जमिन | सुपीकता वाढविण्याचे मार्ग | Improve Soil Fertility |

 🏫IPM SCHOOL🌱 




देशातील एकरी उत्पादकतेचा अभ्यास केल्यास इतर देशांपेक्षा आपल्याकडील शेतीची उत्पादकता फारच कमी आहे. सध्या शेतकरी यांत्रिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी करत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल व इतर जनावरांचे प्रमाण कमी झाल्याने सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ही कमी झालेले आहे. त्यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. विशेष करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विपरीत परिणाम मानवाच्या आणि मातीतील सूक्ष्म जिवाणूच्या आरोग्यावर होत असतो. 
   मातीचे आरोग्य जपताना मातीत असलेल्या उपयोगी सूक्ष्मजीवांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. शेणखतासोबतच शेतकर्यांनी शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त क्षेत्रावर हिरवळीच्या खतांचा वापर करावा. पीक उत्पादनाकरिता जमीन वापरताना पाण्याचा योग्य वापर व्हायला हवा म्हणजेच पारंपरिक ऐवजी सूक्ष्म सिंचनाद्वारे पिकास पाणी देण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी पिकाची फेरपालट होणे आवश्यक आहे रासायनिक खते आणि कीटकनाशकाची शिफारस केल्याप्रमाणे कमीतकमी वापर होणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

जमिनीची सुपीकता वाढविण्याचे मार्ग:-


भर खते:-

 जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असताना, जमिनीची घडण बिघडली असेल, जमीन क्षारयुक्त असेल, जमिनीची जलधारण क्षमता फार कमी असेल तर भरखताचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी हिरवळीचे खते, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडीचे खत, लेंडीखत यासारखे पदार्थ वापरल्यास फायदा होतो. उसाचे पाचट कुजणाऱ्या जिवाणू सोबत आच्छादन म्हणून वापरल्यास पाणी वापरण्यात बचत होते व पाचट कुजवून त्याचे चांगले खत होते तसेच गांडूळ खताच्या वापराने रासायनिक खताच्या वापरात बचत होते. अन्नद्रव्य पुरवठा वाढतो. जमिनीचा पोत सुधारतो, जलधारण क्षमता वाढते. क्षारता, चोपणपणा कमी होण्यास मदत होते व पाणी कमी लागते. जमीन भुसभुशीत होते व पीक निरोगी राहते.

पिकांची फेरपालट व द्विदल पिकांचा फेरपालट मध्ये समावेश:-
  एकच पीक सतत घेण्याने दोन तोटे होतात एक म्हणजे जमिनीची प्रत बिघडते व दुसरे जमिनीत सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पिकाची सतत फेरपालट करणे व त्यामध्ये द्विदल पिकांचा समावेश करणे गरजेचे आहे. पिकाची फेरपालट करण्याने मशागतीचा खर्च कमी होतो. मशागत चांगल्या प्रतीची होते व भर खताच्या वापराबाबत बचत होते.

पूर्व मशागत व आंतरमशागत:-

 भारी जमिन दीर्घ मुदतीच्या बागायती पिकामध्ये जमिनी घट्ट होणे, कडक होणे, मुळाची पूर्ण वाढ न होणे, हवा व पाणी याचा समतोल बिघडणे वगैरे गोष्टी नजरेस येतात हे टाळण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत व नंतरची आंतरमशागत याकडे लक्ष दिले तर जमीन सुपीक राहण्यास मदत होते. जमिनीची भौतिक स्थिती ही  मशागतीच्या स्वरूपावर अवलंबून राहते व पिकाला मिळणारा प्रतिसाद हा जमिनीचे स्थिती व घडणी वरच अवलंबून राहतो.

जैविक खतांचा वापर:-

  जैविक खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनात वाढ, वरखताच्या वापरात बचत, सेंद्रिय स्वरूपात पिकाला नत्राचा सतत पुरवठा, स्फुरद अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मोठी मदत होते. जमिनीत नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून आपण ॲझेटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, रायझोबियम याचा वापर करू शकतो. तसेच स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू वापरून स्फुरदयुक्त खतांवरील खर्च कमी करून पुरवठाही वाढवू शकतो. तसेच गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू खते सुद्धा आज उपलब्ध झाली आहेत जैविक खताच्या वापरामुळे उगवण व पिकाची झपाट्याने वाढ होते. पिकात रोगप्रतिकारशक्ती वाढणे, जमिनीचा पोत सुधारणे यासारखे फायदे होतात. 

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर:-

 प्रत्येक पिकाला निरनिराळ्या १७ अन्नद्रव्याची गरज असते. काही अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात तर काहींची गरज अत्यंत मर्यादित असते. ही गरज कमी असली तरी त्याचे महत्त्व जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अन्नद्रव्य सारखेच असते. मंगल, जस्त, तांबे, बोरॉन व मॉलिब्डेनम यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते. या अन्नद्रव्याच्या उपस्थित नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर पुरेपूर होऊ शकते. चुनखडीयुक्त जमिनीत, विम्ल जमिनी, सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची गरज जास्त असते. ही अन्नद्रव्ये वरखताच्या माध्यमातून जमिनीतून अथवा फवारणीच्या रूपाने अथवा सेंद्रिय स्वरूपात वापरता येतात.

समतोल खतांचा वापर:-

 नत्र, स्फुरद व पालाश ही पिकाला लागणारी महत्त्वाची अन्नद्रव्ये आहेत. त्याचा पुरवठा करण्यासाठी आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश व इतर खते वापरतो. ही खते वापरताना आपण काही काळजी घेतली तर खतापासून मिळणारे फायदे तर मिळतातच परंतु त्याचे अति व सतत वापराने जमिनीच्या सुपीकतेवर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. खते देताना त्याचा प्रत्येक कण पिकाला उपयोगी पडेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नत्र खताच्या बाबतीत ते वेगाने उपलब्ध झाल्यास पिकाला तितक्या वेगाने ते घेता येत नाही, त्यामुळे उपलब्ध नत्र एकतर निचऱ्यावाटे निघून जाते किंवा जमिनीचा सामू जास्त असल्यास त्याचे वायूकरण झाल्याने ते उडून जाते अथवा कमी दिल्यास त्याची स्थिरीकरण होण्याचा धोका असतो हे टाळण्यासाठी युरियाचा वापर करीत असताना ते निंबोळी पेंड, करज पेंड बरोबर मिसळून द्यावे त्यामुळे त्यातील नत्र पिकाला मिळते. स्फुरदाच्या बाबतीत ते जमिनीत अविद्राव्य होत असल्याने त्याची उपलब्धता झपाट्याने कमी होते हा परिणाम टाळण्यासाठी स्फुरद देताना ते शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबर मिसळून एकास एक प्रमाण दिल्यास दीर्घकाळ पिकांना मिळू शकते. 
          नत्र, स्फुरद, पालाश खते देताच त्याचे एकमेकाशी काय प्रमाण आहे याला खूप महत्त्व असते. नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्ये देतात ती शिफारशीत प्रमाणात दिल्यास जास्त फायदा होतो. अशा वापराला समतोल खतांचा वापर असे म्हणतात तसेच नत्र, स्फुरद व पालाश खतांचा वापर करताना एकाच वेळी सेंद्रिय व जैविक स्वरूपात देता आली तर त्याचा जास्त फायदा होतो यालाच एकात्मिक वापर असे म्हणतात. एकात्मिक वापरामुळे जमिनीची सुपीकता पातळी वाढण्यास मोठी मदत होते.

 क्षारयुक्त व चोपण जमिनी सुधारण्याचे मार्ग:-

   जमिनीत विद्राव्य क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास पिकाला अन्नद्रव्य व पाणी शोषण करण्यास फार अडचण येऊन पीक उत्पादनात घट होते. जमिनीतील क्षार निघून जावेत म्हणून भरखतांचा वापर व निचऱ्याची सोय करणे हे नेहमीच योग्य आहे. क्षारता मानवणारे किंवा क्षारता कमी करणारे पीक घेणे हा दुसरा पर्याय आहे. जमिनीत मुक्त सोडियमचे प्रमाण जास्त असले की जमिनीचा सामू ८.५ वर असतो हे प्रमाण कमी करण्यासाठी जिप्सम अथवा आयर्न पायराइट याचा वापर करावा. तसेच जमिनीचा सामू कमी करण्यासाठी गांडूळ खतांचा वापर करता येतो. जमीन क्षारयुक्त होणारच नाही असा प्रयत्न केल्यास जमीन बिघडण्याची वेळच येत नाही. जेथे विहिरीचे पाणी खारे आहे. व गोड पाणी उपलब्ध नाही तेथे विहिरीच्या पाण्यात फेरस अमोनियम सल्फेट अर्धा ते एक किलो दर सहा महिन्यांनी पाण्यात मिसळून दिल्यास पाण्यातील क्षार गाळाच्या रूपाने खाली तळाशी बसतात.

शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब:-

 सध्याची शेती पद्धतीला आपण पारंपरिक शेती पद्धती असे म्हणतात. कारण या पद्धतीत अनेक रासायनिक पदार्थाचा रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके इत्यादींचा वापर होतो. असंतुलन झाल्यास एकतर त्यामुळे प्रदूषण वाढते, पिकांची प्रत बिघडते, जमिनी खराब होतात, जिवाणूंची व गांडुळाची कार्यक्षमता कमी होते. जमिनीची सुपीकता पातळी कमी होऊन त्या नापीक होण्यास सुरुवात होते. हे सर्व टाळण्यासाठी आपण सेंद्रिय शेती, गांडूळ शेती, वनशेती या पद्धतीचा जमेल तितक्या प्रमाणात अवलंब करणे गरजेचे आहे.

 अवर्षणग्रस्त परिस्थितीत शेतजमिनीचे नियोजन:-

 ज्या भागात कमी पाऊस पडतो जिथे उपसा सिंचन योजना राबविल्या जात नाहीत. उन्हाळ्यात नद्या व विहिरी फार कोरड्या पडतात. अशा ठिकाणी पाण्याच्या थेंबा-थेंबाचा उपयोग होण्यासाठी जमिनीची जलधारण क्षमता वाढवावी म्हणून सेंद्रिय भर खतांचा सढळ हाताने वापर करावा. पाचटाचा आच्छादन म्हणून वापर करावा गांडूळ खताचा वापर करावा.

अपशिष्ट पदार्थाचे चक्रीकरण(पिकांच्या अवशेषांचा वापर):-

 आपण जेव्हा पीक घेतो, तेव्हा पीक जमिनीतून अनेक द्रव्याचे शोषण करते ऊन, वारा, पाऊस यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी व उत्पादन क्षमता दोन्हीत घट येते जे पिकाने घेतले ते जमिनीला परत केले गेले तरच पुढचे पीक चांगले येऊ शकते. त्यासाठी पिकातील खाण्यास योग्य भाग सोडून बाकीचे सर्व अवशेष जमिनीला परत केले तर जमिनीची सुपीकता पातळी टिकवून ठेवण्यास सोपे होईल. यालाच अपशिष्ट पदार्थांचे चक्रीकरण असे म्हणतात या पद्धतीचा वापर केल्यास अनेक फायदे होतात. त्यात जमिनीतील ऊर्जा साठा वाढवून सूक्ष्म जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते. जमिनीतील स्थिर स्वरूपातील ह्युमसचे प्रमाण वाढल्याने जमीन सुधारते व तिची सुपीकता पातळी वाढते, जमिनीची जलधारण क्षमता वाढते व पीक उत्पादनात वाढ होते.

 मृदासंधारण:-

 पावसामुळे व पिकास सतत पाणी देणे यामुळे जमिनीची होत असते व वरचा सुपीक भाग हळूहळू वाहून जातो व जमीन नापीक होऊ शकते. त्यासाठी मशागत पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक ठरते. अशा कमी उताराच्या जमिनीत उताराच्या बाजूस सत्या पाडाव्यात तर जास्त उतार असलेल्या जमिनीत समपातळी सन्याचा अवलंब करावा. समपातळी बांध घालावेत नंतर लागवडीची कामे करावेत बाधावर गवत, उंच वाटणारी झाडे लावावीत. 

जमिनीच्या गुणधर्मानुसार पीक नियोजन:-

 जमिनीच्या भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्मानुसार जमिनीचे व पिकाचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. तसेच ते जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असते परिस्थितीनुसार कोणती पिक लावावीत याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 अन्नद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची:-

  जमिनीत एकूणच अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असली तरी ही अन्नद्रव्ये पिकाची मुळे शोषून घेऊ शकतील अशा स्वरूपात असणे गरजेचे असते याशिवाय हवामान, जमिनीचा प्रकार, पीक पद्धती अशा निरनिराळ्या घटकामुळे या प्रमाणावर परिणाम होत असतो हे प्रमाण सतत बदलत असते म्हणूनच माती परीक्षणाच्या आधारे हे प्रमाण जाणून घ्यावे व त्यानुसार पिकाची लक्षात घेऊन खतांच्या शिफारशी कराव्यात, जमिनीच्या गुणधर्मावर जमिनीचे आरोग्य ठरते व त्यावरच अन्नद्रव्याची उपलब्धता अवलंबून असते. जमिनीचा सामू व्यवस्थित राखणे, जमिनीत विद्राव्य क्षाराचे प्रमाण कमी ठेवणे, सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारून हवा, पाणी यांचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. सिंचनाच्या पाण्याचा योग्य वापर करावा, पीक फेरपालट, जमिनीचा निचरा व्यवस्थित राखणे, शेणखत, कंपोस्ट खत व हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा खराब झालेल्या जमिनीत शिफारशीत भूसुधारकांचा वापर करावा. माती परीक्षणानुसार खतांचा एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीनुसार संतुलित वापर करावा.

सध्या उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये चालू आहे.परिणामी जमिनीचे आरोग्य, पोत बिघडून उत्पादकता कमी होत चालली आहे. जर जमिनीचे आरोग्य टिकून राहायचे असेल तर वर चर्चा केलेल्या सर्व उपाययोजनांचा आपल्या जमिनीवर वापर करणे गरजेचे आहे. तरच जमीन उपजाऊ राहून पृथीवरील मानवजातीला अन्न उपलब्ध होईल. 
स्रोत-शेतकरी मासिक. 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean