ऊसाचे खोडवा |सुरुवातीच्या काळात | घ्यावयाची काळजी | Sugarcane management
राज्यामध्ये उसाखालील क्षेत्र कुवत मोठ्या प्रमाणावर आहे त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
राज्यामध्ये उसाखालील क्षेत्र कुवत मोठ्या प्रमाणावर आहे त्यापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे:-
* पूर्वमशागतीची गरज नसल्याने श्रम, वेळ व पैशांची बचत होते.
* मुळांची वाढ अगोदरच झालेली असल्याने फुटवा लवकर, एकसमान व भरपूर होतो.
* खोडव्यात उगवणीला लागणारा १ ते २ महिन्यांचा कालावधीही वाचतो. ऊस लवकर पक्व होतो. साखरेचा उतारा चांगला येतो.
* खोडव्यातील पाचट न जाळता पिकात पडलेल्या पाचटामुळे जमिनीवर आच्छादन होऊन ओलावा टिकून राहते. पाण्यामध्ये बचत होते. दुष्काळी परिस्थितीतही पीक तग धरण्यास मदत होते.
* आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
* पाचटाचे शेतामध्येच कंपोस्टमध्ये रुपांतर करता येते.
जाती:- अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची निवड करावी. उदा. को-८६०३२, को-एम-२६५, को-८०४०, को-७२१९, को-८०१४, को-युएआय ९८०५ इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.
पाचट व्यवस्थापन:- ऊस तुटून गेल्यावर पाचट न जाळता त्याचे आच्छादन करावे. एकरी अंदाजे ४ ते ५ मे. टन पाचटापासून शेतातच उत्तम कंपोस्ट तयार करता येते. ऊस बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटून बुडखे मोकळे करावेत किंवा एक आड एक सरीमध्ये पाचट दाबून बसवावे. त्यावर हेक्टरी १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक शेणखतात मिसळून समप्रमाणात पसरावे. त्याचबरोबर हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे.
बुडखे छाटणे:- तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास उसाचे बुडखे मोठे राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. यामुळे जमिनीखालील कोंब जोमाने फुटतात. एकूण फुटव्यांची संख्या वाढते. कीड व रोगग्रस्त उसाचे बुडखे नष्ट करून सर्व नांग्या भरून घ्याव्यात.
बगला फोडणे:- ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते. त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. नवीन मुळ्याची वाढ होते.
खत व्यवस्थापन:- खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी ऊस तुटल्यावर १५ दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी ७५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६, ५० किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी. खते माती आड करून पाणी द्यावे.
पहिल्या मात्रेनंतर ६ आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी ७५ किलो द्यावी.
उर्वरित मात्रा एकरी १०० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६ व ७५ किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी ६० टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा.
टीप - दर १५ दिवसांनी एकरी ८ किलो मॅग्नेशियम सल्फेट व २५० ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.
* वरील तक्ता हा मार्गदर्शक असून, माती परीक्षण व बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करावेत.
रासायनिक खतांव्यतिरिक्त सेंद्रिय खते शेणखत/कंपोस्ट खत तसेच जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन:- सुरवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांनी आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. पाचटाचे आच्छादन असल्यास पाण्याची पाळीचे अंतर वाढण्यास मदत होते व जमिनीतील पाणी जास्त दिवस टिकून राहते.ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
आंतरमशागत:- ऊस तुटून गेल्यावर २ ते २.५ महिन्यांनी ४ इंच माती खोडव्याच्या बुडख्याशी लावून घ्यावी. ३.५ ते ४ महिन्यांनी मोठी भरणी करावी. त्यामुळे अपेक्षित फुटव्यांची संख्या नियंत्रित करणे शक्य होते. तसेच जमिनीत हवा खेळती राहून पाणी धारण करण्याची क्षमता वाढते, तणांचा बंदोबस्तही करता येतो.
पीक संरक्षण:- कीड व रोगाचा खोडवा पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाची पिकावर फवारणी करावी.बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच बाविस्टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी . त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
*महत्वाचे
*सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर खोडवा उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
*काणी व गवताळ वाढ या रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त खोडवा समूळ नष्ट करावा. नांग्या भरून घ्याव्यात.
*जमिनीतून खते देताना खते पहारीच्या साहाय्याने द्यावीत.
*ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते.
संदर्भ-ई-सकाळ लेख.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कोल्हापूर.
🌱महादू विष्नु काकडे, जालना.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा