गहू पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव | Insect infestation in wheat crop
रब्बी हंगामामध्ये गव्हाचे पीक संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात घेतले जाते. इतर पिकांच्या तुलनेत म्हणजेच भाजीपाला पिकांचा विचार करता या पिकामध्ये किडींचे प्रमाण मोठया प्रमाणात दिसून येत नाही. गहू पिकामध्ये काही किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे पिकामध्ये कोणत्या किडी येतात हे माहिती असणे गरजेचे आहे तरच किडीचे चांगले नियंत्रण करून चांगले उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि गव्हामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो.
गहू पिकामध्ये येणाऱ्या किडी
मावा:-
गव्हावर दोन प्रकारचा मावा दिसून येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग निळसर हिरवा असतो. या किडीची पिल्ले व प्रौढ पानातून व कोवळया शेंडयातून रस शोषण करतात. तसेच आपल्या शरिरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ सोडतात त्यामुळे काळी बुरशी वाढते व पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
लष्करी अळी:-
किडीच्या पतंगाची पुढील पंखाची जोडी भुरक्या तपकिरी रंगाची असून त्यावर ठिपके असतात. अळी हिरवट रंगाची, मजबूत बांध्याची असून शरीरावर पिवळसर लाल पट्टे दिसतात. अळया दिवसा पोंग्यामध्ये लपून बसतात. रात्री पोंग्यातून बाहेर पडतात आणि पाने कडेने कुरतडून खातात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
घाटेअळी:-
ही कीड कपाशीमध्ये अमेरीकन बोंडअळी, हरभयामध्ये घाटेअळी व तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी म्हणून ओळखली जाते. घाटेअळीचा पतंग फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. समोरच्या पंखावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो व कडेच्या बाजूला गडद पट्टा असतो. मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरिरावर दोन्ही कडांना तुटक तुटक गर्द करडया रेषा असतात. तसेच अळीच्या शरिरावर थोडे केस असतात. या किडीची अळी कणसातील दाणे खाऊन नुकसान करते, तसेच कोवळी पाने सुध्दा खाते.
खोडमाशी
ही कीड घरमाशीप्रमाणे परंतु आकाराने लहान असते. खोडमाशी रंगाने काळपट राखाडी रंगाची असून तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने 4 ते 5 ठिपके असतात. पूर्ण वाढ पिवळसर झालेली अळी तोंडाकडे निमुळती असते. अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते व आत शिरुन वाढणाऱ्या पोंग्यावर उपजिवीका करते. त्यामुळे सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडणे व नंतर तो मरून जातो यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णत: मरून जातात तर मोठया रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते. ज्वारी, बाजरी, मका व इतर तृणधान्ये तसेच काही तृणवर्गीय गवतावर ही कीड उपजिवीका करते.
गुलाबी खोडकिडा:-
या किडीचा पतंग तपकिरी किंवा गवती रंगाचा व अळी गुलाबी रंगाची असते. अळीचे काळे डोके असते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडाचा वाढणारा मधला भाग सुकून जातो. अळी खोडात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे रोपे सुकून जातात व त्यांना कोब्या येत नाहीत. पीक फुलो-यात असताना जर प्रादुर्भाव झाला तर कोब्यामध्ये दाणे भरत नाहीत व त्या पोचट व पांढ-या राहातात.
वाळवी:-
ही कीड पेरणी झाल्यावर आणि कधीकधी परिपक्वता जवळ येताच पिकाचे नुकसान करते. ते झाडाची मुळे, खोड व कुजलेल्या पेशी खातात.त्यामुळे रोपे मारतात. मोठ्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास ओंब्या पांढऱ्या दिसतात.
तपकिरी कोळी:-
ही कीड अतिशय लहान, चमकदार तपकिरी ते काळ्या रंगाचे असून पाय फिकट पिवळे असतात. हे कोळी पानातून रस शोषण करतात. त्यामुळे पानावर पांढरट चट्टे दिसतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर पाने लालसर तपकिरी होऊन वाळतात.
गव्हाच्या पिकावर साधारणपणे या किडींचा कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्यामुळे कीड नियंत्रणाच्या दृष्टीने या किडी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करावी.
स्रोत- विकासपीडिया आणि इंटरनेट
*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*
🌱ज्ञानेश कंठाळी, अहमदनगर
🌱प्रदिप जाधव, पन्हाळा
🌱प्रद्युम टेके औरंगाबाद
🌱विजय गोफणे, बारामती
🌱विशाल कर्हाळे, नांदेड
🌱बाळकृष्ण आंबीलढोके, कागल कोल्हापूर
*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा