केळीमध्ये येणारा कुकुम्बर मोझॅक व्हायरस(CMV) | Cucumber Mosaic Virus | केळी पिकामध्ये येणार विषाणूजन्य रोग
🏫IPM SCHOOL🌱
केळीमध्ये येणारा कुकुम्बर मोझॅक व्हायरस(CMV)
सध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ग्रामीण भाषेत याला ‘हरण्या रोग’ म्हणूनही ओळखले जाते.
कारक घटक:-
सततचे ढगाळ वातावरण, अखंडित पडणारा पाऊस, कमी तापमान आणि जास्त आर्द्रता हे या रोगाच्या वाढीसाठी पोषक असतात. रोगाचा प्राथमिक प्रसार कंदापासून आणि दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. या विषाणूचा प्रादुर्भाव विविध भाजीपाला पिकांवर देखील दिसून येतो. लागवडीनंतर २ ते ३ महिन्यात रोगाची लक्षणे दिसू लागतात. रोगाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय करावेत.
रोगाची लक्षणे:-
*सुरुवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात.
*पानांवर १-२ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पाने आकाराने लहान होतात.
*शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो.
*पानांच्या शिरा काळपट पडून तेथील ऊती मरतात. पाने फाटतात.
*नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात.
*जास्त प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो. *प्रादुर्भावग्रस्त झाडे पक्व अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत.
*झाडांची वाढ खुंटते. झाडांची निसवण उशिरा अनियमित होऊन फण्या लहान होतात. *फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रेषा पडतात.
*तापमान व पाऊस यातील बदलामुळे काहीवेळा वरील लक्षणे नाहीशी होऊ शकतात.
नियंत्रण उपाय:-
*विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, नियंत्रणासाठी गावपातळीवर एकत्रितरीत्या मोहीम राबवल्यास रोगप्रसार रोखला जाऊ शकतो.
*प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. *बागेचे सातत्याने निरीक्षण करावे.
*बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी.
*बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये.
बागेभोवतीचे रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.
*बागेमध्ये विषाणूजन्य रोग पसरवणाऱ्या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे वापरू शकतो.
*मावा किडीची संख्या जास्त प्रमाणात दिसून आल्यास नियंत्रण डायमिथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लुजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि यापैकी कोणतेही प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकता.
*रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना लेबल क्लेम शिफारस लक्षात घेऊन फवारणी करावी.
स्रोत - ऍग्रोवोन (डॉ. कृष्णा पवार,केळी संशोधन केंद्र, जळगाव)
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा