आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

 

सध्या आंब्याच्या झाडांना सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मोहोर दिसू लागला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला जातो. महाराष्ट्राच्या कोकण भागात तर आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत. 

  बदलत्या हवामानामुळे तसेच कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. तर अगदी सुरुवातीच्या काळापासून मोहोराच्या संरक्षणासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने मोहोर टिकून चांगले आंब्याचे उत्पन्न शेतकऱ्याला नक्की मिळेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि अगदी सुरुवातीपासून मोहोर संरक्षण कश्या पद्धतीने केले पाहिजे. 


आंबा मोहोराची काळजी:-

आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते.


किडीचा प्रादुर्भाव:-

मिजमाशी:-

काळपट रंगाची लहान माशी पालवीच्या दांड्यावर तसेच मोहोराच्या दांड्यावर अंडी घालते. अंड्यामधून एक ते दोन दिवसांनी अळी बाहेर पडते व पालवीच्या तसेच मोहोराच्या आतील पेशी खाते. त्या ठिकाणी गाठी निर्माण होतात. नंतर गाठी काळ्या पडतात. त्यामुळे पालवी तसेच मोहोर देखील वाळतो. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपायांमुळेही मिजमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डेल्टा मेथ्रीन 2.2 टक्के प्रवाही (9 मि.ली./10 लीटर पाण्यात) फवारावे.


पिठ्या ठेकूण:-

अलिकडच्या काळामध्ये पिठ्या ढेकूणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. या किडीची छोटी पिल्ले तसेच पुर्ण वाढलेले ढेकूण मोहोरावर तसेच फळांवर देखील आढळून येतात. संपूर्ण फळ कापूस लावल्याप्रमाणे पांढरे दिसते. या किडीचा प्रादुर्भाव तापमान वाढावयास लागल्यानंतर एप्रिल-मे मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. या किडीची पिल्ले झाडावर चढू नयेत म्हणून खोडावर जमिनीपासून 1 फूट अंतरावर प्रथम चिखलाने प्लास्टिकची 30 से.मी. ची पट्टी बुंध्याभोवती व्यवस्थित बसवावी.


फळमाशी:-

फळमाशी आंब्याच्या फळांच्या सालीत अंडी घालते. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्या फळामधील गर खातात. फळमाशीचे नियंत्रण करणे अवघड जाते त्यामुळे झाडावरील किडग्रस्त फळे आणि जमिनीवर पडलेली फळे एकत्र गोळा करून त्यांचे अळ्यांसहित नाश करावा. तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी 10-12 फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) समान अंतरावर लावावे म्हणजे नर फळमाशांचे नियंत्रण झाल्याने पुढील पिढी तयार होत नाही. 


तसेच मोहोर अवस्थेपासून आंब्यामध्ये तूडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तुडतुडे, मिजमाशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ३ मिलि प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.  


रोगाचा प्रादुर्भाव:-

भुरी रोग:-

भुरी हा आंब्याच्या मोहोरावरील एक महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोहोरावर सर्वसाधारणपणे एकाच वेळी दिसून येतो. या रोगामुळे मोहोराचा संपुर्ण देठ, फुले आणि लहान फळे यावर बुरशी दिसू लागते. रोगग्रस्त फुले आणि लहान फळे गळून जातात. याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या रोगाचा प्रसार वार्‍यामुळे होतो. आंब्यास मोहोर येण्याच्या वेळी ढगाळ आणि दमट हवामान असल्यास रोग मोठ्या प्रमाणावर वाढतो. रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंन्डाझिम ४६.२७ टक्के एससी १० ग्रॅम किवा डिनोकॅप ४८ टक्के ईसी ५ मिली किवा हेक्झाकोनॅझोल ५ टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 


करपा:-

या रोगामुळे पानावर करपल्या सारखे डाग पडतात तसेच मोहोरावर अनिष्ठ परिणाम होतो. फळांवर काळे डाग पडतात आणि त्यांची वाढ खुंटल्यासारखी होते. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बागेत स्वच्छता राखावी. रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या रोगट पानांचा नाश करावा तसेच झाडावर 0.25 टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईड (25 ग्रॅम/10 लीटर पाण्यात) किंवा 1 टक्का बोर्डो मिश्रणाचा (1:1:100) फवारणी करावी.


फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय:-

* तिसर्‍या ते सहाव्या फवारणीच्या वेळी 2 टक्के युरियाची फवारणी केल्यास फळगळ कमी होवून फळाचा आकार वाढतो.

* फळधारणा वाढविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. 20 पीपीएम या संजीवकाच्या दोन फवारण्या मोहोर फुलल्यावर तसेच फळधारणा होताना कराव्यात.

* फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर शक्य असल्यास प्रत्येक झाडांना अंदाचे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या दिल्यास फळगळ कमी होवून फळांचा आकार वाढतो. 

* फळधारणेपासून 75 ते 80 दिवसांनतर पाणी देवू नये.

* फळांना आकर्षक रंग येण्यासाठी तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:0:45) या विद्राव्य खताच्या 1 टक्का तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी (10 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात) फळे वाटाणा, गोटी आणि अंडाकृती आकाराची असताना करावी.


* पुन्हा पुन्हा येणारा मोहोर टाळण्यासाठी पहिला पुरेसा मोहोर आल्यावर जिब्रेलिक आम्लाच्या 50 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांची पुन्हा फवारणी करावी.

* छाटणीची आवश्यकता झाडांच्या फांदीची छाटणी करावी.

* तसेच झाडावरील रोगग्रस्त फांद्या, सुकलेल्या फांद्या, बांडगुळ नियमितपणे काढून टाकाव्यात.अशा पद्धतीने सुर्यप्रकाशाचे व्यवस्थापन केल्यास तसेच हवा झाडांमध्ये खेळती राहिल्यास उत्पादकता तसेच उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास नियमितपणे मदत होते.


  अश्या पद्धतीने अगदी सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजेच झाडावर मोहोर यायला चालू झाल्यानंतर वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना केल्यास नुकसान कमी होऊन चांगले उत्पन्न मिळू शकते. 

स्रोत-कृषी वर्ल्ड आणि कृषी जागरण ब्लॉग



*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-* 

🌱महादू विष्णू काकडे,जालना

🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कोल्हापूर

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/

#mango #mangofarming #farming #mangoflowering #gogreen #pestsofmango #pestmanagement #farmingtips #organicfarming 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean