जमिनीचा सामू । Soil PH । पिकांवर होणारा परिणाम ।

 🏫IPM SCHOOL🌱



जमिनीचा सामू(PH):-

सामू म्हणजे जमिनीची आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक, सामूचा जमिनीची सुपीकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादनक्षमता यांच्याशी संबंधित आहे. प्रत्येक जमिनीचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. हे गुणधर्म भौतिक, रासायनिक व जैविक स्वरूपाचे असतात. जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचे मूळ, निचरा क्षमता, आकार, घनता, हवा व पाणी यांचा अभ्यास करता येतो. 

      रासायनिक गुणधर्माच्या माहितीमुळे अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण, निरनिराळ्या अन्नद्रव्यांतील आंतरप्रक्रिया याची माहिती होते. जैविक गुणधर्मामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता व त्यांच्या कार्यक्षमतेतील फरकामुळे अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये होणारे फेरबदल, हवेतील नत्राचे जमिनीत होणारे स्थिरीकरणाबाबतची माहिती मिळते. मृदा चाचणी करताना रासायनिक गुणधर्माचा प्रामुख्याने विचार केला जातो. यात सामू, सेंद्रिय कर्ब, क्षारता, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश या घटकांची प्रामुख्याने चाचणी करून अहवाल तयार केला जातो. त्यानुसार शिफारशी दिल्या जातात. या सहा घटकांपैकी सामू या घटकाला विशेष महत्त्व आहे. 


*सामू नियंत्रण:-*

जमिनीचा सामू उदासीन असणे केव्हाही योग्य असते. आम्ल जमिनीत सामू वाढविण्यासाठी चुनखडी किंवा डोलोमाईटचा वापर करावा लागतो.

विम्ल जमिनीत सामू कमी करावा लागतो. त्यासाठी जिप्सम, गंधक, आर्यन पायराईट, प्रेसमड केक यांचा वापर करावा लागतो.

जमीन सुधार पदार्थांचा वापर केल्यावर सामू उदासीन पातळीवर यायला कित्येक आठवडे किंवा काही महिने लागतात. कारण जमिनीमध्ये सामूत फार वेगाने बदल होऊ नये म्हणून सामू विरोधक नैसर्गिक शक्ती (बफरिंग कपॅसिटी) असते. या शक्तीमुळे सामूत होणारे बदल अत्यंत किंवा कमी वेगाने घडतात.


*सामूचा जमिनीच्या सुपीकता पातळीशी असलेला संबंध:-*

 सहा ते आठ सामू असणाऱ्या जमिनी सुपीक असू शकतात. मात्र सामू सहाच्या खाली किंवा आठच्या वर असेल, तर त्या जमिनीत चांगले पीक घेणे अवघड जाते. अशा जमिनी नापिक नसल्या तरी फार चांगल्या सुपीक नसतात. मात्र जमीन सुधार पदार्थांचा वापर करून जमिनीचा सामू उदासीन पातळीवर आणल्यावर ती जमीन मशागतीच्या सर्व कामाला उत्तम प्रतिसाद देते.


*सामू आणि जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता:-*


जमिनीत होणाऱ्या अनेक रासायनिक प्रक्रिया या जैविक स्वरूपाच्या असल्याने त्यांना जैवरासायनिक प्रक्रिया असे म्हणतात. या प्रक्रियेत जिवाणू व कवक हे सूक्ष्म जीव असतात. जिवाणूंना फार आम्लता मानवता नाही, तर कवक गटातील जिवाणूंना फार विम्लता मानवत नाही. सेंद्रिय पदार्थांचे विघटन, युरिया खतांना नत्रीकरण, हवेतील नत्राचे स्थिरीकरण या गोष्टी जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहतात.

सर्व तर्हेच्या सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता, गांडुळांची कार्यक्षमता ही जमिनीचा सामू सहा ते आठ असतानाच जास्त प्रभावशाली असते.


*जमिनीचा सामू म्हणजे काय?*


* सामू म्हणजे जमिनीचा आम्लता, विम्लता दर्शविणारा निर्देशांक.

* जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीच्या सामूवर अवलंबून असते. ज्या जमिनीचा सामू सहा ते सात इतका असतो, अशा जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक असते. शेतीच्या दृष्टीने अशा जमिनी अत्यंत उपयुक्त असतात.

* जसजसा सामू वाढेल अथवा कमी होईल तसतशी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या कार्यक्षमतेवरही सामूचा परिणाम होत असतो. आम्ल गुणधर्मीय जमिनीत कडधान्य पिकांच्या मुळावरील जिवाणूंची वाढ समाधानकारक होत नाही. त्यामुळे आम्ल गुणधर्मीय जमिनीत कडधान्य पिके चांगली वाढत नाहीत.

* ज्या जमिनीचा सामू साधारण नऊ इतका असतो, अशा विम्ल गुणधर्मीय जमिनीत कॅल्शिअमसारखी खनिजद्रव्ये स्थिर होतात, वनस्पतींना ती सहजपणे उपलब्ध होत नाहीत.



*सामूचा होणारा परिणाम:-*

* जास्त आम्ल जमिनीत आम्लपणामुळे व जास्त विम्ल जमिनीत विम्लपणामुळे पिकांच्या मुळावर व त्याच्या पेशीवर विपरीत परिणाम होऊन ती निकृष्ट बनतात. पेरलेली बी उगवण न होता मरून जाण्याची शक्यता असते.

* आम्ल जमिनीत लोह, ऍल्युमिनिअम, मंगल व ताम्र यांचे प्रमाण वाढते. त्याचा विषारी परिणाम पिकावर होतो. बुरशीजन्य रोग हे आम्ल जमिनीतच होतात. तसेच काही जंतूंमुळे होणारे रोग जास्त आम्ल किंवा विम्ल जमिनीतच होतात. उसावरील केवडा रोग जास्त विम्ल जमिनीतच आढळून येतो.

* अन्नद्रव्य पदार्थांच्या उपलब्धतेचा सबंध पिकांना लागणाऱ्या सर्व आवश्यक अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यात जमिनीच्या सामूचा महत्त्वाचा वाटा असतो. जमिनीच्या सामूत बदल झाला तर विशिष्ट अन्नद्रव्यांचा पुरवठा एकदम कमी होतो, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. सामूतील बदलामुळे सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर बदल होतो.

* नत्र अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीचा सामू सहा ते नऊ असताना जास्त असतो. 

* स्फुरद अन्नद्रव्य जमिनीचा सामू सहा ते सात असतानाच सहजपणे मिळू शकतो. 

* सामू सहा ते नऊ असताना पालाश व गंधक अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिसळतात. 

*जमिनीचा सामू ६ ते ८.५ असताना कॅल्शिअम व मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात पिकांना घेता येतात. जमिनीचा सामू सहापेक्षा कमी असताना बोरॉन, ताम्र व जस्त ही अन्नद्रव्ये चांगल्या पध्दतीने मिळतात.

* जमिनीचा सामू आठच्या पुढे असताना मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होतो.


*पिकांची आम्लता व विम्लता सहन करण्याची क्षमता:-*

* तीव्र आम्लता सहन करू न शकणारी पिके:- भात

* मध्यम आम्लता सहन करू शकणारी पिके:- गहू, मका, सोयाबीन, टोमॅटो, चवळी. 

* थोडीशी आम्लता व विम्लता सहन करू शकणारी पिके:- फुलकोबी, वाटाणा, कोबी, गाजर.

स्रोत-भूसंवर्धन ब्लॉग 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean