सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean
🏫IPM SCHOOL🌱
सोयाबीन काढणी व काढणी नंतर काळजी काय घ्यावी?
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे खरिपामधील प्रमुख पीक आहे. सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. पावसामुळे कापणी मागेपुढे होत आहे. या पिकाची कापणी, मळणी, हाताळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती घेऊ. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती टिकवून राहते. पर्यायाने बाजारामध्ये योग्य दर मिळण्यास मदत होते.
सोयाबीन काढणी:-
* सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.
* बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही.
* पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.
* काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल.
* पेरलेल्या सोयाबीनच्या लवकर पक्क होणाऱ्या जाती जसे की जे एस ९५-६०, जे एस २० ३४, जे एस ९३ ०५, एन आर सी १३० परीपक्वतेच्या अवस्थेत असल्याने स्वच्छ हवामान पाहता ९० % शेंगा वाळल्यानंतर पिकाची वेळेवर कापणी करावी. शेंगा पिवळ्या असताना कापणी केलेले उत्पादन ताबडतोब उन्हात वाळवावे व त्याची मांळणी करावी. पेरणी केलेल्या आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणांसाठी देखील शेंगांचा रंगात बदलानुसार पिकाची कापणी करावी.
* परिपक्वतेच्या वेळी पावसामुळे शेंगा दाणे फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार मळणीसाठी कापणी केलेले पीक योग्य प्रकारे वाळवावे.
* पुढील हंगामात सोयाबीन बियाणे म्हणून वापरायचे असेल तर बियाणे उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळण्यासाठी १३ ते १५ टक्के बियाणे आर्द्रता आणि ३५० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर सोयाबीनची मळणी करावी.
हाताळणी:-
* मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्रीवर एकसारखे पसरावे.
* बियाण्यातील आर्द्रता १० ते १२ टक्के होईपर्यंत उन्हात वाळवावे.
* वाळविलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काड्या, कचरा, माती, खडे इ. काढून ते स्वच्छ करावे.
* समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी ४ मि.मी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा.
* बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
साठवणूक:-
* स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ, कीडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे.
* बियाणे वाळविताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अधिक ओलावा किंवा आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. कीड लागण्याची शक्यता वाढते.
* साठवणूक करताना बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
* साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोती ठेवावीत. जमिनीची ओल सोयाबीनला लागणार नाही याची काळजी घ्यावी.
* एकावर एक अशा पोत्यांची थप्पी न लावता दोन पोत्यांवर एक अशा प्रकारे थप्पी लावावी. कोणत्याही स्थितीमध्ये पाचपेक्षा अधिक पोत्याची थप्पी लावू नये.
* पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील, अशा रीतीने पोती ठेवावीत.
स्रोत-ऍग्रोवोन (हरीश फरकाडे, सहायक प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती)
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा