मिरची | किडीं | एकात्मिक व्यवस्थापन | IPM |
🏫IPM SCHOOL🌱
मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकामध्ये किडींच्या प्रादुर्भावामुळे कमी उत्पादन मिळते. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. यामध्ये सुरुवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.
मिरचीमध्ये सुरुवातीपासून थ्रिप्स(फुलकिडे) प्रादुर्भाव दिसून येतो. मिरचीमध्ये रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजनित रोग पसरवला जातो त्यामुळे उत्पन्नावर खूप परिणाम होतो. त्याचबरोबर मावा, पाने खाणारी स्पोडो अळी आणि फळ पोखरणारी अळीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतो. त्यामुळे मिरची पिकामध्ये येणाऱ्या किडींचे व्यवस्थापन अगदी सुरुवातीच्या काळापासून करावे लागते.
मिरचीमधील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन:-
* कीड सहनशील वाणाची लागवड करावी.
* पिकाची फेरपालट करावी. शेतामध्ये मिरची पिकावर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
* मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
* मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. तसेच झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसांची १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
* निंबोळी पेंड दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर) १०० किलो प्रति एकरी विभागून द्यावी.
* मिरचीमध्ये येणाऱ्या पांढऱ्या माशी, फुलकिडे आणि ब्लॅक थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे आणि सोबत पांढरे चिकट सापळे प्रत्येकी १५ ते २० प्रति एकर लावावेत.
* क्रायसोपाच्या अळ्या २ प्रति झाड रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
* पाने खाणाऱ्या आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति एकर १० कामगंध सापळे लावावेत.
* फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी १ लाख प्रति एकर शेतामध्ये सोडावेत.
* ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
* पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच सायंकाळच्या वेळी एसएलएनपीव्ही २५० एलई प्रति ५०० लिटर पाण्यामधून फवारणी करा.
* फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एचएनपीव्ही (२५० एलई) प्रति ५०० लिटर पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.
* कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तरच रासायनिक कीटकनाशकांची मदत घ्यावी.
* मिरचीवरील फुलकिडे मावा, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता फिप्रोनील (५ टक्के) १.६ मि.लि किंवा स्पीनोसॅड (४५ एसएल) ०.३२ मि.लि. प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
* कोळीच्या नियंत्रणाकरिता स्पायरोमेफेसीफेन (२२.९ एससी) ०.८ मि.लि.प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
* रासायनिक कीटकनाशक एमॅमेक्टिन बेंझोएट ५% SG ४ ग्राम किंवा इंडोक्साकार्ब १४.५% SC ६.५ मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करू शकता.
* फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी घेऊन गरजेनुसार फवारणी करावी. एकच कीटकनाशक सारखे वापरू नये. कीटकनाशके वापरताना आलटून पालटून वापरावीत.
संदर्भ-अग्रोवोन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा