५० लीटर पाणी दररोज देणे आवश्यक असते. 

* पाणी देण्यात जर अनियमितता आली तर फुलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पाण्याची टंचाई असणाऱ्या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या साहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

* सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त केल्यास जमिनीत पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेतदेखील वाढ होते. ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दंडाने ७ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा करावा. तसेच झाडांच्या वयोमानानुसार एका झाडावर फळांची संख्या कमी ठेवावी, जेणेकरून फळांचा आकार व वजन चांगल्या प्रकारे मिळेल व फळांना बाजारभाव चांगले मिळतील. 


कीड व रोगनियंत्रण:-

* बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरू + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा द्यावा व खोडाजवळ कीटकनाशकाचे द्रावण ओतावे. 

* मावा, कोळी आणि खवले किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक व निंबोळी अर्क (४ टक्के) यांची आलटून-पालटून फवारणी करावी.

* ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी व परोपजीवी बुरशीचा वापर करावा, तसेच क्रिप्टोलेमस मॉन्टोझायरी हे परभक्षी मित्रकीटक बागेत सोडावेत. 

* याशिवाय मर रोग व तेलकट डाग या रोगांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यानुसार मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिमचे ०.१ टक्का द्रावण ५ लीटर प्रति झाडास द्यावे.

* डाळिंब पीक संरक्षणाकरिता कार्बेन्डॅझिमचे ०.१ टक्का द्रावण ५ लीटर प्रति झाडास द्यावे. एक महिन्यानंतर प्रति झाडास २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसिस + ५ किलो शेण यांचे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला २ किलो चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड या प्रमाणात द्यावे.

* मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूला दोन ओळींतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसिसचे प्रमाण पाच पटीने वाढवावे, तसेच ०.१ टक्का कार्बेन्डॅझिमचे द्रावण १० लीटर प्रति झाड या प्रमाणात द्यावे.

* सूत्रकृमी असलेल्या बागामध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निंबोळी पेंड आणि एक ते दीड महिन्यानंतर १० किलो १० टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे.

* खोडास लहान छिद्रे पाडणाऱ्या भुंगेऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन / क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्सवरील प्रमाणात घेऊन प्रति झाड ५ लीटर द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे.

* खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मि.ली. किंवा डायक्लोरव्हॉस १० मि.ली. या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या साहाय्याने छिद्रांत सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

अंजीर:-

 अलीकडे फळांना मिळत असलेल्या बाजारभावामुळे अंजिराची लागवड पश्चिम महाराष्ट्रात (पुणे, नगर व नाशिक) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पिकामध्ये बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने काही शेतकरी खट्टा बहार (जुलै-ऑगस्ट) धरतात, तर फळांच्या गोडीसाठी मिठ्ठा बहार धरणे योग्य असते. 

* मिठ्ठा बहाराची फळे ही उन्हाळ्यात (मार्च ते जून) तोडणीस तयार होतात. हा काळ उन्हाळ्याचा असल्यामुळे फळांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात झाडास पाण्याचा ताण बसल्यास फळाच्या सालीवर सुरकुत्या तयार होतात. फळ ताजे टवटवीत दिसत नाही अशा फळांना बाजारभाव असल्यामुळे अशी फळे पक्ष्यापासून वाचवित गरजेचे असते तेव्हा बागेवर पक्षी संरक्षक जाळीचे आच्छादन करून फळांचे रक्षण करावे.

* उन्हाळ्यात या पिकावर खोडकिडीचा व खोडाला लहान छिद्रे पाडणाऱ्या भुंगेरे यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्यासाठी बहार सुरू होण्यापूर्वी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २५ मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २५ ग्रॅम प्रति लीटर मिश्रण तयार करून त्यांचा खोडास मुलामा द्यावा, तसेच वरील कीटक व बुरशीनाशकाचे द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे.

* त्याचप्रमाणे खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मि.ली. /लीटर किंवा डायक्लोरव्हॉस १० मि.ली. / लीटर या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या साहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत. 


सीताफळ:-

* फेब्रुवारी महिन्यात सीताफळाची हलकीशी छाटणी करून बागेतील जमिनीची नांगरट करावी व जमीन भुसभुशीत करावी. 

* बहार धरण्यापूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वी झाडांना अळे बांधून पूर्ण वाढ झालेल्या झाडास २५ ते ३० किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे, तसेच प्रति झाड १२५:१२५:१२५ ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खताची मात्रा द्यावी. त्यानंतर पहिल्या १ ते २ पाण्याच्या पाळ्या पाटाने द्याव्यात व त्यानंतर ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाणीपुरवठा सुरू करावा. 

* सीताफळावर येणाऱ्या पिठ्या ढेकूण या किडीच बदोबस्त करावा. 

* परागीभवन वाढविण्यासाठी बागेत झेंडूची लागवड करावी किंवा मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्याची व्यवस्था करावी. कृत्रिमरीत्या परागीभवन केल्यास फळाचा आकार व वजन वाढल्याचे बंगळुरू येथील प्रयोगात दिसून आले आहे.


आवळा:-

* बहार धरण्यापूर्वी आवळा बाग तणविरहित ठेवण्यासाठी उभी-आडवी नागरट करावी त्याचप्रमाणे मे महिन्यात अवेळी येणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी उताराच्या दिशेने ठरावीक अंतरावर बांध घालून पाणी आडवावे ही कामे उन्हाळ्यातच करावी. 

* उन्हाळ्यामध्ये आवळ्यास फुले लागतात अशा वेळी सुरुवातीस दर झाडास २०० ग्रॅम पालाश देऊन एखादे संरक्षित पाणी दिल्यास फलधारणा उत्तम होऊन फळाची गळ कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यापूर्वी पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत व ५००:२५०:२५० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश द्यावे


नवीन फळझाडांचे व्यवस्थापन:-

नवीन फळबाग लागवडीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीतील उपलब्ध पाणी आणि तीव्र उन्हापासून रोपाची काळजी घेण्यासाठी पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा.

स्रोत-शेतकरी मासिक 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean