मूग-उडीद लागवड तंत्रज्ञान | Mung-Udid Cultivation Technology
*मूग-उडीद लागवड तंत्रज्ञान*
खरीप हंगामातील मूग व उडीद महाराष्ट्रातील महत्वाची कडधान्य पिके आहेत. या दोन्ही पिकांचे प्रत्येकी साधारणतः ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र दरवर्षी महाराष्ट्रात असते. हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात ही पिके अतिशय चांगले उत्पादन (१० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर) देतात. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस व तूर यासारख्या पिकांमध्ये मूग व उडदाचे आंतरपीक घेतल्यास, निश्चितच फायदा होतो. उडीद आणि मुगात प्रथिनांचे प्रमाण अधिक (२४ टक्के) असून त्याची प्रतही श्रेष्ठ आहे.
*•जमीन :-*
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मूग आणि उडीद पिकास योग्य असते. क्षारयुक्त, खोलगट, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या व निकस जमिनीत मूग, उडीद पिकाची लागवड करू नये. आम्ल-विम्ल निर्देशांक (पी.एच.) ६.० ते ८.५ तसेच सेंद्रिय कर्ब ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जमिनीत ही पिके चांगली येतात.
*•हवामान:-*
या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३० ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात सुध्दा ही पिके चांगली येतात. या पिकांना ६५० ते ७०० मिलिमीटर समप्रमाणात पडलेला पाऊस मानवतो आणि या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले येते.
*मूग-उडिदाचे महत्त्व:-*
या पिकांच्या मुळांवरील गाठींत हवेतील नत्र स्थिर केला जाऊन तो पिकास उपलब्ध होतो, तसेच यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
• मूग पचनास हलका असल्याने त्यातील प्रथिने अधिक सुलभतेने शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
• मुगामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने आहारात मूग अथवा त्यापासून केलेली डाळ अंतर्भूत केल्यास समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो.
• कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मूग आणि उडीद ही पिके एकप्रकारे वरदान सिद्ध होऊ शकतात.
• गेल्या काही वर्षांत या पिकांना चांगले दर मिळत असल्याचे दिसते.
*•पूर्वमशागत:-*
दोन्ही पिके मध्यम ते भारी जमिनीत घ्यावीत. जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वीचे पीक निघाल्यावर उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. त्यानंतर मृगाचा पहिला मोठा पाऊस पडून गेल्यावर वखरपाळी अथवा ट्रॅक्टरने कुळव मारून घ्यावा आणि धसकटे, काडी, कचरा व्यवस्थित वेचून घ्यावा, कुळवाच्या एक दोन पाळ्या द्याव्यात म्हणजे जमीन भुसभुशीत होऊन पेरणी योग्य होईल.
*पेरणीची वेळ :-*
वेळेवर पेरणीस अतिशय महत्त्व आहे. मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजेच जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी पूर्ण करावी, पेरणीस फार उशीर करू नये, कारण उशिरा पेरलेल्या पिकास त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही व परिणामतः पिकाची वाढ कमी होऊन फुले, शेंगा कमी लागतात आणि पीक उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. ७ जुलै नंतर मूग व उडीद पिकांची पेरणी टाळावी.
*बियाणे प्रमाण आणि पेरणी अंतर:-*
पिकाचे अपेक्षीत उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. अन्यथा पिकाची सर्वप्रकारे योग्य निगा ठेवूनही बहुतेक वेळा प्रति हेक्टरी कमी रोप संख्येमुळे उत्पादन कमी येते. त्यासाठी मूग आणि उडीद पिकांकरिता १२ ते १५ किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. दोन ओळीमध्ये ३० से.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.
*बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन:-*
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेडेझीम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम चवळी गटाचे रायझोबियम संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढते व हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो यामुळे पिकाचे उत्पादन वाढते.
*•खते:-*
चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ५ टन प्रति हेक्टर प्रमाणे शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरून द्यावे. त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. यानंतर बियाणे पेरणी करताना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) अथवा ४३ किलो युरिया आणि २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरला द्यावे. पिकास पालाश ३० किलो प्रति हेक्टर म्हणजेच ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
*•आंतरमशागत:-*
पीक सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे पीक पेरणीपासून पहिले ३० ते ४५ दिवस तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. कोळप्याच्या सहाय्याने पीक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी जमिनीत वापसा असताना करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपणी करावी.
*•पाणी व्यवस्थापन:-*
मूग आणि उडीद ही पिके सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर येणारी पिके आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा वेळी पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी झाला असल्यास, जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे म्हणजेच पीक फुलोऱ्यांच्या दरम्यान तसेच शेगात दाणे भरताना पाणी उपलब्ध असल्यास जरूर द्यावे. शेतकरी बांधवाकडे तुषार संच उपलब्ध असल्यास मूग उडीद पिकासाठी पाणी देण्याकरिता जरूर उपयोग करावा. त्याचा पिकास उत्पादन वाढीसाठी निश्चित फायदा होतो यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. सारे पाडून जमिनीच्या उतारानुसार योग्य अंतरावर आडवे पाट टाकावेत म्हणजे पाणी देणे अधिक सोयीचे होते तसेच फुल व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास २ टक्के युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.
*•कीड व रोग नियंत्रण:-*
या पिकावर प्रामुख्याने भुरी आणि पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. भुरी रोगामुळे पिकाच्या खालीच्या पानांवर पांढरे ठिपके दिसतात आणि कालांतराने सर्व पाने पांढरी पडतात. पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात.
काही दिवसानी पान संपूर्ण पिवळे होऊन कर्बग्रहणाच्या क्रियेत अडथळा येऊन फार कमी प्रमाणात शेंगा लागतात. अशी रोगट झाडे दिसल्यास लगेच उपटून टाकावीत जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.
●सुरवाती पासून रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.जेणेकरवून विषाणूजन्य रोगांना अटकाव बसेल.
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसून येताच पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम किंवा ५०० ग्रॅम कार्बेडेझीम अधिक ३० टक्के प्रवाही डायमेथोएट ५०० मि.ली. ५०० लीटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी आणखी एक फवारणी करावी.
*आंतरपीक:-*
तूर + मूग आंतरपीक
मूग किंवा उडीद या अतिशय लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी मूग /उडीद पीक हाती येते आणि त्यापासून एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पन्न मिळते तसेच तूर पिकापासून पासून १२ ते १५ क्विंटल/हेक्टर उत्पन्न मिळते.
*•काढणी, मळणी, साठवण:-*
• मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर मळणी करावी. उडिदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. उडिदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही. मूग, उडीद धान्य ५ ते ६ दिवस चांगले कडक उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवणीमध्ये कडुनिंबाचा पाला ५ टक्के प्रमाणात घालावा. कोंदट व ओलसर जागेत साठवण करू नये. यामुळे साठवणीतील किडीपासून धान्य सुरक्षित राहते.
स्रोत:-कडधान्य सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा