सोयाबीनवरील तांबेरा रोग । सोयाबीन रोग व्यवस्थापन । Soyabean Disease

 🏫IPM SCHOOL🌱 




  सोयाबीन पिकामध्ये फुलोरा अवस्था पूर्ण होताच एक महत्त्वाचा रोग येतो म्हणजेच तांबेरा/सोयाबीन रस्ट होय.


 कारक बुरशी: Phakopsora pachyrhizi


 प्रादुर्भाव लक्षणे:- 

 •जसे सोयाबीन फुलोरा अवस्था पार करते तसे या रोगाची लक्षणे दिसायला सुरवात होतात.

 •सुरवातीस जमिनीलगतच्या पानांच्या खालील बाजूस लक्षणे दिसायला चालू होतात. नंतर वरील पानावर चॉकलेटी-राखाडी/लाल-तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसायला लागतात.

 •या तांबेरा रोगाची लक्षणे इतर रोग जसे जिवाणूजन्य ठिपके(Bacterial blight), केवडा(डाऊनी मिल्ड्यू),सरकोस्पोरा ब्लाईट या रोगांशी थोडी मिळती जुळती असतात त्यामुळे ओळखण्यास अडचण येऊ शकते.

 •या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे कोनाच्या आकाराचे ठिपके, त्यानंतर हे ठिपके मोठे होत जातात.

 •ठिपक्या बाहेरील भाग पिवळा पडतो.लांबून पाहिल्यास रोगग्रस्त भाग पिवळा पडत असल्यासारखा दिसतो.

 •या ठिपक्यांमध्ये तांबूस रंगाची पावडर तयार होते. स्पर्श केल्यास हाताला चिकटते. ही पावडर म्हणजेच या बुरशीचे बीजाणू होय.

 •प्रादुर्भाव प्रमाणाबाहेर असल्यास शेंगा व खोडावर सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतोच.

 •त्यानंतर खराब शेंगा भरणे,लहान बिया,शेंगा कमी लागणे,अकाली परिपक्वता अशी इतर लक्षणे पिकावर दिसायला लागतात.


 प्रसार:- 

या रोगाचा प्रसार वाऱ्याद्वारे होतो. बुरशीचे बीजाणू हवेच्या प्रवाहासोबत इतर भागात पसरतात.

•सुरवातीस पानावर पडलेला बीजाणू पानावर वाढायला सुरवात करतो.बीजाणू पानांवर पडल्यापासून 9 दिवसात बुरशी परिपक्व होते. मग पुढील चार दिवसात प्रादुर्भाव लक्षणे दिसतात.

•बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर सूक्ष्म बीजाणू तयार होतात. पुढील 3 आठवड्यापर्यंत बुरशी बीजाणू तयार करत असते.हे बीजाणू ऑब्लिगेट परजीवी असतात ते फक्त पण जीवित पानांच्या पृष्ठभागावर वाढू शकतात.

•म्हणून हे बीजाणू इतर कोणत्या भागावर पडले तर आपला प्रभाव दाखवत नाहीत.म्हणूनच महिनोन्महिने किंवा काही वर्षे ते सुप्तावस्थेत पडून राहतात. 

•जेव्हा अनुकूल वातावरण व योग्य यजमान पीक मिळेल तेव्हा आपला प्रभाव दाखवतात.

•त्यामुळे फार कमी कालावधी मध्ये संपुर्ण शेत या रोगावर व्यापले जाते.


 प्रतिबंध व नियंत्रण उपाय:- 

•एकसारखे सोयाबीन पीक घेऊ नये.उन्हाळी सोयाबीन घेतले असल्यास त्याच शेतामध्ये खरिपात सोयाबीन पीक घेणे टाळावे.

• मागील पिकाचे संपुर्ण अवशेष पीक लागवडीपूर्वी शेताबाहेर नष्ट करावेत कारण त्यामध्ये बुरशींचे बीजाणू सुप्तावस्थेत असू शकतात.

• उन्हाळ्यात नांगरट करून किमान दीड ते दोन महिने जमिनीस विश्रांती देऊन जमीन तापू द्यावी.जेणे करून  बुरशीचे बीजाणू जमिनीचे तापमान वाढल्याने निष्क्रीय होतील.

• रोगप्रतिकारक व सहनशील वाण लागवडीस निवडावे. जसे फुले कल्याणी(DS-228)या वानावर कमी प्रादुर्भाव होतो. तसेच फुले अग्रणी(KDS-344),फुले संगम (KDS-726) हे तांबेरा प्रतिकारक वाण आहेत.

• शक्य असल्यास लागवड 15 ते 30 मे च्या दरम्यान करावी त्यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव लक्षणे येण्याआधी आपले पिकं काढणीस येईल.

• तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून (खालील पानावर एक किंवा दोन ठिपके) आल्यास प्रापिकोनॅझोल (०.१० टक्के) किंवा हेक्झाकोनॅझोल (०.१५ टक्के) या बुरशीनाशकांची स्टिकरसह ४०, ६० आणि ७५ दिवसांनी आलटून-पालटुन फवारणी करावी.

•प्रापिकोनॅझोल बुरशीनाशक हातपंपाने फवारल्यास १० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारावे.  •हेक्झाकोनॅझोलच्या फवारणीसाठी १५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.


एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean