उन्हाळी हंगाम । जमीन मशागत । कीड व्यवस्थापन ।

 🏫IPM SCHOOL🌱



उन्हाळी हंगामात जमीन मशागतीद्वारे सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी व्यवस्थापन


सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी यांच्यापासून विविध पिकांचे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. तथापि, उन्हाळी हंगामात जमीन मशागत व मशागतीशी निगडीत असलेल्या उपाय योजनांद्वारे त्यांचे प्रभावी नियंत्रण कसे करावे हे पाहणार आहोत.

   सूत्रकृमी, हुमणी आणि वाळवी यांचे विविध मार्गाने प्रभावी नियंत्रण करण्यासाठी त्यांचे जीवनक्रमाशी, प्रादुर्भावाची लक्षणे व ती वाढण्याची कारणे, आर्थिक नुकसान करण्याची पातळी आणि त्यापासून पिकांचे होणारे नुकसान यासंबंधी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.


*सूत्रकृमी*

सूत्रकृमी हा जमिनीत मातीच्या कणांच्या पोकळीत वास्तव्य करून पिकांचे नुकसान करणारा अतिसूक्ष्म धाग्यासारखा लांबट प्राणी असून त्याची सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. असते. तो जमिनीत अगर झाडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतो. महाराष्ट्रामध्ये विविध पिकावर ७५ प्रकारच्या सूत्रकृमी जरी आढळत असल्या तरी मुळांवर गाठी करणारी, मूत्रपिंडीय, लिंबूवर्गीय पिकांवरील आणि मुळांवर बिळे तयार करणारी सूत्रकृमी या चार सूत्रकृमी आपली प्रमुख समस्या असून त्यांच्यापासून दरवर्षी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.


*पिकांवरील प्रादुर्भावाची लक्षणे*

  सूत्रकृमी मुळांना इजा करतात. त्यामुळे मुळांच्या अन्न व पाणी शोषण कार्यात अडथळा निर्माण होऊन झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून, फुले व फळांची अकाली गळ होते, झाडे निस्तेज व सुकलेली दिसतात. सुत्रकृमींच्या कमी अधिक प्रमाणामुळे शेतात पिकांची एकसारखी वाढ दिसून येत नाही. रुंद पानांच्या वनस्पती दिवसा सुकल्यासारख्या दिसतात.


*सुत्रकृमींचे नियंत्रण*

१) जमिनीची खोल नांगरट सूत्रकृमींच्या सर्वच अवस्था जमिनीत असतात त्यांना जगण्यासाठी प्रामुख्याने ओलावा व पिकांची जरुरी असते. तेव्हा उन्हाळ्यामध्ये जमिनीची एक अथवा एक महिन्याच्या अंतराने दोनदा खोल नांगरट करून माती कमीत कमी एक महिना तापू दिली तर सुत्रकृमींच्या सर्वच अवस्थांचा नाश होऊन पुढील पिकांवरील प्रादुर्भाव कमी होतो.

२) सूत्रकृमीग्रस्त मुळांचा व तणांचा नायनाट पिकांव्यतिरिक्त सुत्रकृमी विविध द्विदल तणांवर उपजीविका करतात. उन्हाळ्यापूर्वी शेतात असणाऱ्या सूत्रकृमीग्रस्त पिकांची आणि तणांची मुळे अथवा त्यांचे अवशेष उपटून अथवा नांगरणीनंतर एकत्र गोळा करून जाळून नष्ट करावीत त्यामुळे सुत्रकृमीच्या वाढीस पुढील हंगामात प्रतिबंध होईल.

३) उन्हाळ्यात जमिनीच्या नांगरणीनंतर कुळवणी केल्याने ढेकळे फुटून जमिनीचा भुसभुशीतपणा वाढून मातीतील ओलावा कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नांगरणीमुळे सूत्रकृमीग्रस्त पिकांची गाडली गेलेली मुळे व त्यांचे अवशेष कुळवणीमुळे उघडी पडतात. अशी मुळे गोळा करून जाळून नष्ट करावीत.

४) सेंद्रिय खतांचा वापर-उन्हाळ्यात शेताची नांगरट करण्यापूर्वी अथवा नांगरटीनंतर लाकडी फळीच्या साहाय्याने ढेकळे फोडून जमीन सपाट करावी आणि चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी २० ते २५ टन अथवा निंबोळी, एरंडी किंवा करंजी पेंड प्रतिहेक्टरी २ टन जमिनीत चांगली मिसळावीत. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच परंतु सेंद्रिय खत कुजताना त्यातून बाहेर पडणाऱ्या फॉलिक संयुगांमुळे सुत्रकृमींचे चांगले नियंत्रण होते. त्याचप्रमाणे सेंद्रिय खतांवर उपयोगी बुरशी व जिवाणू वाढतात, त्यांच्यापासून सुत्रकृमीचे चांगले नियंत्रण होते.

५) माती तापविणे- उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यांमध्ये हवेतील तापमान साधारणतः ४० ते ४५ अंश सें.ग्रे. पर्यंत जाते. अशावेळी जमीन पारदर्शक प्लॅस्टिकच्या आच्छादनाने झाकली तर आणखी ४ ते ५ अंश सें.ग्रे. तापमान वाढून जमिनीतील सूत्रकृमीचा चांगला बंदोबस्त होण्यास मदत होते. यासाठी १०० गेज जाडीचे पारदर्शक प्लॅस्टिक कागद जमीन वापशावर असताना पसरावे व त्याच्या चोहोबाजूंच्या कडा मातीने हवाबंद करून १५ ते २० दिवस ठेवावे व नंतर प्लॅस्टिकचे आच्छादन काढून जमीन लागवडीसाठी वापरावी. रोपवाटिकेत निरोगी रोपे तयार करण्यासाठी ही एक प्रभावी व किफायतशीर उपाययोजना आहे.


*हुमणी*

  अलीकडे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, बाजरी, भाजीपाला आणि फळझाडे यांच्यावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झालेले आढळून आले आहे. हुमणीचा उपद्रव तिच्या दोन जीवनावस्थांत होतो. त्यापैकी भुंगेरे ही झाडांची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. विशेषतः अळी अवस्था ही पिकास अत्यंत हानिकारक आहे, हुमणीच्या अति प्रादुर्भावामुळे कधीकधी १०० टक्के पर्यंत पिकाचे नुकसान होते.


*हुमणीचे नियंत्रण:-*

हुमणीच्या जीवनावरून एक गोष्ट लक्षात येते की, या किडीच्या चार  अवस्थापैकी तीन अवस्था या जमिनीखाली पूर्ण होतात. याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सूर्यास्तानंतर मीलनासाठी बाभळीच्या आणि कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हा होय,


१) भुंगेऱ्याचा बंदोबस्त- पहिला पाऊस ३० ते ३५ मि.मी. होताच हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, लिंब, बोर या सारख्या झाडावर पाने खाण्यासाठी गोळा होतात भुंगेऱ्याचा नाश करण्याची हीच योग्य वेळ असते. हे झाडावरचे भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत व ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या उपाय योजनेमुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होतो व हुमणीच्या पुढील उत्पत्तीस आळा बसतो.

२) अळींचा बंदोबस्त- उन्हाळ्यात जमिनीची १५ ते २० सेमी खोल नांगरट करावी.नांगरटीमुळे उघड्या पडणाऱ्या हुमणीच्या अळ्या पक्षी खातात शक्यतो अशा अळ्या गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात. कुळवणी अथवा तत्सम मशागत करते वेळी सापडणाऱ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.


*वाळवी*


वाळवी जमिनीच्यावर घर बांधते, त्याला वारूळ असे म्हणतात. वाळवीला लाकडातील पांढऱ्या मुंग्या असेही संबोधतात. वाळवीमुळे शेतातील विविध पिकांचे होणारे नुकसान ही एक गंभीर समस्याच आहे. ही कीड आंब्याच्या फांद्या, चिक्कू, डाळिंब, पेरू, लिंबू या फळझाडांचे तसेच कापूस, ऊस, गहू, मिरची, वांगी, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकाचे नुकसान करते. वाळवी कुजलेल्या व वाळलेल्या पदार्थावर उपजीविका करते. वेलवर्गीय आणि फळ झाडाची साल खाऊन वाळवी भयंकर नुकसान करते. सुरुवातीला ती फक्त वरवरचा भाग खाते पण जसजशी ती गाभाऱ्यात प्रवेश करते तसतसे नुकसान वाढत जाते. वाळवी शेणखताचेही खूप नुकसान करते. ती शेणखतातील वाळलेला, कुजलेला काडीकचरा खाऊन टाकते त्यामुळे वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या नत्राचे प्रमाण घटते. वाळवीच्या शरीरात असणाऱ्या प्रोटोझुआमुळे वाळवीला लाकूड आणि सेल्युलोज पचविणे सहज शक्य होते.


*वाळवीचे नियंत्रण*


१) वाळवीच्या व्यवस्थापनात वारुळांचा नाश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीच्या वर वाढणारी वारुळे सहजपणे दृष्टीस पडतात अशी वारुळे खोदून त्यातील राणीचा नाश करावा त्यामुळे पुढील उत्पत्तीस आळा बसतो. कायम बंदोबस्तासाठी वारुळाला १५ ते २० से. मी खोल भोक पाडून त्यात १२ ते १८ मि.ली. रॉकेल, पेट्रोलसारखे धुरीजन्य पदार्थ ओतावेत. 

२) शेतातील सुकलेली झाडे व वाळलेली धसकटे यांचा ताबडतोब नाश करणे वाळवीचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते. अर्धवट कुजलेल्या शेणखताकडे वाळवी आकृष्ट होते तेव्हा असे खत शेतात नये.

३) जुन्या झाडाची बुंध्यापासून एक फुटापर्यंत साल व्यवस्थित स्वच्छ करून गेरू पेस्ट लावावी.

४) कुंपणाच्या लाकडी खांबाचे वाळवीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खांब पुरण्यासाठी सिमेंट आणि वाळू याचा उपयोग करावा त्यामुळे जमिनीचा व लाकडाचा संपर्क येणार नाही व त्याचे वाळवीपासून संरक्षण होईल.

स्रोत-शेतकरी मासिक 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean