हुमणी भुंगेरे नियंत्रणाची आवश्यकता । हुमणी कीड नियंत्रण । White Grub Beetle's Management |

 



अलीकडील काही वर्षांमध्ये हुमणी किडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. हवामान बदल, यावेळी पडणारा पाऊस, रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर, किडींमध्ये तयार होणार प्रतिरोध यामुळे पिकावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण करणे कठीण झाले आहे. अशातच या हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकामध्ये लवकर दिसून येत नाही. आणि ज्यावेळी नुकसान दिसायला सुरुवात होते त्यावेळी मोठे नुकसान झालेलं असते. वेळीच आणि एकात्मिक पद्धतीने नियंत्रण न केल्यास पिकाचे ३० ते ७० टक्के नुकसान होऊ शकते. 

किडीचे जीवनचक्र

भुंगा अवस्था- हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. मादी भुंगा नरापेक्षा मोठे असून त्यांचे सरासरी आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवस असते. संध्याकाळच्या वेळेस बाभुळ, बोर, कडुनिंबाच्या झाडावर बसून रात्रभर पाने खातात. 

अंडी अवस्था:- मिलनानंतर मादी  3-4 दिवसांत मातीमध्ये साबुदाण्यांसारखी लांबट व गोल अंडी घालते. एक मादी जवळपास 50 ते 70 अंडी जवळपासच्या शेतामध्ये ठिकठिकाणी घालते.

अळी अवस्था- अंड्यांमधून बाहेर पडलेली अळी म्हणजेच हुमणीच्या सुरुवातीच्या दोन अवस्था जमिनीमधील सेंद्रिय पदार्थावर जगतात. तिसऱ्या अवस्थेतील अळी पिकांच्या मुळ्या खाते आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पूर्ण वाढ झालेली तिसऱ्या टप्प्यातील हुमणी अळी पांढऱ्या रंगाची आणि इंग्रजी ‘C’ आकाराची असते. त्या अंड्यामधून साधारण 9 ते 24 दिवसात आळ्या बाहेर पडतात. ही अळी म्हणजेच हुमणी. पिवळसर पांढऱ्या रंगाची ही अळी जमिनीत तीन अवस्थेमध्ये 5 ते 8 महिने जगते.

कोष- तिसऱ्या अवस्थेनंतर अळी कोषावस्थेत जाते, त्यानंतर साधारण 20 ते 25 दिवसांनंतर मातीत भुंगा तयार होतो. प्रौढ भुंगेरे कोषमधून बाहेर पडतात आणि काही काळ जमिनीत सुप्त अवस्थेत राहतात. मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या वळवाच्या  पावसानंतर बाहेर पडतात.


अशा प्रकारे अंडी, अळी, कोष, भुंगा या चार अवस्था एका वर्षात या किडीच्या जीवनक्रमात पूर्ण होतात. त्यापैकी तीन अवस्था या मातीमध्ये असतात. जमिनीमध्ये या तीन अवस्थेत ही अळी दोन वेळा कात टाकते. ही अळी 6 ते 8 महिने जगू शकते. त्यानंतर भुंगेरे हे जमिनीवर( झाडावर) असतात. ते अडीच किलोमीटर पर्यंत उडू शकतात. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.


भुंगा नियंत्रण का गरजेचे आहे?

* या किडीच्या अंडी, अळी, कोष, भुंगा या चार अवस्थांपैकी तीन अवस्था या मातीमध्ये असतात.

* भुंगा हि एकच अवस्था जमिनीच्या बाहेर असल्यामुळे नियंत्रण करणे सोपे आणि महत्वाचे आहे. 

* जमिनीमधून भुंगे बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धती वापरून भुंगा नियंत्रण करणे शक्य होते. 

* हुमणीची अळी अवस्था जमिनीमध्ये आणि खोलवर असल्यामुळे नियंत्रण करणे अवघड जाते. 

* भुंगा अवस्थेला नियंत्रित केल्यास हुमणीची उत्पत्ती थांबते, पिकाचे नुकसान वाचते, आणि अळी तयार झाल्यानंतर नियंत्रणासाठी होणार खर्चही वाचू/कमी होऊ शकतो.


भुंगा अवस्था नियंत्रण करण्याच्या काही पद्धती:-

* वळवाच्या पावसानंतर हुमणीच्या भुंगे कडुलिंब, बाभूळ किंवा इतर झाडाची पाने खायला झाडावर संध्याकाळच्या वेळी दिसतात. अश्या वेळी ते भुंगे काठीने खाली पाडून एकत्रीत गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात बुडवून त्यांची विल्हेवाट लावावी. आजूबाजूच्या बाधित शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून एकत्रित हा प्रयोग  केल्यास, भुंगेरे अंडी घालण्याची संधी मिळण्यापूर्वीच नष्ट करता येतील.

* लाईट ट्रॅप/ प्रकाश सापळे यांचा वापर करावा. सायंकाळी ७ नंतर कडुनिंब सारख्या झाडाखाली विजेचा बल्ब लावून त्याखाली पसरट भांडे ठेवून त्यात डिझेलमिश्रित पाणी टाकावे. विजेच्या प्रकाशाकडे भुंगेरे आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात. 

* माळावरील हुमणीच्या (होलोट्रॅकिया सेराटा) या प्रजातींचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी व्हाईट ग्रब ल्युर आणि बकेट ट्रॅप कामगंध सापळे एकरी ४ ते ५ प्रमाणे वापरून भुंग्यांचे नियंत्रण करावे.

* एरंडी बिया १ किलो (बारीक करून), यीस्ट पावडर ५० ग्रॅम, बेसन पीठ ५० ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण २ लिटर पाण्यामध्ये भिजवून २ ते ३ दिवस आंबवून घ्यावे. तयार मिश्रणाची ५ लिटर क्षमतेचे मातीचे मडके एकरी ५ मडकी या प्रमाणे मातीमध्ये ठेवावे. याकडे भुंगे आकर्षित होतात.

यासारख्या पद्धतींचा उपयोग करून भुंगा अवस्था नियंत्रीत केल्यास पुढे हुमणी तयार होणार नाही आणि किडीमुळे पिकाचे नुकसानही होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये शेतामध्ये हुमणीच्या भुंगे दिसायला सुरुवात झाली आहे त्यांनी शक्य त्या मार्गाचा उपयोग करून भुंगा नियंत्रण करावे. 

संदर्भ-अग्रोवोन आणि इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर 

महादेव निगडे, दौंड पुणे 

हरिदास डाफळे, कोल्हापूर 

अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती

भागीनाथ आसने, अ. नगर 

सचिन भालेराव, राहता अ.नगर 

दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर

ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर

दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर

आदित्य मोरे, 

निखिल अहिर, 

   उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #gogreen #whitegrub #beetlemanagement #pest #pestmanagement #smartfarming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing