ऊसामधील पोंगेमर/सुरळीमर (लवकर येणारा खोडकिडा) । नुकसान आणि सोपे नियंत्रण उपाय । Sugarcane Early Shoot Borer
महाराष्ट्रात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊसाची लागण झाल्यानंतर पीक निघेपर्यंत बऱ्याच किडींमुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. तसे ऊसामध्ये जवळपास ४ वेगवेगळ्या प्रकारच्या खोडकिडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच इतर अनेक किडी सुद्धा नुकसान करतात.
सुरुवातीच्या अवस्थेत लवकर येणाऱ्या खोडकिडीमुळे बऱ्याच भागात मोठे नुकसान होऊ शकते.ऊस पिकामध्ये सुरळीमर (लवकर येणारा खोडकिडा) ही कीड प्रामुख्याने लागवडीपासून ते ३-४ महिन्यांपर्यंतच्या पिकावर जास्त प्रमाणात दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचा मुख्य पोंगा (शेंडा) वाळतो, ज्याला आपण सुरळीमर/पोंगेमर म्हणतो.
लवकर येणारा खोडकिडा(Early Shoot Borer)(शास्त्रीय नाव - Chilo infuscatellus)
किडीचे नुकसान करण्याची पद्धत:-
१.अळीचा शिरकाव (Boring):- या किडीची मादी पतंग उसाच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पाने खाते आणि त्यानंतर जमिनीलगत उसाच्या खोडाला छिद्र पाडून आत शिरते.
२.मुख्य पोंग्यावर हल्ला:- अळी खोडाच्या आत शिरल्यानंतर, ती उसाचा वाढणारा मुख्य भाग किंवा गाभा खाऊन टाकते. यामुळे पिकाची अन्न आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विस्कळीत होते.
३.सुरळीमर/पोंगेमर/'डेड हार्ट' तयार होणे:- अळीने आतून गाभा खाल्ल्यामुळे उसाचा मधला कोंब किंवा पोंगा वाळतो आणि हाताने ओढला तर तो सहजपणे उपटून बाहेर येतो. पोंग्याचा खालचा भाग कुजलेला असतो आणि त्याला एक प्रकारचा विशिष्ट कुबट वास येतो.
४.फुटव्यांवर परिणाम:- जर मुख्य कोंब मेल्यास नवीन फुटवे होतात परंतु किडीचा प्रादुर्भाव पुन्हा त्या नवीन कोवळ्या फुटव्यांवरही होतो. यामुळे उसाची संख्या घटते आणि उसाची वाढ असमान दिसते.
५.उत्पादनातील घट:- जर सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात सुरळीमर झाली, तर उसाची योग्य संख्या राखली जात नाही. उशिरा आलेले फुटवे अशक्त राहतात, त्यांची जाडी आणि वजन कमी भरते, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येते.
सुरळीमर नियंत्रित करण्यासाठी एकात्मिक उपाययोजना:-
१.मशागतीय आणि प्रतिबंधात्मक उपाय:-
*पाचट आच्छादन:- उसाच्या ओळींमध्ये पाचट पसरवल्यास जमिनीचे तापमान कमी राहते आणि ओलावा टिकून राहतो. यामुळे खोडकिड्याच्या मादीला अंडी घालण्यास अडथळा निर्माण होतो.
*हलकी भरणी:- ऊस लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी रोपांना हलकी भरणी (माती लावणे) करावी. यामुळे जमिनीलगत असलेली अंडी व अळ्या मातीखाली दाबल्या जाऊन मरतात.
*बाधित फुटवे काढणे:- शेतात फिरताना वाळलेले पोंगे (डेड हार्ट) दिसल्यास ते जमिनीलगत कापून काढून त्यातील अळीसह नष्ट करावेत.
२.भौतिक आणि जैविक नियंत्रण:-
*कामगंध सापळे वापर:- शेतात एकरी १० ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामुळे नर पतंग पकडले जाऊन किडीच्या प्रजननाला आळा बसतो.
*ट्रायकोकार्ड्सचा वापर:- ट्रायकोगामा चिलोनिस या परोपजीवी कीटकांची कार्डे शेतात लावावीत. जवळपास ५० हजार ते १ लाख मित्रकीटक प्रति एकर, १५ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा सोडावीत. ही मित्रकीड खोडकिड्याची अंडी नष्ट करते.
३.रासायनिक नियंत्रण
जर प्रादुर्भाव जास्त असेल (५ टक्क्यांपेक्षा जास्त मृत पोंगे), तर खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
अ)जमिनीतून द्यायची औषधे (खतासोबत किंवा ड्रेचिंग):-
*फिप्रोनिल ०.३% जी.आर. (उदा. रीजेंट): प्रति एकरी ८ ते १० किलो खतात मिसळून द्यावे आणि त्यानंतर हलके पाणी द्यावे.
*क्लोरँट्रानिलिप्रोल ०.४% जी.आर. (उदा. फर्टेरा): प्रति एकरी ४ किलो याप्रमाणे ओळीतून टाकून पाणी द्यावे.
ब)फवारणी किंवा आळवणी (Drenching):-
*क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५% एस.सी. (उदा. कोराजन): १५० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून ऊसाच्या ओळीत 'आळवणी' (बुंध्यापाशी पडेल असे) करावी. (लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांच्या दरम्यान).
*फिप्रोनिल ५% एस.सी.: ३० ते ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पोंग्यात जाईल अशा प्रकारे फवारणी करावी.
४.महत्त्वाचे:-
१.पाणी व्यवस्थापन: उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा ताण पडू देऊ नका. जमिनीला तडे गेल्यास अळ्यांना आत शिरणे सोपे होते, त्यामुळे ओल टिकवून ठेवा.
२.नत्रयुक्त खतांचा (युरिया) अतिवापर टाळावा, कारण यामुळे पिकाला कोवळेपण राहून कीड जास्त आकर्षित होते.
३.सुरळीमरचे नियंत्रण हे पीक ६० ते ७० दिवसांचे होईपर्यंतच करणे फायदेशीर ठरते, त्यानंतर कांड्या तयार झाल्यावर या किडीचा त्रास कमी होतो.
अशा प्रकारे सुरुवातीपासून काळजी घेतल्यास सुरळीमर/पोंगेमर नियंत्रण अगदी सहजपणे करता येऊ शकते. त्यामुळे पिकाचे सुरुवातीला होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शरद बोन्डे , अचलपूर अमरावती
गणपत मिसाळ, जानेफळ भोकरदन जालना
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #sugarcane #pest #earlyshootborer #damage #pestmanagement #sugarcanefarming #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा