जैविक खते । Biofertilizers | NPK | Nitrogen Fixing Bacteria | PSB | KMB | Mycorrhiza

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूचा वापर करता येतो, त्याला *'जैविक खत'* असे म्हणतात. सूक्ष्म जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या जलदरीत्या विघटनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणून मातीची सुपीकता तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी या सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

जैविक खते पर्यावरण पूरक आहेत. जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविक सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य तसेच जिवाणूजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते. जैविक खतांमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन

रसायनासाठी लागलेला खर्च सुद्धा कमी होतो. जमिनीचा पोत सुधारतो तसेच पेरणीपूर्वी जैविक खतांद्वारे बीजप्रक्रिया केल्यास बियाणांची उगवणक्षमता वाढते. तसेच १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ होऊन उत्पादन खर्च कमी होतो. जिवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असल्याने त्यामध्ये कोणताही उपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नसतो.


जैविक खतांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत* 


नत्र स्थितीकरण करणारे जिवाणू:-

१) रायझोबिअम- हे जिवाणू कडधान्य पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन मुळांवर फिकट गुलाबी रंगाचे गाठी तयार करतात. मुळांवर वाढलेले जिवाणू हवेतील नत्रांचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. या जिवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. उदा. तूर, भुईमूग, चवळी, मूग इ.


२) अझेटोबॅक्टर या जिवाणूचा उपयोग एकदल तृणधान्य पिकांसाठी केला जातो. उदा. ज्वारी, मका, बाजरी इ. हे जिवाणू पिकांच्या मुळांवर गाठी न बनवता असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. तसेच हे जिवाणू बिजांकुरण व पीक वाढीसाठी उपयुक्त अशा काही रसायनांचा स्त्राव करतात जे बुरशी तसेच कृमीनाशक म्हणून काम करतात.


३) अझोस्पिरीलम हे जिवाणू तृणधान्य तसेच भाजीपाला पिकांच्या मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करतात. उदा. ज्वारी, मका,


४) असिटोबॅक्टर- हे जिवाणू मुख्यतः ऊस व इतर शर्करायुक्त पिकांसाठी जैविक खत म्हणून वापरतात येते. हे जिवाणू उसाची मुळे व इतर भागात वाढून नत्र स्थिरीकरण करतात. हे जिवाणू आंतरप्रवाही पद्धतीचे आहेत. हे खत प्रत्येकी २ किलो प्रति १०० लीटर पाण्यात मिसळवून त्यांचे द्रावण करावे व त्या द्रावणात उसाच्या कांड्या (बेणे) १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवून मग उसाची लागवड करावी.


५) निळे हिरवे शेवाळ- हे शेवाळ एक विशिष्ट प्रकारचे आहे. हे हवेतील नत्र भात पिकाला उपलब्ध करून देतात. भाताच्या लागवडीनंतर १० दिवसांनी एकरी ४ किलो प्रमाणे संपूर्ण शेतात सारख्या प्रमाणात पसरवावे. एका हंगामात हेक्टरी २५ ते ३० किलो नत्र या खतातून मिळते.


६) अझोला- ही एक पान वनस्पती आहेत. जी शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने हवेतील नत्र स्थिरीकरण करते. याचा उपयोग भात खाचरात केला जातो.


व्ही.ए. मायकोरायझा:-  पाण्यातील सरीमध्ये हे जिवाणू खत एकरी २ ते ३ किलो या प्रमाणात टाकून बी पेरावे. पेरलेले बी चांगल्या प्रकारे ३ मातीने झाकावे व नंतर पाणी द्यावे. ही बुरशी झाडांना स्फुरद अन्नद्रव्य उपलब्ध करून देते.


 स्फुरद विरघळणारे जिवाणू:- निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु खनिजे, प्राण्यांचे अवशेष, खडक इ. मध्ये आढळतो. स्फुरद विरघळणारे जिवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनस इ. प्रमाण- २५० ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी ४ किलो एकरी शेणखतातून, फळझाडासाठी प्रति ५० ग्रॅम.


पालाश विरघळणारे व वहन करणारे जिवाणू-  वनस्पतीच्या पाणांची जाडी व खोड तसेच फांद्याच्या सालीची वाढ व बळकटीसाठी पालाश हे मुख्य अन्नद्रव्य मानले जाते. तसेच या अन्न द्रव्यामुळे वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. महाराष्ट्राच्या जमिनीत पालाश या अन्नद्रव्याची मुबलकता असून ते स्थिर स्वरूपात असल्याने ते पिकांना उपलब्ध होत नाही त्यामुळे हे जिवाणू या पालाशची वहन क्रिया सक्रिय करून या अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांना करतात. उदा.अॅसिडोथिओ, बॅसिलस, फेरोऑक्सिडेस.


•प्रमाण:- बीज प्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. चार किलो एकरी शेणखतासाठी फळझाडे- ५० ग्रॅम प्रति झाड.


स्रोत:- शेतकरी मासिक

कु.पल्लवी भांडेकर,वनस्पती रोगशास्त्र विभाग,

डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला


अशाच नवनवीन अपडेट्स साठी खालील लिंक क्लीक करून जॉईन व्हा

https://www.facebook.com/groups/522198518657687/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean