थंडीपासून फळबागेला वाचवण्यासाठी उपाय | Measures to protect the orchard from cold




थंड हवामान बऱ्याच पिकांना मानवते पण थंडीच्या दिवसांमध्ये तापमान बऱ्याच वेळेला खूप खाली जाते. शेतीमधील इतर पिकांवर त्याचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसून येतो.पण फळपिकांमध्ये तापमान कमी झाल्यानंतर खूप मोठा परिणाम दिसू लागतो. बऱ्याच वेळेला वाढीवर तर परिणाम दिसून येतोच पण त्यासोबत फुल गळ, फळे लागलेली असल्यास फळे तडकू लागतात पर्यायाने उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्याला फळझाडावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. *नियंत्रणाचे उपाय*
  • * थंडी आणि वाऱ्यापासून फळबागेच्या संरक्षणासाठी बागेच्या पश्‍चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, सुरू, बोगनवेल, घायपात, शेवगा, ग्लिरिसिडीया, पांगरा, मलबेरी, किंवा बांबू यांसारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
  • * रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.
  • * फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पाला पाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर मिळेल, याची काळजी घ्यावी.
  • * थंडीमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान थोडे अधिक असते. थंडीची पूर्वसूचना मिळताच फळ बागेमध्ये रात्री अथवा पहाटे ठिबकद्वारे पाणीपुरवठा करावा. यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.
  • * झाडाच्या खोडापाशी तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मुळांच्या परिसरामध्ये उष्णता टिकून राहील. कमी तापमानाचा झाडांच्या मुळांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.
  • * केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबत पेंड कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारी उष्णता तापमान कमी करण्यास मदत करते. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.
  • * केळीच्या बागेस रात्री पाणी द्यावे. १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडाची पाने गुंडाळावी.
  • * द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
  • * डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे. तसेच बोरॅक्सची (०.२ टक्का) फवारणी करावी.
  • * पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून द्यावी. झाडांची जल व अन्नद्रव्य शोषण वहनाची क्षमता वाढते. पेशींचा काटकपणा वाढतो.
  • * थंडीचे प्रमाण कमी होईतोवर फळबागांतील फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. अतिरिक्त छाटणी करू नये.
  • * रोपवाटिकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट, तट्टे किंवा काळे पॉलिथिन याचे छप्पर उभारावे. असे छप्पर साधारण सूर्यास्तापूर्वीपासून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश पडेपर्यंत ठेवावे.
  • * नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा.
संदर्भ-इंटरनेट

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing

मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |