बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी |
खरीप हंगाम सुरु होत असल्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेगवेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. परंतु आपल्याला पेरणीसाठी उत्कृष्ट प्रमाणित बियाणे माहित असणे गरजेचे असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा पूर्ण फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि पूर्ण हंगाम वाया जातो. त्यामुळे बियाणे खरेदी करण्याच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी
* बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच, कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे.
* खरेदी करावयाच्या बियाणे वाण/जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का, हे जाणून घ्यावे. निवडलेला वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील आहे का, याची माहिती घ्यावी.
* निवडलेला वाण किती कालावधीचा आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची माहिती घ्यावी.
* भाजीपाला बियाण्याच्या बाबतीत तो वाण कोणत्या हंगामासाठी शिफारस केलेला आहे व कोणत्या कालावधीपर्यंत लागवड करायचा, हे जाणून घ्यावे. शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर लागवड करू नये.
* वाणाची निवड करताना जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचे अंतर, कोरडवाहू / बागायत यांचा विचार करावा. वाणाची निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
* कृषि विद्यापीठाच्या शिफारसीनुसार एकरी लागणारे बियाणे यांची माहिती करून घ्यावी.
* खासगी क्षेत्रातील संशोधित केलेले सत्यतादर्शक बियाणे निवडायचे असेल, तर एकच वाण सर्व क्षेत्रासाठी न निवडता क्षेत्राप्रमाणे दोन-तीन वाण निवडावेत. या वाणांचा लागवडीनंतर चांगला अभ्यास अधिक उत्पादनाचे प्रलोभन एखाद्याने दाखविल्यास ते वाण अपरििचत असतील, तर निवड करू नये. यातून फसगत होऊ शकते. अशा अपरिचित जातीपासून नवीन किड व रोगांचा आपल्याकडे शिरकाव होऊ शकतो.
* खरेदी केलेल्या बियाण्याची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्यावर अंतिम तारीख, शेतक-याचे नाव, पूर्ण पत्ता इ. स्पष्ट लिहावे. पावतीवर विक्रेत्याची व शेतक-याची सही असणे आवश्यक आहे.
* बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये.
* पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमती पेक्षा दुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजन मापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा आहे.
* प्रमाणित (सर्टिफाईड) बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूंनी आतून शिवलेली असते. वरच्या बाजूने प्रमाणपत्र शिवलेले असते व त्याला सील लावलेले असते. अलीकडे प्लॅस्टिक बॅगमध्ये बियाणे उपलब्ध होत आहे. त्यालाही पॅकिंग असते व त्यावर आवश्यक मजकूर छापलेला असतो.
* बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पाहावी. लेबलवर पिकाचे नाव, जात, उगवणशक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणी, तारीख, महिना व वर्ष, बीजप्रक्रियेला वापरलेले रसायन, बियाणे खरेदी बिलावर छापील बिल क्रमांक असावा.
* पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.
* पेरणीनंतर टॅगसह रिकामी पिशवी, बिल आणि थोडेसे बियाणे जपून ठेवावे.
* मुदत संपलेले तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये. सरळ वाणाचे बियाणे दरवर्षी खरेदी करून उत्पादन खर्च वाढवू नये.
* एकदा पिशवीतले बियाणे खरेदी केल्यानंतर त्यापासून चांगले बियाणे करून ते तीन ते चार वर्षे वापरता येते. वजनाविषयी शंका आल्यास ते वजन करूनच घ्यावे.
* काही कंपन्या बीटी कापसाचे बियाणे विकताना ते लाल्या प्रतिबंधक किंवा अन्य रोगास प्रतिकारक आहे, अशी जाहिरात करतात.
* बीटी कापूस बियाणे हे फक्त बोंडअळीस प्रतिकारक असल्याचे शेतक-यांनी समजून घ्यावे. यासाठी अशा कंपनीचे होलोग्राम माहीत करून घ्यावे. बियाण्याची खरेदी शासनमान्य/ परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी.
* बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी.
संदर्भ:-इंटरनेट खडकाळे पोस्ट.
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱 सयाजीराव पोखरकर,अहमदनगर
🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कागल कोल्हापूर
🌱भागीनाथ आसने, अहमदनगर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा