अति थंडीचा पिकावर होणारा परिणाम । करायच्या उपाययोजना । Cold Condition Effects on Crops and Protection Measures |
सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे कडक थंडी जाणवत आहे. तापमानामध्ये १० अंश सेल्सिअसने घट झाल्यास पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. प्रत्येक वातावरणाचा कमी अधिक परिणाम फळ पिकांवर पडत असतो. त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. मात्र शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेऊन जास्त नुकसान कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असते. वेळीच उपाययोजना केल्यास उत्पादन होणारी घट थांबवता येते.
तापमान कमी झाल्यास पिकावर होणारे परिणाम:-
* कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते.
* जमिनीचे तापमान कमी होते.
* वनस्पतीच्या पेशी मरतात.
* फळ पिकांमध्ये फळे तडकतात. उदा. प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इ. फळांमध्ये तडकण्याचे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही.
* रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उदा. पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लीफ मायनर इ.
* थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळे यावर प्रतिकूल परिणाम होतो.
* अतिथंड हवामानात पेशींमधील पाणी गोठते. पेशी कणातील पाणी नष्ट झाल्याने पेशी शक्तिहीन होतात व मरतात.
* अतिथंड तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो.
* रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात.
* कोवळी पाने, फुट आणि फांद्या सुकतात. झाडांना इजा पोहोचते.
* हिवाळ्यात तापमान खूप कमी झाल्यामुळे (विशेषतः १०°C च्या खाली) भाजीपाला पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. कडाक्याची थंडी आणि दव यामुळे पिकांवर करपा, भुरी यांसारखे रोग पडतात किंवा झाडे 'शॉक'मध्ये जाऊन त्यांची वाढ खुंटते.
तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळांपर्यंत पोहोचते. इजा झालेल्या भागातून बुरशींचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. सालीचा इंजा झालेला भाग खरवडून बोर्डो पेस्ट लावल्यास फायदा होतो.
फळ पिकानुसार होणारे थेट परिणाम:-
* आंब्याचा मोहोर जळतो.
* सदाहरित झाडे (आंबा, लिंबूवर्गीय फळ पिके, केळी, किवी इ.) ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात.
* तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. अति थंडीमध्ये झाडे मरतात.
* तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी झाल्यास केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.
* द्राक्ष वेलीच्या वाढ आणि फुलोरा अवस्थेत कड़क थंडीचा विपरीत परिणाम होतो. फळगळ होते, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते. तसेच वेली मरतात.
* तापमान १० अंश सेल्सिअसने कमी झाल्यास संत्रा, मोसंबीची वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
नियंत्रणाचे उपाय:-
• थंडीचा कडाका वाढणार असेल, तर भाजीपाला पिकाला संध्याकाळी हलके पाणी द्यावे. यामुळे जमिनीचे तापमान टिकून राहते आणि मुळांना उब मिळते.
• कोरड्या जमिनीत थंडीचा फटका जास्त बसतो, त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
• जर तापमान खूपच कमी झाले असेल, तर शेताच्या कडेला (वाऱ्याच्या दिशेने) पालापाचोळा किंवा काडीकचरा जाळून धूर करावा. यामुळे शेताभोवती गरम हवेचे संरक्षक कवच तयार होते आणि तापमान १ ते २ अंशांनी वाढण्यास मदत होते.
• पिकाच्या ओळींमध्ये पालापाचोळा, पेंढा किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करा. यामुळे जमिनीतील उष्णता बाहेर पडत नाही आणि मुळे सुरक्षित राहतात.
• सल्फर (गंधक) ८०% डब्ल्यूपी २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकात प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
• विद्राव्य खतांमध्ये ०:०:५० (पोटॅशियम सल्फेट) ची फवारणी केल्याने पेशींमधील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते आणि झाड थंडी सहन करू शकते.
• भाजीपाला पिकांच्या संरक्षणासाठी शेताच्या चारी बाजूंनी किंवा ज्या दिशेने थंड वारे येतात, त्या दिशेने शेवरी, मका किंवा ज्वारी सारख्या उंच वाढणाऱ्या पिकांची लागवड करावी किंवा ताडपत्री/नेटचे कुंपण लावावे.
• थंडीमुळे येणाऱ्या करपा किंवा भुरी रोगासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य बुरशीनाशकाची (उदा. कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब) प्रतिबंधात्मक फवारणी करून ठेवावी.
• थंडी आणि वाऱ्यापासून फळबागेच्या संरक्षणासाठी बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, सुरु, बोगनवेल, घायपात, शेवगा, ग्लिरिसिडीया, पांगरा, मलबेरी, किंवा बांबू यांसारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
• रब्बी हंगामात मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.
• फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पाला पाचोळा, लाकडे पेटवून उष्णता व धूर रात्रभर मिळेल, याची काळजी घ्यावी.
• थंडीमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान थोडे अधिक असते. थंडीची पूर्वसूचना मिळताच फळ बागेमध्ये रात्री अथवा पहाटे ठिबकद्वारे पाणीपुरवठा करावा. यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.
• झाडाच्या खोडापाशी तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा अशा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मुळांच्या परिसरामध्ये उष्णता टिकून राहील. कमी तापमानाचा झाडांच्या मुळांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.
• केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबत पेंड कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारी उष्णता तापमान कमी करण्यास मदत करते. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.
• केळीच्या बागेस रात्री पाणी द्यावे. १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडाची पाने गुंडाळावी.
• द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
• डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे. तसेच बोरॅक्सची (०.२ टक्का) फवारणी करावी.
• पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून द्यावी. झाडांची जल व अन्नद्रव्य शोषण वहनाची क्षमता वाढते. पेशींचा काटकपणा वाढतो.
• थंडीचे प्रमाण कमी होईतोवर फळबागांतील फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. अतिरिक्त छाटणी करू नये.
• रोपवाटिकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट, तट्टे किंवा काळे पॉलिथिन याचे छप्पर उभारावे. असे छप्पर साधारण सूर्यास्तापूर्वीपासून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश पडेतोवर ठेवावे.
• नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा.
स्रोत-अग्रोवोन ब्लॉग.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
सत्यजित मिरपुरे, यवतमाळ
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #rabiseason #coldcondition #effect #precautions #vegetables #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा