कडुनिंब | शेतीसाठी उपयोग | कीड नियंत्रणासाठी फायदे |

 *🏫IPM SCHOOL🌱*



*शेतीसाठी बहुउपयोगी कडुनिंब*


निसर्गाने शेती साठी दिलेली देणं म्हणजे कडूलिंब. पर्यावरण शुद्धीकरणात कडुनिंबचे फार महत्वाचे कार्य करते. कडुनिंबाचे झाड सतत प्राणवायू वातावरणात सोडत असते. 

बहुउपयोगी असे हे झाड असल्यामुळे शेती क्षेत्राबरोबर वन विभागातर्फे सामाजिक वनीकरणासाठी ही सर्वोत्कृष्ट वनस्पती/झाड मानले जात आहे. 


कडुलिंबाचा शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. निंबोळी किंवा पानांचा रस असो की अर्क तसेच निंबोळी तेल हे सर्वोत्कृष्ट असे नैसर्गिक कीड,रोग व जिवाणु नियंत्रक आहे.निंबोळी अर्क व निंबोळी तेलाने अनेक प्रकारचे कीड व रोग नियंत्रित होतात. यामुळे एकंदरीत पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होऊन मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी हे एक वरदान आहे. याशिवाय निंबोळ्या व पाल्याचे खतदेखील अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. 


कडूनिंब वृक्षाच्या पानांमध्ये व बियांमध्ये खालीलप्रमाणे रासायनिक घटक आढळून येतात.

फुले लागण्याचा कालावधी :- मार्च -एप्रिल.  

बी/ फळे लागण्याचा कालावधी :- मे-जुन

प्रति झाड उत्पादन :- परिपक्व झाड (दहा वर्ष) पासून 10 ते 25 किलो किलो प्रतिझाड (प्रतिकिलो 3500 ते 5000 बिया). 

तेलाचे प्रमाण :- बियांपासून 20-30 %, 

निंबोळीच्या सालींमधे 12-14 % टॅनिन असते. 

अझाडिरॅक्टिन उत्पादन : 3 ग्राम / किलो निंबोळी.


*कडुनिंबाचे रासायनिक घटक:-

रासायनिक कीटकनाशके ही किडींच्या पचन व मज्जासंस्थेवर काम करतात त्यामुळे सतत वापरामुळे किडींमध्ये अशा रसायनांना सहन करण्याची ताकद निर्माण होते व काही दिवसांनी या किडी त्या रासायनिक कीटकनाशकांना रोधक बनतात परंतु कडुनिंबापासून तयार केलेली कीटकनाशके किंवा संयुगे ही किडींच्या संप्रेरक संस्थेवर काम करतात त्यामुळे कडुलिंबाच्या औषधांना किडी रोधक बनू शकत नाहीत किंवा किडींच्या पुढील पिढ्या मध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. 

    अशी संयुगे नैसर्गिकपणे तयार झालेल्या लिमोनाइट वर्गातील आहेत. कडुनिंबातील लिमोनाइड संयुगे हे इजा न करणारी परंतु प्रभावी कीड, कीटक, सूत्रकृमी व बुरशीनाशके आहेत. किडींच्या वाढीला विरोध करणारी कडुनिंबामध्ये सर्वाधिक लक्षणीय तसेच सिद्ध झालेल्या क्षमतेची संयुगे म्हणजे आझाडीरेकटींन सालेनीन, मिलियनट्रायोल, निंबिन होत.


*अझाडिरॅक्टिन:- 

1.हे कडुनिंबातील अतिशय प्रभावी संयुग आहे. किडींना नियंत्रित करण्यासाठी कार्य करते.

2.जवळपास बहुतांश किडींवर 90% परिणाम करते.

3.हे किडींना ताबडतोब मारत नाही.

4.किडींना परावृत्त करतात तसेच किडींच्या शारीरिक वाढीमध्ये व प्रजननामध्ये अडथळे निर्माण करतात.

5.आत्तापर्यंतच्या संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की सर्वात जास्त शक्तिशाली वाढ नियंत्रक व खाण्यापासून परावृत्त करणारे हे संयुग आहे.

6.हे संयोग इतके प्रभावी आहे की याच्या फक्त थोडा जरी अंश असला तरी किडी पिकांना स्पर्श सुद्धा करीत नाहीत.

निम्बीसीडीन/ निंम्बीन व निम्बीडिन : विषाणूविरुद्ध क्रिया करण्यासाठी हा घटक उपयुक्त असल्याकारणाने या घटकालासुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. पिकांवरील तसेच जनावरांच्या विषाणू रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो.


1. नेलीयानट्रिओल : या घटकांचा उपयोग झाडांची व रोपांची पाने खाऊ न देण्यासाठी होतो. या घटकांचा चांगला उपयोग होऊ शकतो.

2. सालान्नीन : हा घटक पिकांवरील पाने खाणार्‍या किडींवर प्रभाविपणे कार्य करतो. तसेच घरातील माश्या, भुंगे, खवले यावरसुद्धा प्रभावीपणे कार्य करतो.

3. डिॲसीटील अझाडिरॅक्टिन : हा सुद्धा महत्त्वाचा घटक असून याचे कार्यसुद्धा किडींना प्रभावीपणे दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणले जाते. एकंदरीत कडूिंलबाच्या पानांपेक्षा बियांमध्ये जैविक क्रिया करणारा घटक अधिक तीव्र आहे.


कडुलिंबाच्या अर्काद्वारे किडींचे नियंत्रण:- कडूनिंबापासून तयार करण्यात आलेला अर्क किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध रोधक, किडीस खाद्यप्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीटकनाशक या विविध मार्गाने परिणाम करते. कडूनिंबाच्या सर्व भागापासून विविध प्रकारच्या 400 ते 500 प्रजातींवर प्रभावी वनस्पतिजन्य कीटकनाशक असल्याचे आढळून आले आहे. नियंत्रण कार्याची पुढील माहिती शेतकर्‍यांच्या विशेष फायद्याची ठरू शकते.

निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.


*निंबोळी पावडर वापरण्याचे प्रमाण:-*

1.सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.

2.फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.

3.सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक अशा सर्व शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे असून ते वापरण्यास सुरक्षित आहे .सध्या रासायनिक निविष्ठांना सुयोग्य पर्याय म्हणून निंबोळी पावडर चा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत.


*निंबोळी पेंडचा शेतात वापर:-*

निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित पोहचेल अशा पध्दतीने टाकावी. फ़ळझाडांमध्ये मुळांच्या जवळ ड्रिपरजवळ खड्डा घेउन त्यात निंबोळी पेंड टाकून मातीने बुजवुन घ्यावी. शेत तयार करताना देखील निंबोळी पेंडचा वापर करता येईल किंवा उभ्या पिकात निंबोळी पेंड फेकुन, हाताने पसरवुन देता येते. भाजीपाला पिकामध्ये बेडमध्ये बेसल डोस टाकताना निंबोळी पेंडचा वापर करता येतो. जैविक कीडनाशके-जैविक खते निंबोळी पेंडसोबत सुलभरित्या वापरता येतात. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, बिव्हेरिया, मेटारायझियम, पॅसिलोमायसिस, अ‍ॅझोटोबॅक्टर, पिएसबी, केएमबी सारख्या उपयुक्त सुक्ष्मजीवांचा वापर निंबोळी पेंडीला चोळून किंवा सोबत मिक्स करुन करता येतो.



निंबोळी पेंड वापराचे प्रमाण:-

1. फ़ळझाड:- 1 किलो पासुन 5 किलो प्रति झाड प्रति हंगाम.

2. भाजीपाला पिके:- बेसल डोसमध्ये 500 ते 1000 किलो प्रति एकरी 

3. केळी:- 250 ग्राम प्रति झाड 2 महिन्यांच्या अंतराने.

4. ऊस लागवडीच्या वेळेस 500 किलो 3 महिन्यांनतर 500 ते 1000 किलो.


 निंबोळी पावडर चे कार्य व फायदे:-

1. पेंड तयार करण्यासाठी परिपक्व झालेल्या निंबोळ्या उन्हात चांगल्या वाळवून घेतल्या जातात.

2. निंबोळ्या चांगल्या वाळल्यानंतर कोल्ड प्रेस पद्धतीने निंबोळी पेंड तयार केली जाते.

3. तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फायदेशीर असते. 

4. निंबोळी पेंड किंवा निंबोळी भुकटीचा वापर जमिनीतूनही करता येतो.

5. निंबोळी पेंडीच्या वापरामुळे नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना वाढीच्या अवस्थेत दीर्घकाळपर्यंत होतो.

6. कडुनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये मिसळल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात या पद्धतीमुळे जमिनीतील किडीचे तसेच पिकांवरील रस शोषक किडींना अटकाव करता येतो.

7. जमिनीतील हानिकारक किडी जसे मुळे कुडतडणारे अळ्या हुमणी मिलिबग आदींवर नियंत्रण ठेवता येते. फळभाज्या पिकांच्या मुळांवर गाठी करणाऱ्या हानीकारक सूत्रकृमींना रोखता येते.

8. निंबोळी पेंडीतील घटक जमिनीत हळूहळू मात्र दीर्घकाळपर्यंत काम करतात त्यामुळे सहा महिन्यापर्यंत त्यांचा परिणाम दिसून येतो.

9. रासायनिक नत्रयुक्त खतांची 25 टक्क्यांपर्यंत बचत होते.

10. पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर 3 ते 6 आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.


निंबोळी अर्क:-

1.झाडाखाली पडलेल्या व चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून जमा करावेत.

2.जमा केलेल्या निंबोळ्या स्वच्छ करून उन्हात वाळवून त्यांची साठवणूक करावी.

3.निंबोळी अर्काची फवारणी करायच्या एक दिवस आधी आवश्यक तेवढी निंबोळी कुठून बारीक करून घ्यावी.

4.एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात बारीक केलेला निंबोळीचा चुरा भिजत ठेवावा (प्रमाण: पाच किलो चुरा अधिक नऊ लिटर पाणी) सोबतच दुसऱ्या बादलीमध्ये एक लिटर पाण्यात साबणाचा 200 ग्रॅम चुरा भिजत ठेवावा. दोन्ही मिश्रणे साधारण 24 तास भिजत ठेवावीत.

5.चोवीस तासानंतर पाण्यात भिजत ठेवलेले निंबोळी सूर्याचे द्रावण काठीने चांगले ढवळून घ्यावे. मिश्रण साधारणपणे पांढरट रंगाचे दिसते.

6.चांगले ढवळल्यानंतर निंबोळी अर्क स्वच्छ फडक्यातून गाळून घ्यावा. तयार अर्कामध्ये साबणाचे द्रावण मिसळून घ्यावे.

7.एका टाकीमध्ये 90 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये तयार केलेले दहा लिटर अर्क मिसळून हे द्रावण चांगले ढवळून घ्यावे. तयार निंबोळी अर्क शिफारशी प्रमाणे फवारण्यासाठी वापरावा.


कडुनिंबाच्या पानांचा अर्क:-

अर्क बनवण्यासाठी कडुनिंबाची सात किलो पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करावीत. बारीक केलेले पानांचे मिश्रण पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ कापडामधून मिश्रण गाळून घ्यावे तयार अर्क 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा.


निंबोळी अर्काचे फायदे:-

1.निंबोळीतील अझाडिरॅक्टिन या घटकामुळे झाडाचे किडीपासून संरक्षण होते. किडींचे जीवन चक्र संपुष्टात येते.

2.निंबोळीतील सालीमध्ये डीएसीटील अझाडिरॅक्टिनोल या महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो. हे घटक पिकांवरील भुंगे, खवले कीटक यांच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करतात. हे घटक किडींच्या शरीराच्या रचनेत व क्रियेत बदल घडवून किडींना अपंगत्व आणतात.

3.निंबोळी मध्ये मिलियन ट्रिओल घातक घटक देखील असतो. हा घटक किडींना झाडांची पाने खाण्यास अटकाव करतो. त्यामुळे झाडे निरोगी राहून त्यांची वाढ चांगली होते.

4.निंबोळी मधील निंबिडीन व निंबिन या महत्त्वाच्या घटकांमध्ये विषाणू विरुद्ध लढण्याची शक्ती असते. त्यामुळे पिके आणि जनावरातील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.

5.निंबोळी मध्ये किडीस अंडी घालण्यास प्रतिबंध, अंडी नाशक, कीड रोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीड वाढ विरोधक व कीड नियंत्रण असे विविध महत्त्वाचे गुणधर्म असतात. निंबोळी अर्क हा रस शोषणाऱ्या किडी, ठिपक्यांची बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, हिरवी बोंड अळी, पाने गुंडाळणारी अळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, घाटे अळी, एरंडीवरील उंट अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी तसेच ज्वारी व मक्यावरील खोड कीड, टोमॅटो वरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, घरमाशी, मिलीबग, मुंगी व भुंग्यांच्या प्रजाती, झुरळ्याच्या प्रजाती इत्यादी. किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे पीक संरक्षणासोबतच साठवणुकीच्या धान्यातील विविध किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

6.निंबोळी अर्क हे बुरशीनाशक, जिवाणू नाशक, विषाणू रोधक म्हणून उत्तमरीत्या काम करते


निंबोळी तेल:-

1. उन्हात चांगल्या वाळविलेल्या निंबोळ्या तेल काढण्यासाठी वापराव्यात प्रथम वाळलेल्या निंबोळी वरील साल काढून घ्यावी.

2. त्यानंतर निंबोळीचा पांढरा गर उकळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा त्यात थोडे पाणी टाकावे.

3. तयार लगद्याचा गोळा एका पसरट भांड्यात थापून घ्यावा. त्यामुळे पृष्ठभागावर तेल जमा होईल. तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून तेल काढावे. पुन्हा एकदा हाताने घट्ट दाबून गोळ्यातील तेल पूर्णपणे काढून घ्यावे.

4.तेल काढल्यानंतर उरलेला गोळा उकळत्या पाण्यात टाकावा. त्यामुळे गरम पाण्यावर तेल तरंगायला लागेल. हे तेल चमच्याने बाजूला काढून घ्यावे.

5. तेल काढण्यासाठी लाकडी घाण्याचा वापरही करता येतो. लाकडी घाण्यांमधून अधिक प्रमाणात तेल मिळते ही एक पारंपरिक पद्धत आहे.

6. साधारणपणे एक किलो निंबोळी बियांपासून पासून 100 ते 150 मिली तेल मिळते.

7. फवारणीवेळी निंबोळी तेल एक ते दोन टक्के या प्रमाणात वापरावे.

8. निंबोळी तेलाची फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावी.


कडुनिंबचे इतर फ़ायदे :-

1. निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.

2. निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.

3. निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.

4. निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.

5. निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

6. निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.

स्रोत-शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर, संचलित

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇 

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy