ऊसामधील महत्वाचे रोग | Important Diseases of Sugarcane


 



 उसावरील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन 


ऊस हे महाराष्ट्रात महत्वाचे नगदी पिकांपैकी एक पीक आहे. ऊस एक उष्णकटिबंधीय व बहूवर्षीय पीक आहे. उसामध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरस व इतर इलेकट्रॉयट्सचे प्रमाण जास्त आहे, जे निर्जलीकरणासाठी उत्कृष्ठ आहे. ऊसामध्ये व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ६. व्हिटॅमिन क तसेच क्षारांचे प्रमाण पण जास्त असते. ऊस हा गुळ, साखर, रम, इथेनॉल आणि जैवइंधनासाठी एक मूलभूत घटक आहे. उसाच्या लागवडीचे ३ हंगाम असतात. सुरु (१२-१३ महिने), पूर्वहंगामी (१४-१५ महिने) आणि आडसाली (१६-१८ महिने). त्याच्या एम एस १०००१,निरा, फुले सावित्री, फुले २६५, को- ९२००५, महालक्ष्मी, व्ही. एस. आय ४३४ या प्रसिद्ध जाती महाराष्ट्रात लागवडीखाली आहेत.


महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या ३० रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये तांबेरा, पोक्का बोईंग, लालकूज, मोझेक, गवताळ वाढ, मर आणि पानावरील ठिपके या रोगांचा समावेश आहे. 


 पोक्का बोइंग:- 

हा रोग हवेद्वारे पसरतो. मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. या रोगाची लागण सुरुवातील शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट, हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली. जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. या रोगाची तीव्रता आढळल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.


 नियंत्रण: 


1. निरोगी व रोगप्रतिकार बेणेची लागवड करावी.

2. रोगाचा प्रादुर्भाव होताच १ ग्रॅम कार्बेनडॅझीम प्रति लिटर 3 पाण्यामध्ये मिसळून १२ दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.


 लाल कूज:- 


हा रोग मातीमध्ये असलेल्या कॉलिटॉट्रिकम फॅलकॅटम ह्या बुरशीमुळे होतो. ह्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऊसावर आणि पानांवर दिसून येतो. लागण झालेल्या पानांचा रंग बदलतो. हिरवा ते नारंगीनंतर नारिंगी ते पिवळा असा होतो. लाल रंगाचे ठिपके पानाच्या मध्य शिरेवर दिसतात. पाने खालून वर सुकत जातात. नंतर रोगग्रस्त ऊस फिकट रंगाचा आणि पोकळ होतो. लागण झालेल्या उसाचे मध्येच विभाजन केल्यास त्यातून आबंट वास येतो व अंतर्गत भाग लाल झालेला असतो. कधी-कधी आतल्या भागात काळ्या तपकिरी रंगाचा द्रव दिसून येतो.


 • नियंत्रण:- 


1. लागवडीसाठी बेणे निवडताना निरोगीच बेणे निवडावे.

2. लाल कूजची लागण झालेल्या शेतात पिकांची फेरपालट करावी. दुसऱ्या हंगामात भात पीक घ्यावे नंतर दोन हंगाम दुसरे पीक घ्यावे.

3. रोग दिसून येताच लागण झालेली पाने आणि कांड्या एकत्र करून जाळून टाकावे.

4. बेणे ०.१% बाविस्टीनच्या द्रावणात १८ मिनिटे बुडवून ठेवावे नंतर त्याची लागवड करावी.

 उसाची चाबूक काणी:- 


हा रोग उस्टीललॅगो स्किटॅमिनिया या बुरशीमुळे होतो. हा रोग ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो. उसाच्या शेंड्यापासून २५-२५० सेंमी. लांबीची चंदेरी आवरण असणारा काळ्या पावडरने भरलेला चाबुकासारखा लांब पट्टा बाहेर पडतो. म्हणून या रोगाला चाबूक काणी म्हणतात. सदर लागण झालेला ऊस निरोगी उसापेक्षा लहान दिसतो. बाजूच्या बेटामधून भरपूर अंकुर फुटतो त्यातून निघालेली पाने सरळ आखूड असतात. हा रोग बेण्याद्वारे आणि रोगट खोडव्यापासून पसरतो. लागणीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये काणीरोगाचे प्रमाण जास् आढळते.

 • नियंत्रण:- 


1. निरोगी व रोगप्रतिकारक वाणांचा तसचे उष्ण जलप्रक्रिया केलेले बेणे वापरावे.

2.वारंवार खोडवा पीक घेवू नये.

3. चंदेरी आवरण फाटण्यापूर्वी काणी रोगाचे पट्टे जाड कापडाच्या पिशवीत भरून उकळत्या पाण्यात एका तासासाठी बुडवून ठेवावे. जेणेकरून रोगाचे बीजकण मरून जातील.

4. बेणे ०.१% कार्बेडेझिमच्या द्रावणात (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम बावीस्टीन) १० मिनिटे बुडवून ठेवावेत.


 • मर रोग :- 


हा रोग मातीतील सेफॅलोस्पोरीम या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे उसाची निम्मी वाढ होईपर्यत दिसत नाहीत. प्रथम पाने पिवळी पडतात व शेंड्यापासून वाळण्यास सुरुवात होते. उसाच्या आत पोकळी बनते, असा ऊस वजनाला हलका भरतो. लागण झालेल्या ऊसाची मुळे कुजतात आणि ऊस अलगदपणे उपटून येतो. शेवटी संपूर्ण ऊस वाळतो आणि मरतो. रोगग्रस्त ऊसातील आतला भाग हलके ते गडद जांभळ्या किंवा तपकिरी रंगाचा बनलेला असतो.


 नियंत्रण:-

1. निरोगी बेणे लागवडीसाठी निवडावे.

2. शेतात स्वछता ठेवावी.

3. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेणे ०.१% बाविस्टीनच्या द्रावणात (१०० लिटर पाण्यात १०० ग्राम बावीस्टीन) १० मिनिटे बुडवून ठेवून नंतर लागवड करावी.


 गवताळ वाढ :- 


हा रोग बेण्याद्वारे पसरतो. फायटोप्लास्मा या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होणारा रोग आहे. सुरुवातीची लक्षणे ३-४ महिन्याच्या रोपांमध्ये दिसतात. प्रथम उसाच्या पोंग्यातून बाहेर पडणारी पाने फिकट पिवळसर ते पांढरट रंगाची दिसतात. उसाच्या बुंध्याजवळ जमिनीलगत पांढरी व पिवळ्या रंगाचे असंख्य फुटवे येतात. रोगाट बेटात फुटव्यांची संख्या वाजवीपेक्षा जास्त असते. अशी बेटे खुरटी होतात. पाने आखूड, आकाराने लहान, टोकाकडे निमुळती होऊन ते गवताच्या ठोंबासारखे दिसते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा कीड तसेच रोगट बेण्यापासून

होतो.


 नियंत्रण:- 


1. गवताळग्रस्त बेटे दिसल्यास, बेटे खोदून ती जाळून नष्ट करावीत.

2. सारखे खोडवा पीक घेऊ नये.

3. निरोगी व रोगप्रतिकारक तसेच उष्ण जलप्रकिया (५४ अंश तापमानाच्या पाण्यात ३ तास बेणे बुडवून ठेवावेत) केलेले बेणे वापरावे.

4. बेणेंना उष्ण हवेची प्रक्रिया (५२ अंश तापमानाला २ तास ठेवणे) द्यावी.

5. मावा किडीच्या नियंत्रणासाठी १ मिली मेटासिस्टॉक्स प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


विषाणूजन्य मोझ्याक रोग:-


हा रोग विषाणूमुळे होतो. प्रथम उसाच्या पानावर रंगहीन टिपके दिसून येतात. काही वेळेस पिवळसर पांढऱ्या रंगाच्या रेषाही पानावर दिसून येतात. पानाचे हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन पाने पिवळसर दिसतात. थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे चट्टे दिसून येतात. अशी पाने नंतर गाळून पडतात. उसाची वाढ खुंटते. रोग रस शोषणाऱ्या मावा किडीद्वारे पसरतो.


 • नियंत्रण:- 

1. लागण झालेला ऊस उपटून टाकावा.

2. निरोगी व रोगप्रतिकारक वाण लागवडीसाठी वापरावे.

3. उष्ण जलप्रक्रिया करावी.

4. रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीचा कीडनाशक फवारुन नाश करावा.



 माहिती संकलन:-IPM SCHOOL

        

         -:स्रोत-कृषी जागरण 

         -प्रा.मनीषा श्री.लांडे.

        -श्री संत शँकर महाराज कृषी महाविद्यालय,

पिंपळखुटा,जि.अहमदनगर

         -प्रा.हरीश अ.फरकाडे

-श्री.शिवाजी उद्यानविद्या   महाविद्यालय,अमरावती.

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱वैभव मारुती जाधव, कोल्हापूर

🌱पोखरकर सयाजीराव, अहमदनगर

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#sugarcane #sugar #gogreen #ipmfact #india #brazil #gogreen #greenrevolution87





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

ऊसाचे खोडवा |सुरुवातीच्या काळात | घ्यावयाची काळजी | Sugarcane management