ऊसामधील कांडी कीड। Sugarcane Internode Borer | एकात्मिक व्यवस्थापन ।

 IPM SCHOOL





ऊसामधील कांडी कीड(Sugarcane Internode Borer)

ऊस पिकामध्ये विविध प्रकारच्या साधारणपणे २८८ किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यातील सुमारे २४ किडींमुळे ऊस उत्पादनात सुमारे १५ ते २० टक्के, तर साखर उताऱ्यात २ टक्क्यांपर्यंत घट येते. उसामध्ये कांडे कीड (Internode Borer) आणि खोडकीड या दोन प्रमुख किडींचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. कांडे किडीमुळे ऊस उत्पादनात ३५ टक्के, तर साखर उताऱ्यात २.९ ते ३ टक्क्यांपर्यंत घट येते. तर खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात ३३ टक्के आणि साखर उताऱ्यात १ ते १.५ टक्क्यापर्यंत घट येते.


जीवनक्रम:-

अंडी- * पानाच्या दोन्ही बाजूंस मध्य शिरेलगत तसेच पानाच्या आवरणावरदेखील ८ ते १० बॅचमध्ये पुंजक्यात आढळतात.

* अंड्याच्या एका पुंजक्यामध्ये १० ते ८० अंडी आढळतात.

* नुकतीच दिलेली अंडी चपटी, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात.

* एक मादी पतंग ४०० पर्यंत अंडी देऊ शकते.


अळी:-* अंड्यामधून ५ ते ७ दिवसांत अळी बाहेर पडते.

* अळी २.५ सेंमी लांब, तपकिरी डोके, पांढऱ्या रंगाची असून शरीरावर ४ नारंगी रंगाचे पट्टे असतात. सुरुवातीला पानांवर उपजीविका करते. नंतर उसाच्या कांड्याला छिद्र पाडण्याला सुरुवात करते.

* अळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीस पानांवर साधारण: १ तास फिरते. त्यानंतर वाऱ्याद्वारे आजूबाजूच्या उसावर जाते. ज्या अळ्या खाली पडतात त्या नष्ट होतात.

* ही कीड निशाचर असून जास्त प्रकाशमानात निवाऱ्यासाठी उसाच्या पोंग्यात किंवा पानांच्या बेचक्यात जाते.

* पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळी पानांच्या पेशींवर उपजीविका करते.

* तिसऱ्या अवस्थेपासून अळी उसाच्या कांडीला छिद्रे करते.

* अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पोंग्याच्या पानांच्या पेशी खरडून काढते. त्यामुळे पाने उघडल्यानंतर पांढरे पट्टे दिसून येतात. नंतर अळी उसाच्या वरील कोवळ्या कांड्यांना नुकसान करते.

* कमी वयाच्या उसात विशेषत: खोडवा पिकात या किडीमुळे जास्त नुकसान होते.

* काही वेळा पोंगामर सुद्धा आढळून येतो. हा पोंगा सहजासहजी ओढून काढता येत नाही. त्याचा उग्र आणि सडल्यासारखा वास येत नाही.

* अळी शक्यतो कांडीमध्ये खालून वरच्या दिशेला गोलाकार शिडीप्रमाणे खात जाते. आणि विष्टा छिद्राबाहेर टाकत जाते. क्वचित वेळाच अळी खालच्या दिशेने पोखरते.

* अळी साधारण: १.६ ते ४ कांड्या पोखरते. क्वचित प्रसंगी ९ कांड्यासुद्धा पोखरते. प्रादुर्भाव झालेल्या कांडीला खालच्या बाजूस डोळा फुटतो.

* या किडीमुळे उसाच्या वजनात १०.७ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. उसाच्या ३-४ कांड्यांना नुकसान झाल्यास उसाच्या रसाची प्रतवारी खराब होते.


कोष:- * अर्ध वाळलेले पानांखाली बेचक्यात चंदेरी आवरणात कोषामध्ये जाते.

* संपूर्ण कोष अवस्था पाचटाच्या आतमध्ये पूर्ण होते. साधारण ७ ते १० दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो.


पतंग:- * पतंग सकाळी लवकर कोषातून बाहेर पडतात.

* उष्ण तापमानात किडीच्या जास्त पिढ्या तयार होतात. तर थंडीच्या कालावधीत कमी पिढ्या तयार होतात.

* कोष अवस्था फेब्रुवारीमध्ये पूर्ण होऊन मार्च ते ऑक्टोबरमध्ये पतंग बाहेर पडतो.

* पतंगाला २४ ते ३६ मिमी लांबीचे पंख असून, पुढील पंखावर १ ते २ काळे ठिपके आढळतात. नर पतंगात मागील पंख फिक्कट पांढरे किंवा तपकिरी तर मादीमध्ये चंदेरी रंगाचे आढळून येतात.

* वर्षातून ५ ते ७ पिढ्या हे पतंग पूर्ण करतात.


नुकसानीचा प्रकार:-

* कीड सुरुवातीला कोवळ्या पानांवर उपजीविका करते. पानांची गुंडाळी करते. त्यामुळे ऊस लवकर पडतो आणि लोळण्याचे प्रमाण वाढते.

* वरील बाजूच्या नवीन तयार झालेल्या पाच कांड्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. कांड्यातील आतील भाग लालसर दिसून येतो.

* लोळलेल्या आणि पाणथळ ठिकाणच्या प्रादुर्भावग्रस्त उसाच्या कांडीला अनेक छिद्रे पाडते. सुरुवातीला लागलेल्या ४-५ कांड्यावरून कांडे किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होते.

* उसाच्या कांड्यावर, डोळ्याच्या वरच्या भागात छिद्रे आढळून येतात. छिद्रातून ओली विष्ठा बाहेर आलेली दिसते.

* प्रादुर्भावग्रस्त उसाची वाढ कमी होऊन कांड्या लहान राहतात. पांगशा फुटतात, नवीन धुमारे (वॉटरशूट) फुटतात.

* किडीची अळी एका उसाच्या २ ते ३ कांड्याना छिद्र पाडून आतील बाजूस नुकसान करते.

* कांड्या आखूड आणि बारीक राहतात. उसास पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भुसा आढळतो. बऱ्याच वेळा त्यात किडीची अळी दिसून येते.


व्यवस्थापन:-

*मशागतीय नियंत्रण:- 

* लागवडीसाठी निरोगी आणि कीड विरहित बेण्याची निवड करावी.

* प्रादुर्भावग्रस्त टिपरी बाजूला काढून जमिनीत खोल गाडून टाकावी.

* जास्त प्रादुर्भावग्रस्त बेणे लागवडीसाठी वापरू नये.

* नत्रयुक्त रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.

* जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ऊस लागवडीनंतर पीक तणविरहित आणि स्वच्छ ठेवावे. पिकांस ८ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

* किडीचा प्रादुर्भाव उसाला कांडी लागल्यानंतर सुरू होतो. नियंत्रणासाठी ५ व्या आणि ७ व्या महिन्यात जमिनीलगत खालची २-३ पाने काढून किडीच्या अंड्यासह नष्ट करावीत. ही प्रक्रिया ९ व्या महिन्यांपर्यंत करता येते. त्यामुळे पानांवरील किडीच्या अवस्था नष्ट होतात.

* पांगशा न फुटणाऱ्या भागांत उसाचे पाचट काढावे.

* पाणथळ ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करावा. कीडग्रस्त उसाचा खोडवा घेणे टाळावे.

* भात, भाजीपाला, तेलबिया यासारखी फेरपालटाची पिके घ्यावीत.

* उसाचे पीक सुरुवातीला ५ महिन्यांपर्यंत तणमुक्त ठेवावे.

* उसाला २ महिन्यांनंतर बाळ बांधणी केल्यास किडीने पाडलेली छिद्रे बंद होतात. त्यामुळे खोडकिडीचे पतंग बाहेर पडण्यास अटकाव होतो.


*जैविक नियंत्रण:- 

* ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकीटकाचे प्रौढ १ ते १.५ लाख प्रति एकरी प्रमाणात सोडावेत.

* ऊस लागवडीनंतर ४ महिन्यांनी ट्रायकोकार्ड १० ते १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार वापर करावा . 

* ऊस पीक ४ ते ५ महिन्यांचे असताना नियंत्रणासाठी एकरी १० ते १२ फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) (ई.एस.बी./आय.एन. बी.ल्यूर) वाढ्याच्या उंचीवर लावावीत.

* मक्याचे आंतरपीक घेणे टाळावे.


*रासायनिक नियंत्रण:-

* पाचट काढल्यानंतर फिप्रोनिल (०.३ टक्के) हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी २५ किलो प्रमाणे लागवडीच्या वेळी सरीमधून द्यावे. किंवा

* क्लोरपायरिफॉस (२० टक्के) २.५ लिटर प्रति १ हजार लिटर पाणी याप्रमाणे जमिनीत वाफसा आल्यानंतर सरीमधून द्यावे. किंवा

* दाणेदार क्विनॉलफॉस ३० किलो प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत टाकावे.

संदर्भ:- ऍग्रोवन (ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव)


एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean