तूरीमध्ये येणारा वांझ रोग | sterility mosaic disease of pigeonpea
🏫IPM SCHOOL🌱
तूरीमध्ये येणारा वांझ रोग:-
वांझ रोग या विषाणुजन्य रोगाचा प्रसार हा एरिओफीड माईट या कोळी जातीच्या कीटकांमार्फत वाऱ्याच्या दिशेने होतो. हे कोळी ‘पीजन पी स्टरिलीटी मोझॅक’ या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तूर पिकात फुले व शेंगा लागत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते. त्यामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एरिओफाईड माईटचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
किडीची ओळख:-
* हा कोळी जवळपास ०.२ मिमी लांबीचा असून हे कोळी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करावा लागतो.
* शरीर अरुंद पांढरट लांब किंवा पिवळसर रंगाचे आणि पायांच्या दोन जोड्या असतात.
* कोळी तुरीच्या पानाच्या खालील बाजूस वास्तव्य करतात. आणि पानांतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात.
* कोळी तुरीच्या कोवळ्या शेंगावर अंडी घालतात. अंडी, पिल्ले आणि प्रौढ असा किडीचा जीवनक्रम २ आठवड्यांत पूर्ण होतो.
प्रसार:-
कोळ्यांनी वांझ रोगग्रस्त झाडातील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडेमध्ये रस राहतो. शोषलेल्या रसामध्ये वांझ रोगाचे विषाणू असतात. निरोगी झाडांतील रस शोषताना वांझ रोगाचे विषाणू कोळीच्या सोंडेतून निरोगी झाडाच्या पानांत शिरकाव करतात. अशाप्रकारे वांझ रोगाचा प्रसार होतो. तुरीच्या एका झाडावर जर ५ एरिओफाईड माईट सोडले तर झाडाच्या १०० टक्के भागावर वांझ रोगाचा प्रसार होतो. कोळी वांझ रोगाचे विषाणू वाऱ्याच्या दिशेने ५०० मीटर अंतरापर्यंत वाहून आणू शकतात.
वांझ रोगाला बळी पडणाऱ्या जातील निवड केली तर या रोगामुळे १०० टक्के नुकसान देखील झालेले आहे या रोगाचे महत्व लक्षात घोता कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे वांझ रोगग्ररत नर्सरी असून त्यामधून रोगप्रतिकारकर वाणांची निवड केली जाते.
लक्षणे :-
* रोपावस्थेत झाडाच्या पानावर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान राहतात व कालांतराने आकसतात.
* सदर पिवळी पडून झाडाच्या दोन पेऱ्यांतील अंतर कमी होते, त्यांना अनेक फुटवे फुटतात व झाडाची वाढ खुंटते.
* वांझ रोगग्रस्त झाडाला फुले व शेंगा येत नसून सदर झाड शेवटपर्यंत हिरवे राहून झुडपासारखे दिसू लागते.
* रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व अवस्थेच्या काळात केंव्हाही आढळून येतो.
* बऱ्याच वेळा काही फांद्यावर वांझ रोगाची लागण व काही फ़ांद्यांवर शेंगा देखील लागलेल्या असतात अशा झाडांना अर्ध वंध्यत्व वांझ रोग असे म्हटले जाते.
प्रसार व वाढीस अनुकूल हवामान :-
* रोगप्रसार कोळी वाऱ्याच्या दिशेने ५०० मीटर पर्यत रोगग्रस्त झाडांपासून निरोगी झाडांवर वाहून नेले जातात . व तेथे विषाणूचा प्रसार करतात
* तुरीचा खोडवा घेतलेला असेल किंवा उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या झाडांवर हे कोळी तग धरून राहतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तुरीच्या पीकावर सदर कोळी वांझ रोग आणण्यास कारणीभूत ठरतात.त्यामुळे तुरीचा घेवू नये
* कमाल तापमान २५ ते ३० अंश से किमान तापमान १० ते १५ अंश से, आर्दता व जास्त पाऊस, या सर्व गोष्टी या रोगास पोषक आहेत.
नियंत्रण:-
* आधीच्या हंगामातील बांधावरील तुरीचा खोडवा उपटून नाश करावा.
* शेतामध्ये वांझ रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून काढावीत.
* पेरणीसाठी विपुला, बीएसएआर - ७३६, बीएसएआर-८५३, बहार आणि आएपीए-२०४ या सारख्या रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
* सुरुवातीला ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
* रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा डायकोफॉल २० टक्के प्रवाही २५ मिली किंवा फिप्रोनील २५ टक्के प्रवाही ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तिव्रता जास्त असल्यास १० ते १२ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
स्रोत-ऍग्रोवोन
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा