रब्बी ज्वारी आणि मका पिकातील सर्वांत नुकसानकारक कीड । अमेरिकन लष्करी अळी । Fall Armyworm Damage & Management in Sorghum & Maize

 


रब्बी ज्वारी आणि मका पिकावर सध्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही अळी पिकाच्या पोंग्यात (मध्यभागातील कोवळ्या पानांत) राहून नुकसान करते, त्यामुळे केवळ वरून फवारणी करून उपयोग होत नाही. ही एक बहुभक्षी कीड असून, सुमारे ३५० पेक्षा जास्त पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते. 

  आज आपण या किडीचे संपूर्ण जीवनचक्र , ती कश्या प्रकारे नुकसान करते आणि या किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.  

किडीचे जीवनचक्र:-

* किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते.

* मादी पतंग साधारणपणे १००० ते १५०० हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर, पोंग्यामध्ये घालते. त्यावर लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण घातले जाते. 

* अंड्यातून साधारण २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडते. अळीच्या सहा अवस्था असतात. अवस्थेनुसार अळीचा रंग बदलत जातो. लहान अळीचा हिरव्या रंगाची आणि डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी रंग होतो. तर शेवटच्या अवस्थेत अळीच्या शरिरावर गडद ठिपके दिसून येतात. तसेच डोळ्यावर इंग्रजी 'वाय' (Y) आकार स्पष्ट दिसून येतो.

* पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोष अवस्थेचा काळ हा साधारण १ आठवडा ते १ महिन्यापर्यंत असू शकतो. अशाप्रकारे अळीच्या १० ते १२ पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात. 


नुकसानीचा प्रकार:-

* हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.

* लहान अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. तर मोठी अळी ही पोंग्यामधील पाने खाते, पानांना छिद्र पाडते. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन घट येते.

* पोंग्यावर लाकडाच्या भुश्शासारखी अळीची विष्ठा हे प्रादुर्भावाचे ठळक वैशिष्ट्य आहे. 


एकात्मिक कीड व्यवस्थापन:-

* उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे किडीच्या जमिनीतील अवस्था वर येऊन प्रखर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे नष्ट होतात.

* आंतरपीक म्हणून ज्वारी + मूग + उडीद या पद्धतीचा वापर करावा.

* सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी.

* पीक उगवणीनंतर १० दिवसांनी शेतामध्ये एकरी २० कामगंध सापळे (FAW ल्युर आणि फनेल ट्रॅप) लावावेत.

* आंतरमशागत करून तणे काढून टाकावी.

* शेतात इंग्रजी 'T' आकाराचे १०-१५ पक्षी थांबे लावावेत. 

* किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पोंग्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी. त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.

* मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास अंडीपुज गोळा करून नष्ट करावेत.

* शेतात प्रकाश सापळे एकरी १ याप्रमाणे वापर करावा. 

* पीक पोंगा अवस्थेत असताना, अझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 

* जैविक नियंत्रणासाठी नोमुरिया रिलाई किंवा मेटारायझीम ॲनिसोप्ली किंवा लेकॅनिलीयम ५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 


आर्थिक नुकसान पातळी:-

* प्रति कामगंध सापळा २ ते ३ पतंग.

* किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढीलपैकी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

* इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ टक्का एस.जी.) ४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्टानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ४.३२ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ५.०२ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. 

* गरज असेल तर दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

(रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

स्रोत-अग्रोवोन

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

मुनीर पटेल, इचलकरंजी 

सुनील नाले, सोलापूर 

राहुल पाटील 

गणपत मिसाळ, रा.जानेफळ ता.भोकरदन जालना

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद 

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #jowar #sorghum #maize #fallarmyworm #damage #pest #pestmanagement #smartfarming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest