तंबाखू । पिकामध्ये येणाऱ्या नुकसानकारक किडी । Pest of Tobacco
🏫IPM SCHOOL🌱
महाराष्ट्रामध्ये तंबाखूचे पीक निपाणी भागामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषेजवळ मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तंबाखू पिकामध्ये सुरुवातीपासूनपाने खाणारी अळी, देठ कुरतडून टाकणारी अळी यासारख्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर आज आपण जाणून घेऊया कि तंबाखूच्या पिकामध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
तंबाखु पीकामध्ये येणारी किड
1. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिटुरा):-
या किडीला मुळातच तंबाखूवरील पाने खाणारी अळी म्हणून ओळखले जाते. कारण तंबाखू पिकावर अगदी सुरुवातीच्या काळापासून या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तंबाखूची रोपे लहान असताना रोप खाऊन तोडून टाकते.
जेव्हा रोपे मोठी होतात तेव्हा अळ्या पाने खाताना दिसतात.तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतील अळी हि तंबाखूची पाने मोठ्या प्रमाणात खाते त्यामुळे वेळीच उपाययोजना केली नाही तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
किडीचे जीवनचक्र:-
किडीचे पतंग राखाडी तपकिरी रंगाचे दिसतात. मादी साधारण 250 - 300 अंडी पुंजक्यामध्ये पिकामध्ये पानांवर घालतात. अळी अवस्था 5 टप्प्यामधून पूर्ण वाढ होते. अळी साधारण १५ दिवस पिकामध्ये राहून पिकाचे नुकसान करते आणि त्यानंतर कोषावस्थेत जाते. कोषावस्था ८-१२ दिवसात पूर्ण होऊन किडीचा पतंग पुन्हा त्यामधून बाहेर पडतो. किडीचे संपूर्ण जीवनचक्र हवामानानुसार साधारणपणे 30 ते 50 दिवसात पूर्ण होते.
2.कटवर्म (ऍग्रोटिस यप्सिलॉन) :-
अळी रोपांचे देठ तसेच जमिनीच्या पातळीवर लावलेल्या रोपांचे देठ कापून तोडून टाकतो. कटवर्म कीड फक्त रात्रीच्या वेळीच सक्रिय असते. हि कीड रात्रीच्या वेळी पिकाचे नुकसान करते तर दिवसाच्या वेळी पालापाचोळ्याचा खाली, मातीमध्ये किंवा पानांच्या खाली लपून राहते. रोप अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रोपे जगवण्यासाठी शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागते.
किडीचे जीवनचक्र:-
या किडीचे प्रौढ पतंग फिकट राखाडी ते राखाडी-तपकिरी रंगाचे असतात. मादी पतंग जमिनीवर किंवा जमिनीच्या पातळीच्या जवळ असलेल्या वनस्पतीवर पुंजक्यात किंवा वेगवेगळी अश्या पद्धतीने ३००-४५० अंडी घालते.अळ्या सुरुवातीला पिवळसर रंगाच्या असतात नंतर त्या तपकिरी - धूसर होतात. अळी अवस्था २०-३० दिवसाची असू शकते. अळी अवस्था सहा ते सात टप्प्यामधून पूर्ण होऊन अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था हि साधारण १५ दिवसापर्यंत असू शकते. कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर त्यामधून पुन्हा पतंग बाहेर पडतो. किडीचे संपूर्ण जीवनचक्र ३५ ते ६० दिवसात पूर्ण होते.
3.स्टेम बोअरर (स्क्रोबिपालपा हेलिओपा):-
या किडीच्या लहान अळ्या खोड आणि मध्य खोडाच्या आतमध्ये पोखरतात. ते आतल्या ऊतींना खातात. जिथे खोडामध्ये आतमध्ये खात राहतो आणि ज्या ठिकाणी अळी आतमध्ये राहतो त्याठिकाणी खोड बाहेरून सूज आल्यासारखे दिसून येते. यामुळे रोपांची वाढ खुंटते आणि असामान्य फांद्या फुटतात. पुन्हा लागण केलेल्या पिकावरही 25 टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान होते.
जीवनचक्र
ही अळी तंबाखुमध्ये मादी पतंग खालच्या भागापेक्षा वरच्या पृष्ठभागावर अधिक प्रमाणात दंडगोलाकार अंडी घालते. एक मादी सरासरी 50 - 80 अंडी घालते आणि पानाच्या देठाजवळून लहान अळी देठात प्रवेश करते आणि आतून ऊतींना खातात. पूर्ण वाढ झालेली अळी फिकट पांढऱ्या रंगाची असते आणि डोके व छाती गडद तपकिरी असते.15-22 दिवसांत पिकाचे नुकसान करून पूर्ण वाढ झालेल्या अळ्या कोषावस्थेत जातात. अळी कोषावस्थेत जाण्याच्या अगोदर पतंगाला बाहेर पडण्यासाठी बोगदा तयार करते. किडीचे संपूर्ण जीवनचक्र 4-5 आठवड्यापर्यंत असू शकते.
4.पांढरी माशी (Bemisia tabaci):-
सर्व पिकाप्रमाणे तंबाखू पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पांढरी माशी हि तंबाखूमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या विषाणूजन्य रोगाचा वाहक म्हणून काम करते. पांढऱ्या माशीमुळे पिकामध्ये लीफ कर्ल रोग पसरतो आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते.
मोठ पोट आणि लांब पंख असलेली प्रौढ मादी नरापेक्षा वेगळी असते. एकच मादी पानांच्या खालच्या बाजूला 43 ते 243 अंडी घालते. अंड्यामधून निम्फ बाहेर पडतात. अंड्यामधून बाहेर पडलेले निम्फ आणि प्रौढ दोन्हीही पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यामधून रस शोषण करतात. निम्फ अवस्था उन्हाळ्यात 5-33 दिवस, हिवाळ्यात 17-73 दिवस असतो.
5.मावा:- (मायझस निकोटियाने, मायझस पर्सिका):-
मावा किडीचा प्रादुर्भाव तंबाखू पिकामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून दिसून येतो. हि कीड पानाच्या मागील बाजूस समूहाने राहून पानांमधून रस शोषून घेतात त्यामुळे पानांवर काळ्या काजळीच्या बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडतात. त्यासोबत वेगेवेगळ्या विषाणूजन्य रोग पसरवण्याचे कामही मावा किडींच्या माध्यमातून केले जाते.
तंबाखूमध्ये सर्वसाधारणपणे मावा कीड हि तपकिरी किंवा हिरवट रंगाची दिसून येते. त्यामध्ये निम्फ हे पंख असलेले आणि पंख नसलेले असे दोन्ही प्रकारचे दिसून येतात. मावा किडीचा प्रादुर्भाव डिसेंबरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात असतो.
सर्वसाधारणपणे या किडींचा प्रादुर्भाव तंबाखू पिकामध्ये दिसून येतो. त्यासोबत कधीकधी पिठ्या ढेकूण यासुद्धा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेगवेगळ्या भागानुसार यासोबतच दुसऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. पिकाचे नुकसान वाचवण्यासाठी आणि चांगले उत्पन्न घेण्यासाठी या किडी लक्षात घेऊन त्यांचे व्यवस्थापन चांगले करता येऊ शकतो.
संदर्भ-कृषीसेवा ब्लॉग.
*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*
🌱प्रशांत बागल सोलापूर
🌱विकास धुमाळ बेकनाळ ,गडहींग्लज
🌱बाळकृष्ण आंबीलढोके, कागल कोल्हापूर
*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*
एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा